हवाई सुंदरी व्हायचंय? (Young Beautiful Girls Ca...

हवाई सुंदरी व्हायचंय? (Young Beautiful Girls Can Make Career As Air Hostess)

हवाई सुंदरी या करिअर क्षेत्रास असलेल्या ग्लॅमरमुळे येथे जाण्याकडे तरुणींचा कल अधिक आहे. किंबहुना सुंदर व्यक्तिमत्त्व असलेल्या तरुणींसाठीच हवाई सुंदरी हे करिअर उपलब्ध आहे.

हवाई सुंदरी हे तरुणाईला आकर्षित करणारं, सदैव तरुण असणारं आणि आपल्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीस तरुण करणारं क्षेत्र आहे. किंबहुना आकर्षक, सुंदर व्यक्तिमत्त्व असलेल्या तरुणींसाठीच हवाई सुंदरी (एअर होस्टेस) हे करिअर उपलब्ध आहे. विमान हा सर्वांच्या कुतूहलाचा विषय आहे. किमान एकदा तरी आयुष्यात विमान प्रवास घडावा अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. भरपूर पगार आणि परदेशात फिरण्याची संधी म्हणून हवाई सुंदरीच्या करिअरकडे पाहिलं जातं. वरवर अगदी सोपं वाटणारं हे कार्यक्षेत्र त्यापेक्षाही अधिक जबाबदारीचं आहे. आजकाल अनेक तरुणी प्रशिक्षण घेऊन नामवंत विमान कंपन्यांत कार्यरत आहेत.

प्रवासादरम्यान प्रवाशांची काळजी घेणं आणि त्यांचा प्रवास सुसह्य करणं ही हवाई सुंदरीची प्रमुख जबाबदारी असते. यामध्ये विमानातून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुखसोयी, समाधान आणि सामान्य गरजांकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. दरवाजात उभं राहून प्रवाशांचे हसतमुखाने स्वागत करणं, प्रवाशांना त्यांच्या आरक्षित जागेपर्यंत जाण्यासाठी दिशा दाखवणं, विमान उड्डाणापूर्वी आणि नंतर प्रवाशांना त्यांचे सीट बेल्ट बांधण्यास मदत करणं, त्यांचं सामान वरील रॅकमध्ये नीट रचून ठेवणं; हे देखील त्यांना करावं लागतं.

ज्येष्ठ व्यक्तींना, आजारी प्रवाशांना मदत करून त्यांची अडचण दूर करणं, त्यांना औषधं पुरवणं, त्यांना वाचनाचे साहित्य, पाणी, खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू पुरवण्याचं कामंही त्या चोखपणे सांभाळतात. विमानात येणार्‍या धोक्याच्या वेळी प्रवाशांना धीर देणं, प्रवाशांना प्रवासमार्गाची तसेच इतर चौकशीची माहिती पुरवणं. विमानातून बाहेर पडणार्‍या प्रवाशांना पुन्हा हास्यवदनाने नमस्कार करून त्यांचा निरोप घेणं; याशिवाय हवेचा दाब कमी होताच त्यासाठीच्या मास्कचा उपयोग कसा करावयाचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवणं, अशी लहानसहान कामंही हवाई सुंदरीला करावी लागतात.

हवाई सुंदरी होण्यासाठी…
–    तुमचं व्यक्तिमत्त्व आकर्षक असायलाच हवं.
–    पदवी किंवा पदविका आवश्यक असते.
–    मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असायला हवं, त्याचबरोबर एका विदेशी भाषेचं ज्ञान असणंही आवश्यक असतं.
–    उत्तम संवाद कौशल्य (कम्युनिकेशन स्किल)
–    शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं.
–    हजरजबाबी, सकारात्मक विचार, विनम्रता हे गुण आवश्यक.
–    कमीत कमी उंची 157.5 सेंमी हवी आणि डोळ्याची दृष्टी 6/6 हवी.
–    वय 18 ते 25 दरम्यान असावं.
याशिवाय तुमचं सामान्य ज्ञानही उत्तम असणं आवश्यक असतं. अनेकदा प्रवाशांनी वारंवार प्रश्न विचारल्यास न चिडता त्यांना समाधानकारक उत्तरं द्यावी लागतात.

संधी
हवाई सुंदरीचा कार्यकाल जास्तीतजास्त 8 ते 10 वर्षाचा असतो. त्यानंतर ग्राउंड ड्युटी किंवा व्यवस्थापनाची कामं दिली जातात. सिनिअर एअर होस्टेस पदापर्यंत पोहोचल्यानंतर सिनिअर फ्लाइट अटेंडंट म्हणूनही संधी मिळते. आणि वयाच्या 58व्या वर्षी सेवानिवृत्ती दिली जाते.

