जागतिक कर्करोग दिन विशेष : स्तन आणि गर्भाशय मुख...

जागतिक कर्करोग दिन विशेष : स्तन आणि गर्भाशय मुख या कॅन्सरच्या निदान आणि तपासणीचे महत्व (World Cancer Day Special : Importance of Symptoms And Treatment Of Breast And Cervix Cancer)

कोव्हीड १९ महामारीचा मुकाबला करण्यासाठी साऱ्या जगाचे लक्ष केंद्रित झालेले असताना आणि त्याच्या पुढच्या व्हेरीएंटचा मुकाबला करण्यासाठी तयारी करत असताना अभावितपणे आपले इतर गंभीर आजारांकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. असाच एक सायलेंट किलर रोग म्हणजे कॅन्सर. या गंभीर आजाराबाबत जनजागृती करणं आणि या आजाराने ग्रस्त रुग्णांना मदत करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं या उद्देशाने दरवर्षी ४ फेब्रुवारी या दिवशी जागतिक कॅन्सर दिन साजरा केला जातो.

जगभरात रोगांमुळे होणाऱ्या सर्वसाधारण मृत्युच्या दरात कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी १.१६ दशलक्षाहून अधिक कॅन्सर रुग्णांची नोंद होते. त्यापैकी साधारण ५.७ लाख रुग्ण पुरुष तर साधारण ५.८७ लाख रुग्ण स्त्रिया असतात. असे असले तरी, कोव्हीड १९ची लागण होण्याच्या भीतीने कॅन्सर तपासणी आणि त्यासाठी सुचविलेल्या चाचण्या करण्यात कमालीची घट झाली असल्याचे अनेक तज्ज्ञांना आढळून आले आहे.

या विषयासंबंधी मदत करू शकणारे उपाय कोणते आहेत, त्याची माहिती देत आहेत कृष्णा डायग्नोस्टिक्सचे पॅथॉलॉजी सी.ओ.ओ. डॉ. मनीष दत्तात्रय कारेकर.

कॅन्सरचे लवकर निदान होणे का महत्वाचे आहे?

कॅन्सरच्या सेल्सची वाढ आणि प्रसार कितपत झाला आहे आणि त्यांचे स्वरूप काय आहे हे तज्ज्ञाला कळण्यासाठी रुग्णाला काही विशिष्ट चाचण्या आणि तपासण्या कराव्या लागतात. या चाचण्यांमुळे कॅन्सर वा ट्युमर ओळखता येतो आणि शरीरात त्याचा किती वेगाने प्रसार होत आहे हे समजायलाही मदत होते.

स्तनांच्या कॅन्सरचे वेळेत निदान होण्यासाठी उपलब्ध असलेल्या चाचण्या

कोणत्याही वैद्यकीय मार्गदर्शनासाठी धाव घेण्याआधी, स्तनांची नियमितपणे स्वतःची स्वतः तपासणी करणे (ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन – बीएसई) ही सर्वोतम पद्धत आहे. स्तनांमध्ये जर काही अनैसर्गिकपणा आढळून आला जसे की दुखणारी किंवा न दुखणारी गाठ, स्तनाच्या आकारात झालेला बदल किंवा त्वचेवर अचानक उद्भवलेले तीळ, चामखीळ, गाठीच्या वर असलेली त्वचा फिकुटणे असे काही आढळून आले तर; तातडीने वैदकीय तज्ज्ञांची भेट घेऊन सल्लामसलत करायला हवी.

स्वयं तपासणीच्या जोडीला, पुढे नमूद करण्यात आलेल्या आधुनिक तपासण्यांपैकी कोणतीही एक पद्धती वापरून ब्रेस्टकॅन्सरचे निश्चित निदान करणे शक्य होते.

मॅमोग्राम : यामध्ये स्तनामध्ये निर्माण झालेल्या गाठींचे स्थान शोधून काढले जाते. मॅमोग्राम ही स्तनांची क्ष किरण तपासणी असते ज्यामध्ये अनैसर्गिक गाठी किंवा गुठळ्याचे नेमके स्थान शोधून निश्चित केले जाते.

अल्ट्रासाऊंड चाचणी : मॅमोग्राम काढल्यानंतर, स्तनांची अल्ट्रासाऊंड चाचणी ही देखील कॅन्सर ओळखण्यासाठी आणि उपचारांची पुढील दिशा ठरविण्यासाठी करण्यात येणारी एक तपासणी आहे. या चाचणी पद्धतीत ध्वनी लहरी सोडून स्तनाची किंवा शरीराच्या आजाराने प्रभावित भागाची स्कॅन प्रतिमा मिळवली जाते; गाठीचे किंवा ट्युमरचे स्वरूप समजून घेण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग होतो.

