महिला दिन विशेष : स्मार्ट वुमन कालची व आजची (Wo...

महिला दिन विशेष : स्मार्ट वुमन कालची व आजची (Women’s Day Special: The Past Present Of Smart Woman)


आजची स्त्री, पुरुषांनी गाजवलेली सर्व कार्यक्षेत्रे स्वतः तेवढ्याच समर्थपणे गाजवत आहे. सर्व तर्‍हेचे व्यवसाय, बँकिंग, राजकारण, अंतराळ संशोधन, समाजसेवा, वैद्यकीय सेवा व इतर अनेक क्षेत्रे यात स्त्रिया अग्रेसर झाल्या आहेत. त्यामुळे आजची स्त्री वेगळ्या तर्‍हेने स्मार्ट वुमन होऊ लागली आहे.

 • मीना साठे

 • महाकवी कालिदासाच्या ’रघुवंशम’ या नाटकातील ’अज विलापिका’ फार प्रसिद्ध आहे. राजा अजची पत्नी स्वर्गवासी होते, तेव्हा अतिशय दुःखाने तिला उद्देशून अज म्हणतो, गृहिणी, सचिवः सखी मिथः प्रिय शिष्या ललीते कला विधी। याचा अर्थ तू उत्तम गृहिणी आहेस. मला योग्य सल्ला देणारी सचिव आहेस, सहकारी आहेस, एकान्तात प्रिया आहेस, माझी उत्तम शिष्या आहेस, निरनिराळ्या कलांमध्ये तू पारंगत आहेस.”
  अरे वा! हेच स्मार्ट वुमनचे अगदी चपखल असे वर्णन आहे. ते कालिदासाच्या काळापासून ते आज आणि उद्याही ’स्मार्ट’ म्हणण्यायोग्य वुमनला लागू पडणार आहे.
  काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचली. बातमी फोटोसहीत आली होती. 85 वर्षांच्या आजी अमेरिकेत राहणार्‍या नातवाला लॅपटॉपवर ई मेल लिहीत होत्या. त्या स्वतः शिक्षिका होत्या. शाळेत नोकरी करून रिटायर्ड झाल्या. त्यांच्या मते आत्ताच्या काळातील संगणकशास्त्र प्रत्येकाला आलेच पाहिजे. त्या स्वतःचे सर्व आर्थिक व्यवहारही या संगणकाद्वारेच करतात. या वयात त्या संगणकशास्त्र साक्षर झाल्यामुळे प्रसार माध्यमांनी त्यांचे कौतुक केले होते. याचाच अर्थ या वयस्कर शिक्षिकेला, कालच्या व आजच्या दोन्ही काळातील स्मार्ट वुमन म्हणायला हवे. त्या स्वतः शिकून शिक्षिका झाल्या. अर्थार्जन करून संसाराला हातभार लावला. चालू काळातील संगणक शिकून त्याचा वापर करत आहेत. म्हणजेच काळाची गरज ओळखून त्याप्रमाणे शिकणे-वागणे हेच स्मार्टपणाचे लक्षण आहे. यालाच स्मार्ट वुमन म्हणतात.
 • चतुरस्र गुणांनी व्यक्तिमत्त्व खुलते
  आता स्मार्ट म्हणजे काय? तर अंगी चतुरस्र गुण असणे. चतुरस्र गुणांमधे शिक्षण, आर्थिक गोष्टींची जाण, सामाजिक-राजकीय बाबींची समज, प्रसंगानुरुप वागण्या-बोलण्याचे चातुर्य किंवा तारतम्य, सुस्वभाव, स्वतः करत असलेल्या कामातील हित जपणे, स्वतःचा व्यक्तीमत्त्व विकास साधणे या सगळ्यांचा समावेश होतो. ज्या स्त्रीने या बाबींचा विशिष्ट पद्धतीने समन्वय साधला आहे ती स्मार्ट वुमन. अशी स्त्री नवतरुणी नसून पंचविशी पुढील असते. तिने स्वतःच्या विरंगुळ्यासाठी एखादा छंदही जोपासलेला असतो. अशा चतुरस्र गुणांमुळे स्त्रीचे व्यक्तिमत्त्व खुलते. ती देखणी नसली तरी सुंदर दिसू लागते.