उपलब्ध अभ्यासक्रम
–    बॅचलर ऑफ सायन्स एअरहोस्टेस ट्रेनिंग
–    बीबीए इन एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट
–    डिप्लोमा इन अ‍ॅव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी
–    डिप्लोमा इन अ‍ॅव्हिएशन आणि केबिन क्रू
–    डिप्लोमा इन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल्स आणि एअरलाइन्स टिकेटिंग
–    इंटरनॅशनल एअरलाईन्स आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट मधील सर्टिफिकेट कोर्स
–    एअर होस्टेस/फ्लाइट कोर्स मधील सर्टिफिकेट कोर्स

परीक्षा पद्धत
–    हवाई सुंदरी होण्यासाठी इंग्रजी, गणित, अभिरुची, सामान्य ज्ञान या विषयांची चाचणी परीक्षा घेण्यात येते.
–    काही एअरलाईन्स कंपन्या नोकरीपूर्व लेखी परीक्षा घेतात, ज्यात उमेदवाराची अभियोग्यता चाचणी (अ‍ॅप्टीट्युड टेस्ट) घेतली जाते.
–    तसेच कौशल्य चाचणी (स्किल टेस्ट) घेतली जाते. ज्यात कौशल्यावर अधिक प्रश्न विचारले जातात.
–    परीक्षेसाठी जाताना विषयाचा सखोल अभ्यास असणं गरजेचं आहे.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी सहाय्य करणार्‍या काही प्रशिक्षण संस्था आहेत. अशा संस्थेतच प्राधान्याने प्रवेश घ्या.

प्रशिक्षणाचा कालावधी
प्रशिक्षणाचा कालावधी एकूण सहा महिन्यांचा असतो. पैकी तीन महिने जमिनीवर आणि तीन महिने प्रत्यक्ष विमान उड्डाणात प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षणाच्या काळात स्टायपेंड (पाठ्यवृत्ती) दिली जाते.

प्रशिक्षण संस्था
–    फ्रांकफिन इन्स्टिट्यूट ऑफ एअर होस्टेस ट्रेनिंग न्यू दिल्ली आणि मुंबई.
–    एअर होस्टेस अ‍ॅकेडमी. बंगलोर, चंदीगढ, दिल्ली, मुंबई.
–    राजीव गांधी मेमोरिअल कॉलेज ऑफ अ‍ॅरोनॉटिक्स, जयपूर
–    युनिव्हर्सल अ‍ॅव्हिएशन अ‍ॅकेडमी, चेन्नई.
–    राय युनिव्हर्सिटी, अहमदाबाद.

नोकरी कुठे मिळेल?
एअर इंडिया, इंडियन एअरलाईन्स, टाटा, गो एअर, सहारा इंडिया,
जेट एअरवेज, गल्फ एअर, ब्रिटिश एअरवेज, युनायटेड एअर.

विमान कंपन्याकडून उपलब्ध सोयी
हवाई सुंदरींना सलग दहा तास काम करावं लागतं. विमानाच्या पायलटशी सतत संपर्कात राहणं आवश्यक असतं. हवाई सुंदरीसाठी विमान कंपन्या अनेक सोयी उपलब्ध करून देतात. त्यांना त्यांच्या घरापासून विमानतळावर घेऊन जाणे आणि परत सोडणे, अन्य ठिकाणी त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची सोय करून देणे, त्यांना लागणारे गणवेश आणि इतर वस्तू पुरवणे या सगळ्या गोष्टींचा त्यात समावेश असतो. या हवाई सुंदरींना केशकलाप, मेकअप ठरावीक पद्धतीनेच करावा लागतो. त्याचप्रमाणे आयब्रो, आयशॅडो, बोटे, नखे, चपलासुद्धा ठरावीक नमुन्याची असावी लागतात.
विमान प्रवास आता सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. त्यामुळे या क्षेत्रातही नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. काही परदेशी कंपन्यांनीही या व्यवसायात गुंतवणूक केलेली आहे. या क्षेत्राला असणारा ग्लॅमरचा विचार करता इकडे जाण्याकडे तरुणींचा कल आहे. तसंच तरुण मुलंही या क्षेत्रात आपलं करिअर करण्यासाठी आनंदाने सहभागी होत आहेत. कष्टाची तयारी, पर्यटनाची आवड असणार्‍या प्रत्येकास करिअरचं हे क्षेत्र इच्छित यश दिल्याशिवाय राहणार नाही.