गाजलेल्या काही भारतीय महिला शास्त्रज्ञ (World F...

गाजलेल्या काही भारतीय महिला शास्त्रज्ञ (World Famous Indian Female Scientists)

संशोधन हे सोपे वा चाकोरीबद्ध काम नव्हे. त्यासाठी विलक्षण बुद्धिमत्ता तर हवीच, पण त्याचबरोबर जिद्द, चिकाटी आणि एक झपाटलेपणही आवश्यक असते. हे सर्व गुण स्त्रियांमध्येही असतात. म्हणूनच 8 मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने भारतातील गाजलेल्या काही निवडक महिला शास्त्रज्ञांचा हा संक्षिप्त परिचय.
यंदाचा मार्च महिना मोठा वैशिट्यपूर्ण आहे. याच महिन्यात आंतरराष्ट्रीय महिलादिन (8 मार्च ) येतो आणि यंदाचे अ. भा. मराठी साहित्य संमेलनही नाशिक मुक्कामी संपन्न होत आहे. त्याच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकरांसारखा एक मोठा भारतीय शास्त्रज्ञ-लेखक -चिंतक आहे. म्हणून काही निवडक भारतीय महिला शास्त्रज्ञ आणि त्यांचे कार्य सुबोधपणे प्रस्तुत लेखात मांडलेले आहे. अर्थात आता विज्ञान-संशोधन या क्षेत्रात भारतीय महिलांचे प्रमाण वाढते आहे हे खरे. परंतु तरीही जागतिक स्तरावर दिल्या जाणार्‍या विख्यात नोबेल पुरस्कार विजेत्यांची आजवरची सुमारे हजारभर नामवंतांची यादी पाहिली तर त्यात महिलांचे प्रमाण जेमतेम पाच टक्के एवढेच भरते.
भारतीय संदर्भात साहित्य, समाजसेवा, विविध कला, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, संगीत, बँकिंग, उद्योजकता यामध्ये जशी स्त्रियांची कामगिरी आणि संख्या लक्षणीय आहे, तशी ती विज्ञान-तंत्रज्ञान-संशोधन या क्षेत्रातून दिसत नाही, म्हणूनच काही निवडक गाजलेल्या भारतीय महिला शास्त्रज्ञाचा हा संक्षिप्त परिचय प्रेरक आणि उदबोधक ठरावा.

डॉ. आनंदीबाई  जोशी :

यामध्ये सर्वात प्रथम नाव आठवते ते डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांचे. भारतातून अमेरिकेत जाऊन पेनसिल्व्हेनिया वुमेन मेडिकल कॉलेजातून एम. डी. ही आधुनिक वैद्यकशास्त्राची पदवी मिळवणार्‍या पहिल्या महिला डॉक्टर. इ. स. 1865 ते 1887 असे जेमतेम बावीस वर्षांचेच आयुष्य त्यांना लाभले. तत्कालीन कर्मठ व सनातनी भारतीय समाजातील स्त्रिया कितीही आजारी पडल्या तरी पुरुष डॉक्टरांकडे जात नसत. अशा त्या काळच्या सामाजिक वातावरणात डॉ. आनंदीबाईंना दीर्घायुष्य लाभते तर तत्कालीन स्त्री आरोग्याबाबत त्यांना फार भरीव कार्य निश्चितच करता आले असते. पण त्या अल्पायुषी ठरल्या तरी त्यांचे विचार, स्त्रीच्या आरोग्यासाठी कार्य करण्याची त्यांची कळकळ अजोडच म्हटली पाहिजे.
सुदैवाने सुमारे सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वीच्या या भारतीय महिला डॉक्टरांविषयी अमेरिकन लेखिकेने चरित्र लिहिलेले आहे. मराठीतही त्यांच्याविषयी कादंबरी, नाटक, टीव्ही मालिका, चित्रपट अशा प्रसारमाध्यमातून त्यांच्या आयुष्याचा पट मांडला गेलेला आहे. त्यामुळे त्यांचे प्रेरक चरित्र भारतीय समाजाला कळले. महाराष्ट्र शासन महिला स्वास्थ्याबाबत कार्य करणार्‍यांना आनंदीबाईंच्या नावे फेलोशीपही देते. ज्ञानविज्ञान आणि आरोग्य क्षेत्रात कार्य केलेल्या भारतीय महिला शास्त्रज्ञांमध्ये म्हणूनच डॉ. आनंदीबाई जोशी यांना अग्रपूजेचा मान आपण दिला पाहिजे.

