खाण क्षेत्रात आता महिला इंजिनिअसर्ची लक्षवेधी क...

खाण क्षेत्रात आता महिला इंजिनिअसर्ची लक्षवेधी कामगिरी (Women’s Day Special : Women Engineers Take A Dynamic Leap In Underground Mining Sector)

खाणीत काम करणे अतिशय कष्टाचे व जोखमीचे असते. प्रतिकूल हवामानात, जिवाची बाजी लावत खाणीत काम करावे लागते. त्यामुळे आतापावेतो या क्षेत्रात पुरुष कामगार, इंजिनियर्स आणि अधिकारी यांचे वर्चस्व दिसून येत होते. परंतु या पुरुषी वर्चस्वाला छेद देऊन महिला इंजिनियर्सनी या खाण क्षेत्रात उडी घेत, आपण कशातही कमी पडत नसल्याचे सिद्ध केले आहे.

राजस्थान राज्यातील हिंदूस्थान झिंक लिमिटेड, या कंपनीने महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करून, त्यांचे मनोबल वाढवत भूमिगत खाण व्यवस्थापनाची जबाबदारी दिलेली आहे. त्यानुसार सदर कंपनीमध्ये २० महिला इंजिनियर्स कार्यरत आहेत. खाण ऑपरेशन्स सह विविध विभागाचे नेतृत्व या महिला सक्षमतेने करत असल्याचे आढळून आले आहे.

सदर कंपनीत कार्यकारी कर्मचाऱ्यांमध्ये १८.७ टक्के महिलांचा समावेश आहे आणि समुहातील विविध विभागातील नेतृत्वाच्या भूमिकेत ५० टक्के त्यांचा समावेश आहे. लिंग, भौगोलिक, सांस्कृतिक आणि वांशिक विविधतेला प्रोत्साहन देण्यात आपली कंपनी नेहमीच आघाडीवर असल्याचा दावा हिंदुस्थान झिंक कंपनीने केला आहे. स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी व सर्वसमावेशक संस्कृती विकसित करण्याच्या या कामगिरीत सर्व कार्यकारी व व्यवस्थापन समित्यांमध्ये ३० टक्के विविधता प्राप्त करण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जाते. भूमिगत खाण क्षेत्रात महिलांना नियुक्त करणारी ही भारतातील पहिली कंपनी असल्याचे सांगितले जाते.