वीरकन्या प्रीतिलता वड्डेदार (Young Freedom Figh...

वीरकन्या प्रीतिलता वड्डेदार (Young Freedom Fighter Pritilata’s Strugle For Independence)

  • अनघा शिराळकर

ब्रिटीशांविरुद्धच्या स्वात स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियाही सहभागी होत्या. त्यातील काहीच स्त्रियांना प्रसिद्धी मिळाली. फक्त स्थानिक पातळीवर स्मरणात राहिलेल्या तसेच फारशी प्रसिद्धी न मिळालेल्यांपैकी एक तरुण वीरांगना होती – प्रीतिलता वड्डेदार
ब्रिटीशांविरूद्ध सारा हिंदुस्थान पेटून उठला होता. सर्व स्तरांतील तरूण, प्रौढ तसेच ज्येष्ठ नागरिक विविध मार्गांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेत होते. त्यात स्त्रियांही सहभागी होत्या. क्रांतिकारींना गुप्तपणे मदत करण्यापासून सशस्त्र लढा देण्यापर्यंत स्त्रियांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये कामे केली होती. अनेक स्त्रियां धारातीर्थीही पडल्या. त्यातील काहीच स्त्रियांना प्रसिद्धी मिळाली. फक्त स्थानिक पातळीवर स्मरणात राहिलेल्या किंवा फारशी प्रसिध्दी न मिळालेल्यांपैकी प्रीतिलता वड्डेदार ही एक तरुण वीरांगना होती.

इतिहासातील वीरांगनांच्या गोष्टींनी प्रेरित
ब्रिटीशकालीन अखंड भारतातील बंगाल प्रेसिडेन्सी (सध्याचा बांगलादेश) मधील पतिया उपजिल्ह्यातील चित्तगांव जवळील ढोलघाट या खेडेगावात 5 मे 1911 रोजी प्रीतिलता हिचा जन्म झाला. जगबंधू आणि प्रतिभादेवी वड्डेदार यांची ही कन्या. जगबंधू यांच्या पुर्वजांचे आडनाव दासगुप्ता होते. त्यांना वड्डेदार हे मानाचे नाव मिळाले होते. जगबंधू हे चित्तगांवच्या नगरपालिकेत लेखनिक होते आणि प्रतिभादेवी गृहिणी होत्या. या दांपत्याला मधुसूदन, प्रीतिलता, कनकलता, शांतीलता, आशालता आणि संतोष अशी सहा अपत्ये होती. प्रीतिलता हिला सर्वजण लाडाने राणी या नावाने संबोधत होते. आपल्या अपत्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी जगबंधू यांनी आटोकाट प्रयत्न केले. प्रीतिलता चित्तगांव येथील डॉ. खस्तागीर मुलींच्या सरकारी शाळेत जाऊ लागली. ती अभ्यासात अतिशय हुशार होती. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत व्हावे म्हणून शाळेतील शिक्षिका शुरांच्या गोष्टी सांगत असत. इतिहासातील वीरांगनांच्या गोष्टी ऐकून प्रीतिलता प्रेरित झाली आणि आपणही देशासाठी काहीतरी करावे अशी भावना तिच्या मनात पक्की रूजली.

दीपाली संघात सामील
इ.स. 1927 मध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त करून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रीतिलताने ढाका येथील ईडन महाविद्यालयात पुढील शिक्षण सुरू केले आणि इंटरमिजिएट परीक्षेत प्रीतिलताने ढाका बोर्डात पहिला नंबर पटकावला. प्रीतिलताला कला, साहित्य आणि समाजकार्य यामध्ये फार रस होता. कॉलेजमध्ये असतानाच ती विविध सामाजिक उपक्रमातही भाग घेत होती. उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रीतिलताने कलकत्ता (आत्ताचे कोलकाता) येथील बेथून महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षण चालू असतानाच प्रसिद्ध क्रांतिकारी श्रीमती लीला नाग यांच्या नेतृत्वाखालील कलकत्ता येथे महिला क्रांतिकारींसाठी कार्यरत असलेल्या दीपाली संघात प्रीतिलता सामील झाली.
इ. स. 1930 साली तत्वज्ञान या विषयातील बी.ए.च्या पदवी परीक्षेत प्रीतिलता विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली. परंतु प्रीतिलताचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग बघून ब्रिटीशांनी ही पदवी तिला प्रदान न करता ती राखून ठेवली. कलकत्त्यामधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रीतिलता चित्तगांव या आपल्या गावी परत आली आणि ती नंदनकानन अपर्णा चरण या इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून रूजू झाली, पण स्वातंत्र्यचळवळीत स्वतःला झोकून द्यायचे असे
प्रीतिलताने ठरवले.

