सकाळचा चहा घेण्याआधी हे करा, वजन कमी करा! (You ...

सकाळचा चहा घेण्याआधी हे करा, वजन कमी करा! (You Can Do This Before Morning Tea To Keep Fitness)


सकाळी उठल्यावर आपली पहिली गरज असते, गरमागरम चहा. काही जणांना तर या चहाची तल्लफ इतकी असते की, दातांना ब्रश करण्यापूर्वी ते आधी चहा घेतात. इंग्रजांनी त्याला ‘बेड टी’ असे नाव दिले आहेच. पण सच्चे फिटनेस प्रेमी लोक मात्र आधी व्यायाम, चालणे, जॉगिंग, दौड आणि मगच चहा, असा आपला क्रम ठेवतात. जो फिटनेसला पोषक ठरतो.
तेव्हा सकाळचा चहा घेण्यापूर्वी व्यायामाप्रमाणेच जर अन्य काही कृती केल्यात, तर तुमचं वजन निश्‍चितपणे कमी होईल. त्यामुळे वजन घटविण्यासाठी आणि फिटनेस राखण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या.
व्यायाम, योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार आदी करण्याची सर्वात योग्य वेेळ सकाळची असते, यात वादच नाही. त्याच्याने वजन घटविण्यास मोठी मदत मिळते. रिकाम्या पोटी, अगदी चहासुद्धा न घेता व्यायामाचे खूप फायदे आहेत. शिवाय मधुमेह नियंत्रित राहतो.


मधुमेह आणि ब्लड शुगर कमी करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे उपाशी पोटी अर्धा ग्लास पाण्यात अ‍ॅपल साइडर विनेगर टाकून प्यावे. याच्याने ब्लड शुगरची पातळी कमी होते. तसेच शरीरातील बॅक्टेरिया मरतात आणि हृदयविकाराचा धोका पण कमी होतो.
शरीरात पाणी साठल्याने लठ्ठपणा येतो. शरीराला जडत्व येते. त्यावर मात करण्यासाठी 1 कप पाण्यात मेथीचे दाणे भिजत ठेवा आणि हे पाणी गाळून, सकाळी उपाशी पोटी प्या.
सकाळी सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा किंवा आवळ्याचा रस टाकून, त्यामध्ये थोडेसे मध मिसळून प्यायल्यास वजन घटते.
दुधी भोपळा तर वजन घटविण्यास पोषक समजला जातो. दुधी भोपळा किसून घ्या किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या. आणि त्याचा रस बनवा. हा ज्यूस प्यायल्याने वजन हटेल व उच्च रक्तदाब देखील नियंत्रणात राहील.
मधुमेहाप्रमाणेच वाढलेले कोलेस्ट्रॉल हे देखील शरीराचे दुश्मन आहे. त्याला मारण्यासाठी लसणाच्या 1-2 पाकळ्या ठेचून त्या गरम पाण्यात टाकून प्या. म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि रोग प्रतिकारकशक्ती देखील वाढेल.
रिकाम्या पोटी अननस खा. तसेच नाश्त्यामध्ये पपईचा उपयोग करा. त्यानंतर साधारणतः 1 तासाने अन्य काही खा. म्हणजे हा उपाय अंगी लागेल.
दररोज सकाळी, उपाशी पोटी ओव्याचे पाणी प्यायल्याने गुण येईल. त्यासाठी रात्री 1 कप पाण्यात 1 चमचा ओवा भिजत घाला. त्याचे पाणी सकाळी उकळून प्या. त्यामध्ये थोडेसे मध मिसळल्यास अधिक उत्तम. या उपायाने पोटातील चरबी कमी होण्यास मदत मिळते.
काही लोकांना ओवा आवडत नाही. अशा लोकांनी रात्री 1 ते दीड चमचा जिरे पाण्यात भिजत घालावे. सकाळी हे पाणी अर्धे होईल, इतपत उकळा. नंतर ते गाळून घ्या आणि प्या. जिर्‍याच्या या पाण्याने बद्धकोष्ठाची समस्या असेल तर तीही दूर होईल. शिवाय शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर निघते.
मिक्सरमध्ये टोमॅटोचे काप टाकून त्याचा छानसा ज्यूस बनवा. या ज्यूसमध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि सैंधव मीठ घाला आणि ते प्या. वजन कमी करण्याबरोबरच आपली त्वचा निरोगी ठेवण्याचं काम ते करतं.


सकाळचा चहा किंवा कॉफी 2 ते 3 कप पिण्याची काही लोकांना सवय असते. ते फारसं हितकारक नाही. या ऐवजी ग्रीन टी पिण्याची सवय लावून घ्या. त्यामध्ये अ‍ॅन्टी ऑक्सिडंटस् असतात. अनेक संशोधनातून हे सिद्ध करण्यात आले आहे, की ग्रीन टी वजन घटविण्यास सहाय्यभूत ठरतो.
दुधाऐवजी कोरा चहा पिणे, हाही वजन घटविण्याचा चांगला उपाय आहे.
वरीलपैकी काहीही उपाय करण्यास वेळ मिळत नसेल तर दररोज सकाळी किमान 1 ते 2 ग्लास गरम पाणी प्या. त्याच्याने वजन घटेल आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकली जातील.