‘आई कुठे काय करते’ च्या सेट...

‘आई कुठे काय करते’ च्या सेटवर फिटनेसचा फंडा (Work Out By Actresses On The Sets Of ‘ Aai Kuthe Kay Karate’)

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. कलाकारांचे दमदार अभिनय आणि तितक्याच ताकदीचे संवाद आणि दिग्दर्शनामुळे मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या या मालिकेचं शूटिंग सिल्वासामध्ये सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण टीम एकत्र एका छताखाली एका कुटुंबासारखी राहत आहे. शूटिंगसोबतच सकाळच्या नाश्ता, जेवणापासून ते अगदी व्यायामापर्यंत सर्व काही ठरवून एकजुटीने केलं जातंय.

या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले, अपूर्वा गोरे आणि गौरी कुलकर्णी म्हणजेच मालिकेतली इशा आणि गौरी या तिघी सेटवर न चुकता व्यायाम करतात. यांच्या फिटनेसच्या फंड्यामध्ये योगाच्या आसनांसोबतच निसर्गरम्य वातावरणात दररोज तासभर चालणं आहे. शूटिंग संपलं की सर्वांचं एकत्र डिनर आणि त्यानंतर वॉक असं ठरलेलं आहे. तसेच शूटिंगमधून वेळ काढत हॉटेलच्या रुममध्येही त्या ठरवून व्यायाम करतात. लॉकडाऊनमुळे सध्या जिम वैगेरेचा पर्याय नसल्यामुळे उपलब्ध गोष्टींचा सदुपयोग करण्याचा हा फंडा आरोग्यदायी तसेच कौतुकास्पद आहे.

त्यात सेटवरील वातावरण देखील खूपच आल्हाददायक आहे. सेटच्या आजूबाजूला खूप झाडं आहेत. त्यामुळे कलाकारांना मोकळी आणि शुद्ध हवा अनुभवता येतेय. सध्याच्या घडीला ऑक्सिजनचं महत्त्व आपण सर्व जाणतोच. त्यामुळे शूटिंगच्या निमित्ताने ही हिरवाई अनुभवायला मिळतेय याचा या कलाकारांना आनंद आहे. एवढेच नव्हे तर सेटवर सर्वांच्या डाएटचीही काळजी घेतली जातेय.

आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणताही खंड पडू नये यासाठी ही कलाकार मंडळी आपल्या घरापासून दूर राहून मालिकेचे शूटिंग करत आहेत. हे करत असतानाच सर्वजण स्वतःच्या आरोग्याची आणि फिटनेसची काळजी घेत आहेत, हे खरोखर स्तृत्य आहे.