योगप्रेमी तेजस्विनी (Yoga p...

योगप्रेमी तेजस्विनी (Yoga practices of Tejaswini)

कोरोनाची साथ काहीशी निवळल्याने निर्बंध काहीसे शिथिल झाले. त्याचा लाभ उठवत पर्यटन स्थळं पर्यटकांनी गजबजली. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी अशीच हवापालटासाठी व तणाव दूर करण्यासाठी अलिकडेच दापोलीला गेली. कोकणातील महाबळेश्वर समजले जाणार्‍या दापोलीस मात्र तिने केवळ भटकण्यात वेळ न घालवता योगसाधनेत मग्न झाली. भारतीय पारंपरिक योगा करणे ही तिची प्रथम पसंती आहे. त्याचा तिने मोकळेपणाने अनुभव घेतला.

जय जय स्वामी समर्थ
जुने वर्ष सरत असताना, कलर्स मराठीने मजय जय स्वामी समर्थफ या पौराणिक मालिकेची सुरुवात करून नवीन वर्षाचे अनोखे स्वागत केले आहे. लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ यांचे भक्तीमय जीवनचरित्र या मालिकेत सादर करण्यात येत असून त्याची निर्मिती राकेश सारंग यांनी केली आहे. आपल्या भवतालच्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे. परमेश्वराचं नाव घेत स्वतः परमेश्वर व्हा, असा संदेश देणार्‍या सिद्धपुरुषाची ही गाथा असून ती 28 डिसेंबरपासून प्रक्षेपित होत आहे.

अनोखी पत्रभेट
आजच्या सोशल मिडियाच्या काळात पत्र लिहिणे ही गोष्ट इतिहासजमा झाली आहे. त्यामुळेच स्वलिखित पत्र देण्याला वेगळं महत्त्व मिळतं, अशी अनोखी पत्रभेट मसुख म्हणजे नक्की काय असतंफ, या स्टार प्रवाह वरील मालिकेची नायिका गौरी हिला मिळाली आहे. एका चाहत्याने तिला पत्र आणि चित्र पाठविलं. या अनोख्या गिफ्टने गौरी ऊर्फ गिरीजा प्रभू भारावून गेली. प्रेक्षकांचं प्रेम असंच राहो, अशी भावना तिनं व्यक्त केली. चाहत्यांकडून मिळणारं भरभरून प्रेम हीच कलाकारांच्या कामाची पोचपावती असते, असा अनुभव गिरीजाला आला.

नववर्षातील सुसंवाद
कोरोनाच्या महामारीने मागील वर्ष झाकोळलेले असले तरी येणारे नवे वर्ष आशादायी असेल, अशी अपेक्षा सगळे जण व्यक्त करत आहेत. ही अपेक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न मराठी चॅनल्सकडून होत असून नवीन वर्षात नवनवीन मालिका सादर करण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट दिसत आहे. त्यानुसार स्टार प्रवाह मसून सासू सूनफ हा नवीन कार्यक्रम 11 जानेवारीपासून सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सादर करीत असून त्याचे सूत्रसंचालन अभिनेता पुष्कर श्रोत्री करीत आहे. शीर्षकाने वाटले तरी ही टिपिकल सासू-सून संघर्षाची मालिका नसून त्यांच्यात सुसंवाद साधण्याची आहे. हा सुसंवाद, महाराष्ट्रातील सासू-सुनांना भेटून पुष्कर साधणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, सासू-सून हे नातं अनोखं आहे. कुटुंब आणि घर जपणार्‍या या दोघी कधी मैत्रिणी तर कधी मायलेकी असतात. अशी हळूवार नाती जपणार्‍या दोघींच्या सुसंवादाचा हा कार्यक्रम आहे.