भारताकडून ऑस्करला चुकीचे चित्रपट पाठवले जातात, ...

भारताकडून ऑस्करला चुकीचे चित्रपट पाठवले जातात, ए.आर.रेहमानने व्यक्त केली खंत (‘Wrong movies are being sent for Oscars’ AR Rahman on Indian films being nominated for Oscars)

कित्येक वर्षांनी भारतात दोन ऑस्कर पुरस्कार आल्यामुळे देश अजूनही या विजयाचा  आनंद साजरा करत आहे. आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ हे गाणे आणि सर्वोत्कृष्ट लघुपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ यांनी यंदा ऑस्कर जिंकून देशासाठी अभिमानाचे क्षण आणले. दरम्यान, दोन ऑस्कर जिंकलेल्या एआर रहमानची एक मुलाखत चर्चेत आली आहे, ज्यामध्ये त्याने ऑस्करबद्दल बरेच काही सांगितले आहे.

एआर रहमानची ही मुलाखत जानेवारी महिन्याची आहे, जी 15 मार्च रोजी एआर रहमानच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आली होती. यामध्ये एआर रहमानने ऑस्करसाठी भारतीय चित्रपटांच्या निवडीबद्दल आपले मत व्यक्त केले. ऑस्कर जिंकल्यानंतर सध्या देशभरात उत्साहाचे वातावरण असल्याने ए आर रहमानची ही मुलाखत खूप चर्चेत आहे.

या वर्षी भारताकडून अनेक चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आले होते, त्याबद्दल गायक एआर रहमानने म्हटले आहे की, भारत ऑस्करसाठी चुकीचे चित्रपट पाठवत आहे. एआर रहमान म्हणाले, “कधीकधी मी पाहतो की आमचे चित्रपट ऑस्करला जातात, पण आम्हाला पुरस्कार मिळत नाहीत. ऑस्करसाठी चुकीचे चित्रपट पाठवले जात आहेत. असे अजिबात करू नये असे मला वाटते. जर तुम्हाला पाश्चिमात्य देशांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित करायचे असेल तर तुम्हाला त्यांच्या दृष्टिकोनातून पाहावे लागेल. तिथे काय चालले आहे ते बघून मग आपल्या देशात काय चालले आहे याचा विचार करायला हवा. तिथे कोणत्या प्रकारचे चित्रपट बनत आहेत, कोणत्या प्रकारचे संगीत बनवले जात आहे. या गोष्टी पाहणे आवश्यक असते”

एआर रहमानची ही जुनी मुलाखत आहे. त्यानंतर एआर रहमाननेही दोन ऑस्कर जिंकल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले. एआर रहमान आणि गुलजार यांना 2009 मध्ये स्लमडॉग मिलेनियरमधील ‘जय हो’ गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. यानंतर, 2011 मध्ये, रहमानचे नाव डॅनी बॉयलच्या ‘127 अवर्स’साठी सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी देखील नामांकित झाले होते.