  स्त्रीने स्मार्ट होण्यासाठी जसे शिक्षण घेणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे घरातील संस्कार, घरातील व्यक्तींनी तिला दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य व आर्थिक स्थिती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम स्त्रीच्या व्यक्त्तिमत्त्वावर होत असतो.
 • स्मरण करायला हवे
  आता काळाप्रमाणे बघायचे तर पूर्वीचा म्हणजे 80-100 वर्षांपूर्वीचा किंवा त्याही आधीचा काळ घेतला तर त्या वेळी सामाजिक व घरातील संस्कार वेगळे होते. बहुसंख्य घरातील लोक बुरसटलेल्या विचारांचे, कर्मठपणा अंगीकारलेले, व्यक्तीस्वातंत्र्याला पूर्ण विरोधी असे होते. मुलींनी शिकायचे नाही, घराबाहेर पडायचे नाही, चूल-मूल हेच तिचे क्षेत्र या विचारांचे होते. नवविवाहित मुलींचा धर्माच्या नावाने छळच होत असे. अशा परिस्थितीत, त्या काळी बहुसंख्य स्त्रिया घरातच केविलवाण्या स्थितीत खितपत पडल्या. त्यातही काही स्त्रियांनी बंडखोरी केली. त्यांच्या पतींनी घरातील विरोधाला न जुमानता, आपल्या पत्नींना शिकवले, घराबाहेरचे जग दाखवले, त्या स्त्रिया स्मार्ट झाल्या. त्यापैकी काही उदाहरणे म्हणजे रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी व इतर अनेक नावे घेता येतील. पण या सर्व जणींना समाजाचा रोष पत्करूनच आपले काम करावे लागले, याची खंत आजही वाटते. या सगळ्या नावाजलेल्या स्त्रिया. पण त्या काळात अशाही काही जणी असतील, ज्यांनी घरातील विरोधाला न जुमानता, स्वतःची आवड जोपासण्यासाठी घरातील कोणाच्या तरी आधाराने शिकून बहुश्रुतपणा मिळवून, गृहिणीपदाची जबाबदारी सांभाळून, थोडीफार समाजसेवा केली असेल, थोडेफार अर्थाजन केले असेल, अशा थोड्या अनामिक स्त्रियांचे आपण स्मार्ट वुमन म्हणून स्मरण करायला हवे. स्त्री शिक्षणाचा पाया घातलेल्या सावित्रीबाई फुले व महर्षि कर्वे यांना शतशः प्रणाम.
  नेहमीच साहित्य-लिखाणातून त्या त्या काळाचे प्रतिबिंब आपण बघतो. ह. ना. आपट्यांच्या सर्व नायिका केविलवाण्या स्थितीत जगल्या. गडकरी यांच्या ’एकच प्याला’ नाटकातील सिंधू ही केवळ पतिव्रता. पतीला व्यसनापासून हटविण्याचा बाणेदारपणा तिच्यात अजिबात नव्हता. त्याच्या पुढील काळातील प्र.के. अत्रे यांच्या घराबाहेर नाटकातील बाणेदार सुशिला, घरच्या कटकटीला कंटाळून घर सोडते. ती आपल्याला भावते.
  गेल्या 70-80 वर्षापासून काळ पूर्ण बदलू लागला. येथील सुधारक लोकांच्या चळवळीमुळे सामाजिक परिस्थितीत हळूहळू बदल होऊ लागला. त्याचा परिणाम घरातील संस्कारावर होऊन स्त्रिया शालेय व उच्च शिक्षण घेऊ लागल्या. त्यामुळे ती बहुश्रुत होऊ लागली. तिला आत्मविश्वास आला. ती गृहिणीपदाबरोबर अर्थार्जनही करू लागली.