क्रांतिकारी उपक्रमांत सक्रिय सहभाग
धाडसी व उत्साही तरुण महिला क्रांतिकारी प्रीतिलताने ब्रिटीशांना हिंदुस्थान सोडायला भाग पाडायचे हे ध्येय ठेवून क्रांतिकारक सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या शिबिरात ती सामील झाली. खरं तर नियमाप्रमाणे त्या शिबिरात महिलांना प्रवेश नव्हता. पण महिलांनी शस्त्रे बाळगली तर त्यांच्यावर संशय घेतला जाणार नाही आणि सशस्त्र लढ्यासाठी ते उपयुक्त होईल या विचाराने प्रीतिलता हिला या शिबिरात प्रवेश देण्यात आला. सूर्यसेन यांच्या गटाने चित्तगांवचे महानिरीक्षक (इन्स्पेक्टर जनरल) क्रेग यांना ठार करायचे असे ठरवले. ही जबाबदारी रामकृष्ण बिस्वास व कालीपाडा चक्रवर्ती या दोन क्रांतिकारकांवर सोपवली होती. या दोघां क्रांतिकारांनी क्रेग यांच्याऐवजी चुकून चंद्रपूरचे निरीक्षक (इन्स्पेक्टर)यांना ठार केले. त्यामुळे त्या दोघांना अटक झाली. त्यातील रामकृष्ण बिस्वास यांना फाशी दिले तर कालीपाडा चक्रवर्ती यांना कलकत्त्यामधील अलीपोर येथील कारागृहात बंद केले. चित्तगांवपासून हे कारागृह दूर होते शिवाय चक्रवर्तींना भेटणे हे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या परवडणारेही नव्हते. त्यावेळी प्रीतिलता कलकत्त्याला होती म्हणून रामकृष्ण चक्रवर्ती यांना अलीपोर येथील कारागृहात भेटण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवली.
प्रीतिलताने सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखालील अनेक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला. टेलीफोन ऑफिसवर धाड टाकणे, राखीव पोलीस दलावर हल्ला करणे तसेच जलालाबाद लढाईत क्रांतिकारकांना दारूगोळा पुरवणे यांसारख्या महत्वाच्या जबाबदार्‍या प्रीतिलताने पार पाडल्या.
जलालाबाद लढाईमध्ये भारतीय क्रांतिकारकाचा नाहक बळी गेला होता. त्याचा बदला घेण्याचा विचार सूर्यसेन यांच्या मनात होता. पहारतळी येथील युरोपियन क्लबमध्ये बरेच इंग्रज जमत असत. या क्लबच्या दारावर ‘कुत्र्यांना आणि भारतीयांना प्रवेश नाही’ अशी पाटी होती. या क्लबमधील इंग्रजांना धडा शिकविण्यासाठी आणि जलालाबाद लढाईचा बदला घेण्यासाठी सूर्यसेन यांनी त्या क्लबवर सशस्त्र हल्ला करण्याचे ठरवले. सर्व क्रांतिकार्‍यांना पोटॅशियम सायनाईड देऊन ठेवले जेणेकरून ब्रिटीशांकडून पकडले गेलेच तर सायनाईड प्राशन करून आत्मबलिदान करता येईल. सूर्यसेन यांनी क्लबवर हल्ला करण्यासाठी क्रांतिकारींचे नेतृत्व करण्याची जबाबदारी प्रीतिलतावर सोपवली. त्यासाठी प्रीतिलताने कोतोवाली समुद्रकिनारी शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि युरोपियन क्लबवर हल्ला करण्याची योजना आखली.

