सिद्ध आणि अवलिया सत्पुरुष शंकर महाराजांची नवी म...

सिद्ध आणि अवलिया सत्पुरुष शंकर महाराजांची नवी मालिका उद्यापासून (‘Yog Yogeshwar Jai Shankar’ A New Mythological Marathi Serial To Open From Tomorrow)

असं म्हणतात देवाजवळ पोहचण्याचा सुलभ मार्ग म्हणजे सदगुरु ! हिंदू धर्मात देवाला अतिशय महत्त्व. देव प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाही म्हणून त्याने या जगात आईला आपल्या लेकराच्या रक्षणासाठी पाठवले. पण, संकटकाळी जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, माणसाला दिशाहीन व्हायला होतं तेव्हा मात्र आपण परमेश्वराचे नामस्मरण करतो. की तो कोणत्या ना कोणत्या रुपात येऊन आपला तारणहार होईल. प्रत्येकच वेळी परमेश्वर स्वतः या पृथ्वीतलावर येऊ शकत नाही. त्यामुळेच या वाट चुकलेल्या भक्तांना मार्ग दाखविण्यासाठी त्याने अनेक रूपं धारण केली. आपल्या भारताचे भाग्य थोर ज्यामुळे या भुमीत आजवर अनेक ईश्वरतुल्य संत सत्पुरुषांनी जन्म घेतला. महाराष्ट्राला तर संतांची भूमी असे संबोधले जाते. या पवित्र भूमीवर आधुनिक काळात असा एक अवलिया होऊन गेला ज्यांनी वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या प्रांतात भक्तोद्धार केला आणि जनकल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचे भक्तगण त्यांना साक्षात शंकराचाच अवतार (Yog Yogeshwar Jai Shankar) मानतात.

मैं कैलाश का रहने वाला हू, मेरा नाम है शंकर असं बोलत ज्यांनी अनेक पीडितांच्या दु:खांचे निवारण केले, ज्यांचा भक्तसमुदाय संपूर्ण जगात विखुरलेला आहे, महादेवाचा अंश जे आहेत, असे असंख्य भक्तांचे कैवारी, त्रिलोकी आहे ज्यांची कीर्ती संतवर्य योगीराज, सद्गुरू राजाधिराज “शंकर महाराज”. एक सिद्ध आणि अवलिया सत्पुरुष शंकर महाराज यांच्या जीवनकार्यावर कलर्स मराठी घेऊन येत आहे शिरीष लाटकर लिखित योगयोगेश्वर जय शंकर” ही नवी मालिका.

Video thumbnail for YYJSS_PROMO2_1MIN_FB

“अवतरे मी युगी युगी” या वाक्याच्या आधारे शंकर महाराज आयुष्यभर कार्यरत राहिले. त्यांचे व्यक्तिमत्वही गूढ, अनाकलनीय होते. त्यामुळे त्यांच्यासंबंधी अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात. कोणत्याही संताला इतक्या विविध नावांनी ओळखले जात नसे जितक्या नावांनी महाराजांना ओळखले जाते. शंकर महाराज यांच्या जन्माबद्दल कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाही. भगवान शंकरांचे भक्त चिमणाजी आणि पार्वती यांना दाट अरण्यात एक बालक सापडला. त्यांनी त्याचे नाव शंकर ठेवले. अगदी मायेने संगोपन केले, कोडकौतुक केले.

शंकर लहानपणापासूनच ध्यानात मग्न राहणारा, नामस्मरणात दंग होणारा, कीर्तनात रमणारा शिवभक्त. कालांतराने त्यांनी जनकल्याणासाठी, आपले कार्य पूर्ण करण्याकरता गाव सोडले. त्यांच्या भक्तांनी महाराजांच्या लीला अनुभवल्या आणि कृतार्थ झाले. देवाचा शोध घेण्यापेक्षा आपल्यातील देवत्व समोर आणा, तुमच्या चुका सुधारा आणि दोषांचे निरसन करा असे सांगणारे शंकर महाराज भक्तांच्या मदतीला कायम धावून जात. लोकांना त्यांच्या महानतेची प्रचिती कशी येत गेली, मालिकेमध्ये प्रेक्षकांना शंकर महाराज आणि आई – वडिलांचे नाते, लहानपणीच्या लीला, त्यांचे बालपण कसे होते, आणखी कोणकोणती माणसं महाराजांच्या मार्गात आली हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. या पौराणिक मालिकेची सुरुवात उद्या कलर्स मराठी वाहिनीवर सायं. सात वाजता होईल.