 • अग्रेसर स्त्रिया
  आता आपण आजच्या जागतिकीकरणाच्या काळात डोकावूया. समाजातील बहुसंख्य गटांनी स्त्रीच्या शिक्षणाला तिच्या कर्तृत्वाला निखालस मान्यता दिली आहे. आजच्या काळातील ज्ञान कक्षाही रुंदावल्या आहेत. आजची स्त्री, पुरुषांनी गाजवलेली सर्व कार्यक्षेत्रे स्वतः तेवढ्याच समर्थपणे गाजवत आहे. उदाहरणार्थ – सर्व तर्‍हेचे व्यवसाय, बँकिंग, राजकारण, अंतराळ संशोधन, समाजसेवा, वैद्यकीय सेवा व इतर अनेक क्षेत्रे यात स्त्रिया अग्रेसर झाल्या आहेत. त्यामुळे आजची स्त्री वेगळ्या तर्‍हेने स्मार्ट वुमन होऊ लागली आहे.
  पूर्वीच्या काळापासून उच्चभ्रू, श्रीमंत समाजातील स्त्रिया शिकलेल्या होत्या. त्यांचे राहणीमान भपकेबाज व फॅशनेबल असे. उच्चभ्रू वर्ग ब्रिटिशांचे अनुकरण करतात. त्यामुळे या स्त्रिया इतर समाजापेक्षा स्मार्ट वाटत. आर्थिक व सामाजिक कनिष्ठ वर्गातील स्त्रिया कायमच अडाणी व बापुडवाण्या वाटत.
  पण आजची स्थिती पूर्णपणे बदलली आहे. कमी उत्पन्न गटातील स्त्रिया शिक्षण घेऊन बहुश्रुत होत आहेत. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आला आहे. या स्त्रियांमध्ये आपल्या घरी घरकाम करणार्‍या, मोलमजुरी करणार्‍या, भाजी विक्री, अगदी छोटे व्यवसाय करणार्‍या स्त्रियांचा समावेश करायला हवा. त्या पूर्णपणे त्यांच्या पद्धतीने स्मार्ट असतात. काम करून अर्थार्जन करतात. स्वतःचा संसार स्वतःच्या हिंमतीवर चालवू शकतात. या बाबतीत खूप वेळा त्या मध्यम वर्गातील स्त्रीपेक्षा वरचढ ठरू शकतात. म्हणजे त्यांना स्मार्ट वुमनच म्हणायला हवे.
  आता आजची खरी स्मार्ट वुमन कोण? तिच्यात काय वेगळेपण असते? अशी स्त्री स्वतःभोवतीचे जग स्वतःच निर्माण करते. ती जात्याच चतुर असते. दुसर्‍याला समजून घेणारी असते. गृहिणीपद सांभाळून अर्थार्जन करते. स्वतःचे निर्णय स्वतः घेते. आज तिला पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात शिक्षणाची व काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. थोडक्यात ती वाईज स्मार्ट वुमन बनू पाहत आहे. या सोबत आजच्या काळात अजून एक गोष्ट प्रकर्षाने दिसू लागली आहे. ती म्हणजे विवाह करण्याचे लांबणीवर टाकायचे. स्त्री आणि पुरुषांनी लिव्ह इन रिलेशनशिप अंगीकारायची. असे जगण्यात खुपशा स्त्रियांना आपण स्मार्ट झालो आहोत असे वाटते. या तर्‍हेचे निर्णय त्या स्वतःच घेत असतात. पण स्त्रीच्या दृष्टीने यात अजून तरी धोकेच दिसत आहेत.
  स्त्रीच्या स्मार्टनेसमध्ये तिचा आर्थिक स्तर व ती करत असलेले काम; म्हणजे नोकरी-व्यवसाय यामुळे विविधता येऊ शकते. तरी सुद्धा काळ जसा पुढे जाईल तसे बघूया, काय काय बदल होतात. उद्याच्या स्त्रीने मात्र स्वतःचा फायदा कशात आहे हे ओळखूनच स्मार्ट वुमनची लक्ष्मणरेषा स्वतःभोवती आखून घेण्यात व त्याप्रमाणे वागण्यातच तिचा स्मार्टपणा आहे.