लता मंगेशकर यांच्या तुम्ही न ऐकलेल्या गोष्टी (Y...

लता मंगेशकर यांच्या तुम्ही न ऐकलेल्या गोष्टी (You Would Not Know These Things Related To Lata Mangeshkar)

जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं आज सकाळ ८ वाजून १२ मिनिटांनी निधन झालं. मागच्या २८ दिवसांपासून त्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरातून श्रद्धांजली व्यक्त केली जाते आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनांतर आता देशात दोन दिवसांचा राष्टीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. याकाळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येईल.

लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पार्थिव दुपारी साडेबारा वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. तसंच त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचं वर्णन अनेकांनी केलं, त्या देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे वार्धक्यानं निधन झाले आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ मध्य प्रदेशच्या इंदूर शहरात झाला. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहे.
जगप्रसिद्ध स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जीवनाशी संबंधित काही गोष्टी –
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव – लता मंगेशकर यांनी २० भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. आपल्या सुरेल आवाजाने त्यांनी लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांनी गायलेली गाणी थेट लोकांच्या मनात घर करून जातात. १९७४ ते १९९१ पर्यंत जगातील सर्वाधिक गाणी गायलेल्या गायिका म्हणून लता दीदींचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लता मंगेशकर यांना पातळ आवाजामुळे खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. तथापि, जेव्हा त्यांनी गायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या जादुई आवाजाने सर्व समीक्षकांची तोंडे बंद झाली.

एसडी बर्मन आणि रफी यांच्यासोबत मतभेद- लतादीदींच्या जबरदस्त यशामुळे त्या इंडस्ट्रीतील सर्वात शक्तिशाली महिला बनल्या होत्या. नंतर काही गैरसमजांमुळे त्यांनी एसडी बर्मन यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. काही काळानंतर लतादीदींचे मोहम्मद रफी यांच्याशी रॉयल्टी देण्याच्या मुद्द्यावरून मतभेद झाले, ज्यामुळे दोघांनी जवळपास तीन वर्षे एकत्र काम केले नाही. मोहम्मद रफी यांची सून यास्मिन खालिद यांनी त्यांच्या ‘मोहम्मद रफी : मेरे अब्बा’ या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.

मक्तेदारीचे आरोप – यशाच्या शिखरावर असताना लतादीदींवर इंडस्ट्रीत मक्तेदारी प्रस्थापित केल्याचा आरोपही करण्यात आला. लता मंगेशकर यांनी अनेक गायकांना पुढे जाण्याची संधी दिली नाही, असे म्हटले गेले. त्या काळात इंडस्ट्रीतील जवळपास सर्वच संगीत दिग्दर्शकांना लतादीदींसोबत काम करायचे होते. लतादीदींशिवाय आशा भोसले यांचाही इंडस्ट्रीत बराच दबदबा होता.

भूपेन हजारिकासोबत अफेअर – तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लता मंगेशकर यांचे नाव विवाहित गायक भूपेन हजारिका यांच्यासोबत जोडले गेले होते. त्यांच्या अफेअरच्या बातम्या शहरात खूप चर्चेत राहिल्या. हजारिकाच्या मृत्यूनंतर, जेव्हा त्यांची पहिली जयंती होती, तेव्हा त्यांची पत्नी प्रियम यांनी त्यांच्या एका निवेदनात म्हटले होते की त्यांचे पती आणि लता मंगेशकर यांच्यात अफेअर होते.

भारतरत्न पुरस्कार – लता मंगेशकर यांनी अनेक पुरस्कार जिंकले असले, तरी त्यांना सर्वात विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार. हा पुरस्कार मिळवणाऱ्या लता मंगेशकर या देशातील दुसऱ्या गायिका ठरल्या. त्यांच्या आधी एमएस सुब्बुलक्ष्मी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम (सर्व फोटो)