स्वीकारलेले कार्य पूर्णत्वास नेले
24 सप्टेंबर 1932 रोजी रात्री 9.30 वाजता प्रीतिलता पुरुषी वेशात आपल्या पंधरा स्त्री व पुरुष क्रांतिकार्‍यांसह पहारतळी रेल्वे स्टेशनजवळील क्लबजवळ पोहचली. क्लबमध्ये जवळजवळ चाळीस इंग्रज अधिकारी जमले होते. सर्व क्रांतिकार्‍यांनी योजल्याप्रमाणे इंग्रज अधिकार्‍यांवर सशस्त्र हल्ला केला. हल्ल्यात एका इंग्रज अधिकार्‍याचा मृत्यू झाला व अनेकजण जखमी झाले. शेवटी या क्रांतिकार्‍यांनी त्या क्लबच्या इमारतीवर बॅाम्ब टाकून तेथील शस्त्रसाठा उद्ध्वस्त केला. अशाप्रकारे प्रीतिलताने स्वीकारलेले कार्य पूर्णत्वास नेले. ब्रिटिश पोलिसांनी क्रांतिकार्‍यांवर गोळीबार केला आणि काही जणांना पकडले. प्रीतिलतालाही एक गोळी लागली. ब्रिटीशांकडून पकडले जाऊन पुढील कठोर कारवाईला व अत्याचाराला तोंड द्यायला नको म्हणून अटक होण्यापूर्वीच सर्वांच्या नकळत तिने स्वतः सायनाईड प्राशन केले. दुसर्‍या दिवशी पोलिसांना प्रीतिलताचे शव सापडले. त्यासोबत काही पत्रके, रामकृष्ण बिस्वासचे फोटो, पिस्तुलांच्या गोळ्या, शिट्ट्या, क्लबवरच्या हल्ल्याच्या योजनेची कागदपत्रे त्यांना मिळाली. शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांना कळले की प्रीतिलताचे निधन बंदूकीच्या गोळीने झालेले नसून ते सायनाईड प्राशन करून झाले.

वीरकन्या प्रीतिलता ट्रस्ट
देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या 21व्या वर्षी सशस्त्रलढा देऊन बलिदान देणारी प्रीतिलता ही पहिली बंगाली तरुण महिला होती. या महान स्वातंत्र्यसेनानीच्या स्मरणार्थ वीरकन्या प्रीतिलता ट्रस्ट या नावाची ट्रस्ट स्थापन करण्यात आली. या ट्रस्ट मार्फत दरवर्षी प्रीतिलताचा जन्मदिवस बांगलादेश आणि भारतामधील विविध भागात साजरा केला जातो. चित्तगांव या तिच्या जन्मगावाला जाणार्‍या एका रस्त्याला प्रीतिलता वड्डेदार मार्ग असे नाव देण्यात आले. 2012साली युरोपियन क्लबजवळच्या पहारताली रेल्वे स्कूलच्या समोर प्रीतिलताचा पुतळा उभारण्यात आला. प्रीतिलताच्या जीवनावर आधारित 2010 साली ‘खेले हम जी जानसे’ आणि 2012 साली ‘चित्तगांव’ असे दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन (बी.बी.सी.) साठी 2018साली तानिका गुप्ता लिखीत ‘स्त्रियांच्या आयुष्यातील आठवणींतील महत्वाचे क्षण’ या मालिकेअंतर्गत किरण सानिया सावर यांनी प्रीतिलता वड्डेदार हिच्या आयुष्यावर एकपात्री लघुपट तयार केला.
प्रीतिलताने स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान हे अति महान व अविस्मरणीय आहे. प्रीतिलता ही पुढील काळात क्रांतिकारी स्त्रियांसाठी मार्गदर्शक ठरली.