युवराज सिंग आणि हेझल कीच यांना पुत्ररत्न प्राप्...

युवराज सिंग आणि हेझल कीच यांना पुत्ररत्न प्राप्ती (Yuvraj Singh-Hazel Keech welcome their first child, Couple Blessed With Baby Boy)

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेझल कीच यांना लग्नानंतर पाच वर्षांनी पुत्ररत्नाची प्राप्ती झालीय. यासंदर्भातील माहिती युवराजनेच ट्विटवरुन चाहत्यांना दिलीय.

“आमच्या सर्व चाहत्यांना, कुटुंबियांना आणि मित्रांना सांगताना आनंद होत आहे की आज आम्हाला देवाच्या कृपेने पुत्ररत्न प्राप्ती झालीय. आम्ही यासाठी देवाचे आभार मानतो. तसेच आम्ही आमच्या मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करत असतानाच सर्वांकडून आपल्या खासगी आयुष्याचा सन्मान राखला जाईल अशी अपेक्षा करतो,” असं युवराजने ट्विटर वरुन म्हटलंय. रात्री साडेअकराच्या सुमारास युवराजने ही गोड बातमी दिलीय.

युवराजचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते, क्रिकेटर्स, बॉलिवूड सेलिब्रिटी या जोडप्याचे सतत अभिनंदन करत आहेत. टेनिसपटू सानिया मिर्झा, इरफान पठाण, मुनाफ पटेल, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली, सायना नेहवाल, पियुष चावला यांच्यासह अनेकांनी युवराज सिंगच्या या पोस्टवर कमेंट करताना शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय अभिषेक बच्चन, नेहा धुपिया, अंगद बेदी, बिपाशा बसू, रवीना टंडन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

युवराज आणि हेझलचं लग्न नोव्हेंबर २०१६ मध्ये झालं आहे. त्याआधीपासून ते दोघे एकमेकांना डेट करत होते. हेझलने बॉलिवूडसोबतच काही टॉलिवूड चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे. सलमान खान- करिना कपूर खान यांच्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातून हेझलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यापूर्वी ‘हॅरी पॉटर’ या प्रसिद्ध चित्रपटात तिने हॉगवर्ट्समधल्या विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती. ‘हॅरी पॉटर अँड द फिलोसॉफर्स स्टोन’, ‘हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स’ आणि ‘हॅरी पॉटर अँड द प्रिसनर ऑफ अझ्कबान’ या तीन चित्रपटांमध्ये हेजलने काम केलं होतं. ती २०१३ च्या ‘बीग बॉस’च्या पर्वामध्येही झळकली होती.

दुसरीकडे युवराज हा भारताला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघाचा भाग होता. त्याने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर तो जगभरातील वेगवेगळ्या क्रिकेट लीगमध्ये खेळतोय.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / ट्वीटर