ऐश्वर्यात लोळणाऱ्या १० प्रसिद्ध कलावंतांच्या पि...

ऐश्वर्यात लोळणाऱ्या १० प्रसिद्ध कलावंतांच्या पिताजींचे साधे जीवन (World Father’s Day : Father Of These 10 Famous Bollywood Actors Are Living Simple Life)

आज फादर्स डे… मदर्स डे प्रमाणेच हा दिवसही जगभर साजरा केला जातो. वडील… आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती, जे आपल्या पाल्याला आनंदी ठेवण्यासाठी, भविष्य घडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतात. जीवनात आधार देणारे, सोबत चालणारे आणि योग्य मार्ग दाखवणारे वडील प्रत्येकासाठीच सुपरहिरो असतात. अर्थात बॉलिवूडमधील कलावंत मंडळीदेखील याला अपवाद नाहीत.

बॉलिवूडमधील काही कलावंत असे आहेत की ज्यांनी स्वकर्तृत्त्वाने या चित्रसृष्टीमध्ये आपले स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे या कलावंतांचे वडील कोणीही बडी हस्ती नसून आपल्या सारख्या सर्वसामान्य व्यक्ती आहेत आणि साधं जीवन जगताहेत. आपल्या मुलांच्या सफलतेमुळे ते खूश आहेत, तरीही त्यांनी स्वतःला त्या झगमगत्या दुनियेपासून दूर ठेवले आहे. ऐश्वर्यात लोळणाऱ्या आपल्या मुलांसोबत न राहता अजूनही ते आपल्या साधेपणात समाधानी आहेत. आज फादर्स डे च्या निमित्ताने आपण या कलावंतांच्या वडिलांबद्दल जाणून घेऊया…

१.मनोज वाजपेयी

सध्या आपल्या ‘द फॅमिली मॅन-२’ या वेब सीरिजमुळे मनोज वाजपेयी अतिशय लोकप्रिय ठरले आहेत. मनोज वाजपेयी यांनी कोणत्याही वरदहस्ताशिवाय बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या आत्तापर्यंतच्या चित्रसृष्टीतील कमालीच्या योगदानामुळे ते नवीन कलाकारांचे प्रेरणास्रोत बनले आहेत. तेव्हा नाही म्हटलं तरी मनोज वाजपेयी एक अत्यंत समृध्दीचे जीवन जगत आहेत असे म्हणावयास हवे. असे असताना या सुपरस्टारचे वडिल राधाकांत वाजपेयी मात्र आजही आपल्या गावाकडे मूलभूत सुखसोयींसह सामान्यपणे जीवन जगत आहेत

२. पंकज त्रिपाठी

मिर्जापुर आणि सेक्रेड गेम्स यांसारख्या वेब सीरिजमधून आपल्या अभिनयाचा जबरदस्त प्रत्यय आणून अभिनेता पंकज त्रिपाठीने लाखो चाहत्यांचे हृदय जिंकले आहे. वेब सीरिजच्या आधी त्याने अनेक सिनेमांमध्येही काम केले आहे. गँग ऑफ वासेपूर या चित्रपटातील पंकजचा अभिनय लोकांच्या चांगला लक्षात राहिला आहे. तुम्हाला माहीत आहे का, हा प्रतिभावंत अभिनेता बिहारमधील एका छोट्याशा गावात राहणारा आहे. पंकजच्या वडिलांचं नाव पंडित बनारस त्रिपाठी असे असून त्यांना आपल्या मुलाचा अभिमान आहे. तरीही पंकजचे आई-वडिल त्याच्यासोबत मुंबईला राहत नाहीत, ते गोपालगंज येथील बेलसंग गावात राहतात. त्याचे वडील शेतकरी आहेत. आपल्या मुलाला अभिनेता म्हणून ओळख मिळण्यापूर्वी त्यांची जी साधी राहणी होती, आजही ते तसेच राहत आहेत.

३. सिद्धांत चतर्वेदी

सिद्धांत चतर्वेदी याने ‘गली बॉय’ या चित्रपटातून बॉलिवूड मधे पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या एमसी शेर या भूमिकेस प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शवली. सिद्धांतचे वडील चार्टर्ड अकाऊंटंट आहेत आणि त्याची आई गृहिणी आहे. स्वतःच्या हिमतीने हिंदी चित्रसृष्टीत आपलं स्थान मिळवणारा सिद्धांत मुंबईच राहतो, तरीही त्याचं कुटुंब मात्र बॉलिवूडच्या चमचमत्या दुनियेपासून स्वतःला चार हात लांब ठेवून साधं जीवन जगणे पसंत करताहेत.