वैद्यकीय शास्त्राशी जवळून निगडित असलेले विषय म्हणजे सायंटॉलॉजी ( कोषाशास्त्र ), जेनेटिक्स (आनुवांशिकीशास्त्र). या विषयांना आपले संपूर्ण जीवन अर्पण करणार्‍या भारतीय महिला शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. जानकी अम्मल :

पद्मश्री जानकी अम्मल : इ . स. 1897 ते 1984 असे चांगले सत्त्याऐंशी वर्षांचे दीर्घायुष्य जानकी अम्मल या मूळच्या केरळ प्रांतात जन्मलेल्या भारतीय शास्त्रज्ञ महिलेस लाभले. त्या अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातून वनस्पतिशास्त्रात पी. एच .डी झालेल्या. भारतात परतल्यावर त्यांनी ’ऊस’ या नगदी पिकाच्या जेनिटिक्सवर अमूल्य असे संशोधन केले. त्याच विद्यापीठातून त्यांनी नंतर डी. एस्सी. ही सर्वोच्च पदवीही मिळवली. वनस्पतिशास्त्राच्या देशातील काही प्रमुख संस्था – बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, सेंट्रल बॉटनिकल लॅबोरेटरी, इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स, भाभा परमाणू संशोधन केंद्र यामध्ये त्यांनी संस्था उभारणीचे, अध्यापनाचे आणि संशोधनाचे कार्य केले. केरळमधील अनेक औषधी वनस्पती, जडीबुटी, दुर्मीळ उपयुक्त वनस्पती यावर त्यांनी संशोधन केले. ऊस, जव, मका अशा अनेक पिकांच्या उत्तमोत्तम संकरित जाती विकसित केल्या. त्यामुळे या पिकांचे उत्पादन वाढले, शेतकर्‍यांचा फायदा झाला. जानकी अम्मल यांना भारत सरकारने ’पद्मश्री’ही दिली तर पर्यावरण मंत्रालयाने त्यांच्या नावाने ’नॅशनल अ‍ॅवॉर्ड ऑफ टेक्सोनॉमी’ची घोषणा केली. वनस्पतिशास्त्र, अनुवांशिकीशास्त्र, कोषाशास्त्र या विषयांबाबत त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. अत्यंत साध्यासुध्या राहणीमानाच्या जानकी अम्मल यांनी अविवाहित राहून आयुष्यभर स्वतःला संशोधन कार्यात समर्पित केले.

अशाच प्रकारच्या आणखीन एक महिला वनस्पतिशास्त्र, जीवरसायन शास्त्र या विषयांप्रति आयुष्यभर समर्पित राहिल्या. त्यांचे नाव कमला सोहोनी. स्त्रियांना संशोधन केंद्रातून काम करण्याचा, संशोधन करण्याचा मार्ग सोहोनी यांच्यामुळेच आधुनिक काळात प्रशस्त झाला असे मानले जाते.

कमला सोहोनी : इ . स. 1912 ते 1998 हा कमला सोहोनी यांचा जीवनकाल. विज्ञाननिष्ठ, उच्चशिक्षित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्रसिद्ध नोबेल पुरस्कार विजेते भारतीय शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांचे थेट मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यातून त्यांनी बायोकेमिस्ट्री विषयात मौलिक संशोधन कार्य केले. दूध, भुईमूग आणि डाळ या तीन खाद्यपदार्थातील प्रोटिन्सबाबतचे त्यांचे संशोधन जगभर गाजले. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातही संशोधन कार्य केले.प्रोटिन्सबाबतच्या त्यांच्या संशोधनामुळे कमी खर्चात वाढाळू वयाची मुले, गर्भवती महिला, कुपोषित लोक यांना सकस प्रोटिन्स मिळण्याचे ज्ञान जगाला झाले. संशोधनाबद्दल त्यांना ’राष्ट्रपती पुरस्कारा’सह अन्यही अनेक पुरस्कार व मानसन्मान मिळाले. त्यांनी मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे काही काळ संचालकपदही भूषविले. न्यूट्रिशन अर्थात पोषणशास्त्र यातील त्यांचे योगदान मोठे आहे.

पद्मभूषण असीमा चटर्जीं : औषधी वनस्पतींचा वापर करून विविध आजारांवर औषधी तयार करण्याबाबत ज्यांनी संशोधन केले आणि औषधी विकसित केल्या अशा एक महत्त्वाच्या भारतीय महिला शास्त्रज्ञ म्हणजे असीमा चटर्जीं. मलेरियासह अनेक आजारांवरची औषधी व रसायने असीमा यांनी तयार केली. त्यातील अनेक पेटंट औषधी आज अनेक ख्यातनाम औषधी कंपन्यांतर्फे उत्पादित केली जातात. अनेक आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकांनी असीमा यांच्या कार्याची व योगदानाची प्रशंसा केलेली आहे. त्यांनी संपादित केलेले भारतीय वनौषधींवरचे सहा ग्रंथ म्हणजे एक फार मोठा मौलिक ठेवा आहे. अनेक मानसन्मान, पुरस्कार त्यांना मिळाले. राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेवरही घेतले. ’पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले.

