‘लागिर झालं जी’ या मालिकेमध्ये काम केलेल्या अभि...

‘लागिर झालं जी’ या मालिकेमध्ये काम केलेल्या अभिनेता ज्ञानेश माने यांचं निधन (Young Actor Gnyanesh Mane Dies In Car Accident)

झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका म्हणजे ‘लागिर झालं जी’ या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरामध्ये पोहचले आहेत. या मालिकेमध्ये काम केलेल्या अभिनेता ज्ञानेश माने यांचा कार अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्याजवळील रोटी घाटातून जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. ज्ञानेश यांच्या मृत्यूमुळे मनोरंजनसृष्टीत दु:ख व्यक्त केले जात आहे.

पुण्यातील रोटी घाटातून प्रवास करत असताना घाटातील वळणावर ज्ञानेश यांच्या कारला भीषण अपघात झाला. अपघातानंतर ज्ञानेश माने हे बेशुद्ध पडले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ ससून रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. पण रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.

ज्ञानेश माने हे मुळचे पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळील जरडगावचे रहिवासी होते. ज्ञानेश हे पेशाने डॉक्टर होते. त्यांना अभिनयाची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांनी मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. ज्ञानेश माने यांच्या पाश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.

ज्ञानेश माने यांनी ‘लागिर झालं जी’ या मालिकेत अज्याची भूमिका साकारणारा अभिनेता नितीश चव्हाण याच्यासोबत लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. या व्यतिरिक्त त्यांनी ‘सोलापूर गँगवार’, ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’, ‘अंबुज’, ‘हंबरडा’, ‘यादया’ यांसारख्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.