४. आयुष्मान खुराना

बॉलिवूडची हिट मशीन अशी ओळख असलेला आयुष्मान खुराना स्वभावाने अतिशय शांत आणि हुशार अभिनेता आहे. त्याच्या वास्तव अभिनयावर चाहते फिदा आहेत. हिंदी चित्रसृष्टीत येण्यापूर्वी आयुष्मानने टी.व्ही. वरील मालिका आणि रिॲलिटी शोमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करेल, असा चित्रपट मिळेपर्यंत आयुष्मानने अनेक चित्रपट नाकारले आणि विकी डोनर हा चित्रपट साइन केला, असे त्याने स्वतःच एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. आयुष्मान बहुतांशी सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट करतो. आपल्यावर वडिलांचा प्रभाव आहे, असे तो म्हणतो. त्याचे वडील ज्योतिषी आहेत. आपल्या वडिलांच्या सांगण्यावरूनच त्याने आपल्या नावामध्ये एक्स्ट्रा एन घातला होता. त्याचे वडील अजूनही चंदीगढ येथील त्याच गावात राहतात, जेथे आयुष्मानचा जन्म झाला होता.

५. कार्तिक आर्यन

स्वकर्तृत्त्वाने नावारुपास आलेला अभिनेता कार्तिक आर्यन याचा बॉलिवूडमध्ये कोणी गॉड फादर नाही. आपल्या अभिनय कौशल्याने त्याने बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांमध्ये स्वतःची जागा मिळवली आहे. त्याचं नाव कार्तिक तिवारी आहे आणि कोणत्याही फिल्मी घराण्याशी लांबलांबपर्यंत त्याचं ओळखीचं कोणी नाही.

कार्तिकचे वडिल मनीष तिवारी ज्योतिषी आहेत आणि आई गायनो आहे. कार्तिकने प्यार का पंचनामा या चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने अनेक चित्रपट केले आहेत. चित्रपटात येण्यापूर्वी तो इंजिनिअरिंग करत होता. परंतु अभिनयाच्या आवडीमुळे मध्येच अभ्यास सोडून तो अभिनेता बनला. मुलगा सुपरस्टार असूनही त्याच्या आई-वडिलांना जमिनीवर राहणेच पसंत असल्याने मध्य प्रदेशमध्ये ते सर्वसामान्यांसारखे जीवन जगत आहेत.

६. सिद्धार्थ मल्होत्रा

‘स्टूडंट ऑफ द ईयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आलेल्या सिद्धार्थ मल्होत्राचे वडिल नेव्हीमध्ये ऑफिसर आहेत आणि प्रकाशझोतापासून दूर राहणेच पसंत करतात.

७. रणदीप हुड्डा

रणदीप हुड्डासारखा अष्टपैलू अभिनेत्याला कोणतंही फिल्मी बॅकराऊंड नाही. त्याचे वडील सर्जन आहेत. रणदीप आपल्या वडिलांच्या एवढा जवळ आहे की अगदी शुल्लक गोष्टींसाठीही तो वडिलांचा सल्ला घेतो.

८. अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माने यश राज यांच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट यशस्वी ठरला, त्यानंतर अनुष्काने कधीही मागे वळून पाहिले नाही. आज ती एक यशस्वी अभिनेत्री आहे. अनुष्काचे वडील अजय कुमार शर्मा भारतीय सेनादलामध्ये ऑफिसर होते, आता ते सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर ते आपल्या पत्नीसोबत अतिशय साधं जीवन जगत आहेत.

९. आर. माधवन

हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखविणाऱ्या आर. माधवनचे वडील रंगनाथन हे टाटा स्टील कंपनीमध्ये व्यवस्थापन कार्यकारी आहेत. माधवन देखील आपल्या वडिलांप्रमाणे अतिशय हुशार आहे

१०. रणबीर सिंह

सिंबा, पद्मावत, बँड बाजा आणि बारातसह अनेक हिट चित्रपट देणाऱ्या रणबीर सिंहने चित्रसृष्टीत स्वकष्टाने नाव कमावले आहे. त्यालाही कोणतंही फिल्मी बॅकराऊंड नाही. त्याच्या वडिलांचा फळांचा व्यवसाय आहे. अन्‌ त्यांना बॉलिवूडच्या झगमगाटात काहीही रस नाही. रणबीर सुपरस्टार बनला तरीही त्याच्या वडिलांची राहणी मात्र साधीच आहे.