राहीबाई पोथेरे :

औषधीशास्त्र, आरोग्यशास्त्र, कृषिशास्त्र यामध्ये भारतीय महिला शास्त्रज्ञाचे मोठे योगदान आहे. त्यात अल्पशिक्षित राहीबाई पोथेरे या आदिवासी महिलेचाही आवर्जून उल्लेख केला  पाहिजे. नगर-नाशिकच्या आदिवासी डोंगरी पट्ट्यात राहणार्‍या राहीबाईंचे शिक्षण फारसे झालेले नाही. पण अनेक दुर्मीळ औषधी वनस्पती, पिके यांची बीजे जतन करण्याचे दुर्मीळ कार्य त्यांनी केलेले आहे. म्हणून त्यांनाही शास्त्रज्ञच म्हटले पाहिजे. त्यांचा ’बीजमाता’ म्हणून गतवर्षीच सत्कार करण्यात आलेला आहे. त्यांच्यासारख्या अनेक अडाणी, उच्चशिक्षित स्त्रिया कृषिक्षेत्रात छोटीमोठी उपकरणे, औजारे, शेतीपद्धती यावर काम करतात. त्याही एका अर्थी शास्त्रज्ञच असतात.

आधुनिक काळातील काही अतिप्रगत विज्ञानक्षेत्रे म्हणजे अणुविज्ञान, अंतरिक्ष संशोधन, नुक्लियरफिजिक्स, स्पेसलॉ इत्यादी. त्यात काम करणार्‍या काही भारतीय महिला शास्त्रज्ञ अशा आहेत.
डॉ. विद्या कोठेकर : डॉ. विद्या कोठेकर या मूळच्या नागपूरच्या. मास्को येथील इन्स्टिट्यूट ऑफ नुक्लियर फिजिक्स या प्रख्यात संस्थेत काम करून त्यांनी आपली डॉक्टरेट पूर्ण केली. अणुशक्ती केवळ विध्वंसाचेच काम करीत नाही. या अमोघ शक्तीचा वापर मानवी जीवन अधिक सुखकर करण्यासाठी कसा करायचा यावर त्यांचे संशोधन चालू असते.
भारतातील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अशा अग्रगण्य संस्थातून डॉ. विद्या कोठेकर यांचे संशोधन चालू असते. जगाच्या संशोधक शास्त्रज्ञ वर्तुळातील आज ते एक महत्त्वाचे नाव आहे.
अंतरिक्ष संशोधन क्षेत्रात कार्यरत महिलांमध्ये (कै.) कल्पना चावला हे नाव मशहूर आहेच.

1 फेब्रुवारी 2003 रोजी कोलंबिया अंतरिक्ष यानानं पृथ्वीवर परतत असताना अपघात होऊन त्यात अवघ्या एकेचाळिस वर्षांच्या कल्पना चावलांचा दुर्दैवी अंत झाला आणि जग एका जिगरबाज महिला शास्त्रज्ञाला कायमचे मुकले.
माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, कचरा व्यवस्थापन अशा अनेक विषयांमध्ये आज शिक्षण घेणार्‍या, संशोधन करणार्‍या महिलांची संख्या वाढली आहे. त्यातूनच मानवजातीचे या पृथ्वीतलावरील जीवन सुकर व उन्नत करणारे संशोधन या महिला शास्त्रज्ञांद्वारे पुढे येईल. तशा हजारो संशोधन प्रकल्पांवर जगभर आणि भारतातही संशोधन चालू आहे. कोरोना आणि इतर महामारी, जैवतंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र यातही संशोधन करणार्‍यांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे. संशोधन हे सोपे काम नव्हे . चाकोरीबद्ध काम नव्हे. त्यासाठी विलक्षण बुद्धिमत्ता तर हवीच, पण त्याचबरोबर जिद्द, चिकाटी आणि एक झपाटलेपणही आवश्यक असते. हे सर्व गुण स्त्रियांमध्येही असतात. त्यामुळे आगामी काळात संशोधन क्षेत्रात अनेक भारतीय महिला शास्त्रज्ञांची नावे तेजाने तळपू लागतील यात वाद नाही.
– सुधीर सेवेकर