कंपनी सेक्रेटरी: प्रतिष्ठेच...

कंपनी सेक्रेटरी: प्रतिष्ठेचे करिअर (Young Ladies To Opt For Prestigious Career As A Company Secretary)

कित्येक बड्या कंपन्यांमध्ये उच्चशिक्षित महिलांनी कंपनी सचिव, अर्थात् कंपनी सेक्रेटरीचे पद भूषविलेले दिसते. मानमरातब आणि उत्तम आर्थिक उत्पन्न देणारे हे आव्हानात्मक क्षेत्र तरुणींनी करिअरसाठी स्वीकारावे असेच आहे.
पुरुषांची मक्तेदारी असलेल्या विविध उद्योगक्षेत्रात महिलांनी हिरीरीने प्रवेश केलेला आहे. संरक्षण खाते, लढाऊ विमाने, अवकाश क्षेत्र आणि कॉर्पोरेट उद्योग क्षेत्र; अशा असंख्य क्षेत्रात महिला उच्च पदावर पोहचल्या आहेत. आयएएस, आयपीएस या क्षेत्रात तर त्या आपल्या कर्तृत्वाने कधीच्या तळपत आहेत.
या शतकात कर्तबगारीचे असे एकही क्षेत्र कदाचित उरणार नाही, जिथे कर्तृत्ववान महिला दिसणार नाहीत.
असेच एक पद आहे कंपनी सचिव, अर्थात् कंपनी सेक्रेटरीचे! कित्येक बड्या कंपन्यांमध्ये उच्चशिक्षित महिलांनी हे पद भूषविलेले दिसते. मात्र या उच्चपदस्थ पदाचे कार्यक्षेत्र कसे आहे आणि त्यामध्ये करिअर घडवायचे असेल, तर काय करावे लागते, याची फारच कमी लोकांना माहिती आहे.

कामाचे स्वरुप
सेक्रेटरी या पदाचा उच्चार करताच, मंत्रीमहोदयांचे किंवा मोठ्या कंपनीतील साहेबांचा सेक्रेटरी, असेच रूप डोळ्यासमोर येते. परंतु कंपनी सेक्रेटरी म्हणजे या साध्या सेक्रेटरीपेक्षा कितीतरी मोठे आणि प्रतिष्ठेचे हे कंपनी सेक्रेटरीचे पद आहे. त्यांच्या कामाचे स्वरूप आणि उद्योगक्षेत्रात मिळणारा मानमरातब यामुळे या पदाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण हे पद सांभाळणारी व्यक्ती कंपनीची सर्व प्रकारे धुरा पाहत असते. कंपनीचे व्यवस्थापन, सरकार दरबारी असणारी कामे आणि उद्योगाशी संबंधित कायदेशीर बाबींची पूर्तता करणे अशा या कंपनी सेक्रेटरीच्या जबाबदार्‍या असतात. इतकंच नव्हे तर कंपनीच्या कामाची देखरेख, अर्थव्यवहार, जमाखर्च आणि इतर कंपन्यांशी समन्वय साधणे अशा जबाबदार्‍या असतात. एखाद्या नवीन प्रोजेक्टसाठी आर्थिक तजवीज करणे तसेच योग्य, कर्तबगार अधिकार्‍यांना पारखून त्यांची निवड करणे, अशी अष्टावधानी कामे या व्यक्तीला करायची असतात. यावरूनच कंपनी सेक्रेटरी हे पद किती महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे आहे, याची कल्पना येऊ शकते.
या व्यक्तीच्या कामकाजाचे स्वरूप असे असल्याने त्याला कायदा, मॅनेजमेंट, व्यापारउदीम, कॉर्पोरेट ध्येयधोरणे यांचं सखोल ज्ञान असणं आवश्यक असतं. शिवाय हे करिअर स्वीकारु इच्छिणार्‍या विद्यार्थ्याकडे उत्तम संवादकौशल्य, लेखनक्षमता (ई मेल आणि ड्रा्फ्टींग) तसेच आकलनक्षमता, तीक्ष्ण बुद्धिमत्ता हे गुण असणं गरजेचे ठरते.

अर्हता आणि अभ्यासक्रम
या पदासाठी एक कोर्स असतो. सायन्स, आर्टस् किंवा कॉमर्स शाखेची बारावीची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्याला कंपनी सेक्रेटरीच्या कोर्सला डमिशन मिळू शकते. ग्रॅज्युएट असल्यास अती उत्तम. हा फाऊंडेशन कोर्स आठ महिन्यांचा असतो. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडिया या संस्थेत प्रवेश घेऊन हा कोर्स करायचा असतो. चार्टर्ड अकाऊंटंटचे प्रशिक्षण देणार्‍या संस्थेप्रमाणेच ही कंपनी सेक्रेटरीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. फाऊंडेशनचा आठ महिन्यांचा कोर्स करून त्यामध्ये पास झाल्यानंतर प्रॅक्टीकल ट्रेनिंग दिले जाते. त्यामध्ये व्यवस्थित प्रगती दाखविल्यानंतर त्या विद्यार्थ्याला अधिकृतपणे कंपनी सेक्रेटरी या पदाची सनद दिली जाते. चार्टर्ड अकाऊंटंट पदाची सनद घेतलेल्यांना सी. ए. तर कंपनी सेक्रेटरी पदाची सनद घेतलेल्यांना सी. एस. असे संबोधले जाते.
वर्तमानपत्रात अलिकडे मोठमोठ्या कंपन्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या, आर्थिक ताळेबंदांच्या, ध्येयधोरणांच्या जाहिराती येतात, त्याखाली कंपनी सेक्रेटरी असे पदनाम व त्या अधिकार्‍याची स्वाक्षरी असते. काळजीपूर्वक पाहिल्यास या स्वाक्षर्‍या व नावे महिलांची दिसून येत आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात मोठमोठ्या व मध्यम उद्योगांना कंपनी सेक्रेटरींची मोठ्या प्रमाणात गरज आहे. तेव्हा हे मानमरातब आणि उत्तम आर्थिक उत्पन्न देणारे आव्हानात्मक करिअर तरुणींनी स्वीकारावे असे आहे.