जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (World ...

जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (World Book Day)

मनानं, विचारानं श्रीमंत करणारी वाचनाची आवड

आपण आवड म्हणून वाचन करतो. परंतु आपली ही आवड आपल्या नकळत आपली बुद्धी तल्लख करून आपलं व्यक्तिमत्त्व घडवत असते.
वाचन करणारी माणसं मनानं, विचारानं आणि कृतीनंंही श्रीमंत होतात. ‘तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व घडवायचं असेल तर वाचन करा’, असं लोकमान्य टिळकांनी म्हटलेलंच आहे. जगातील सर्व मोठी माणसं वाचनानेच घडलीत आणि यापुढेही घडतील.
बुद्धीची मशागत


वाचनामुळे आपली स्मरणशक्ती वाढते. आपल्या स्नायूंना बळकटी येण्याकरिता जशी व्यायामाची गरज पडते, त्याप्रमाणे बुद्धीच्या मशागतीसाठी वाचनाची मदत होते. वाचनामुळे मेंदूला चालना मिळते. नवनवीन शब्दांमुळे त्याच्यात प्रगती होत असते. एवढेच नाही, तर वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहिती मिळते, तसेच ज्ञानात भर पडते
तणावमुक्ती
वाचन करताना आपण आपल्या चिंता, ताण-तणाव विसरून पुस्तकातील विषयाशी एकरूप होत असतो. वाचन आपल्याला समृद्ध जीवनाचा सकारात्मक विचार करायला शिकवते. आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींबद्दलचे मार्गदर्शन यामुळे होते. आपल्याला काही वेळेस अतिशय अवघड वाटणार्‍या गोष्टी सुलभ होऊन जातात आणि आपण तणावमुक्त होतो.
कल्पनाशक्तीला वाव
सध्या आपल्या आसपास दूरदर्शन, संगणक व त्यावर खेळले जाणारे खेळ, मोबाईलवरील खेळ अशी अनेक मनोरंजनाची साधनं उपलब्ध आहेत. ही साधनं आपल्याला मानसिक आनंद देतात, परंतु वाचनामुळे आपण लेखकाने लिहिलेल्या ठिकाणी जाऊन आल्याचा आनंद मिळतो. आपण त्यातील प्रत्येक पात्र जगत असतो. आपण आपल्या विश्‍वातून एका वेगळ्याच काल्पनिक जगात जातो.
एकाग्रता वाढते
बराच वेळ एकाच जागी बसून वाचन करण्याच्या सवयीमुळे आपली एकाग्रता वाढते. वाचन करता करता आपली त्या विषयाबद्दलची उत्सुकता वाढत जाते आणि मग ते वाचून संपेपर्यंत आपण केवळ त्या ठिकाणीच लक्ष केंद्रित करतो. आपल्या संवेदनशीलतेची देखील ही कसोटी असते.
विचारशक्ती वृद्धिंगत होते
कथा-कादंबर्‍या, गूढ कथा इत्यादीच्या वाचनामुळे हळूहळू मग आपल्याला पुढं काय असू शकतं याबद्दलची कल्पना यायला लागते. याचाच अर्थ वाचनामुळे आपली वैचारिक पातळी वृद्धिंगत
होऊ लागते. आपला विश्‍लेषणात्मक तसेच कलात्मक दृष्टिकोन तयार होतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण तो विचारपूर्वकच घेतो.