बायोप्सी : स्तनांच्या चाचणीच्या (मॅमोग्राम) अहवालातून गाठी आहेत किंवा नाही हे कळून येते. बायोप्सी करणे हा त्यानंतरचा टप्पा असतो, ज्यामध्ये शरीराच्या प्रभावित झालेल्या भागातून सुईच्या सहाय्याने एक छोटासा तुकडा नमुना म्हणून काढून घेतला जातो आणि पुढील परीक्षणासाठी पाठवला जातो. या पुढच्या परीक्षण अभ्यासातून गाठ कॅन्सरची आहे की नाही हे समजून घेण्यास मदत होते; ज्यायोगे रूग्णासाठी पुढील नेमकी उपचारपद्धती ठरविण्यास सहाय्य मिळते.

सर्वीकल कॅन्सरचं वेळेत निदान करण्यासाठी उपलब्ध चाचण्या

गर्भाशय मुखाचा कॅन्सर (सर्वीकल कॅन्सर)ला प्रतिबंध करता येतो. आरंभीच्या काळात गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कॅन्सरमध्ये कुठलीही लक्षणे किंवा चिन्हे दिसून येत नाहीत, परंतु सर्वीकल कॅन्सरची वाढ हळूहळू नकळतपणे होत राहते आणि आजार निश्चितपणे प्रेमलिग्नन्ट स्टेज (कॅन्सरपूर्व) टप्प्यावर जाऊन पोहोचतो. प्रीमॅलीग्नंट स्टेजचे पेशीमध्ये प्रवेश न करता करण्याजोग्या (नॉन इन्व्हेसीव्ह) प्रकाराने निदान करता येऊ शकते. कॅन्सरपूर्व झालेल्या जखमेसाठी प्रभावी उपचार उपलब्ध असून कॅन्सरपूर्व टप्प्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आपल्याकडे पुष्कळ मुभा असते.

स्क्रीनिंग चाचणी

पॅप स्मिअर: पॅप स्मिअरला पॅप चाचणी म्हणूनही संबोधिले जाते. ही महिलांमधील सर्वीकल कॅन्सरची चाचणी करण्याची एक पद्धती आहे. पॅप स्मिअरमध्ये तुमच्या ग्रीवेमधून – गर्भाशयाच्या अगदी खालच्या, योनीच्या वरच्या जागी असलेल्या निमुळत्या भागातून पेशी गोळा केल्या जातात. एलबीसी ही पॅप स्मिअरची आधुनिक पद्धती असून त्याद्वारे चाचणीचा दर आणि चाचणीची विश्वासार्हता यामध्ये लक्षणीय वाढ होते.

एलबीसी आणि एचपीव्ही सहचाचणी: एचपीव्ही हा ह्यूमन पापिल्लोम विरस वाढ घडवून आणणारा विषाणू (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) असून तो गर्भाशयाच्या सर्वीकल कॅन्सरला कारणीभूत ठरतो. एचपीव्हीची सहचाचणी एलबीसीसोबत करता येते, ज्यामधून आपल्याला महिलेच्या शरीरात एचपीव्ही अस्तित्वात आहे, की नाही के जाणून घेता येते. एचपीव्हीचा अभाव असल्यास पाच वर्षांसाठी कॅन्सरचा धोका कमी आहे असे मानले जाते.

खबरदारी : लसीकरणामुळे ज्याला प्रतिबंध करता येऊ शकतो अशा कॅन्सरच्या प्रकारापैकी हा कॅन्सर आहे. मुलींना वयाच्या ११ व्या वर्षानंतर लस देता येऊ शकते.

आपल्या शरीरात होत असलेल्या बदलांबाबत माहिती घेत राहणे आणि जागरूक राहणे हा कॅन्सरवर वेळेत मात करण्याचा सर्वात सुयोग्य मार्ग आहे. लवकरात लवकर निदान होणे ही उपचारपद्धतीचा प्रकार आणि दिशा यामध्ये सुधार करण्यासाठीची गुरुकिल्ली आहे, ज्यामुळे आजारातून बरे झाल्यानंतर उत्तम दर्जाचे आयुष्य जगण्याच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकते.