माझ्या नवर्‍यानं सोडलिया दारु देव मला पावला ग…(...

माझ्या नवर्‍यानं सोडलिया दारु देव मला पावला ग…(Womens Can Unite Against Alcoholism)


-दादासाहेब येंधे

माझ्या नवर्‍यानं सोडलिया दारु देव मला पावला ग… हे गाणं पूर्वी गावागावातून घुमत असे. परंतु सध्या गल्लीबोळातून सर्वत्र दारूचा महापूर आणि बियरबारमधून हिडीस कर्णकर्कश गाणी आज सर्वत्र ऐकू येत आहेत. ही जुनी दारूबंदी गाणी आता हद्दपार होऊन पीने दे, मुझे पीने दे…! अशी गाणी सुरू झाली आहेत.
आजच्या घडीला राज्यातील अनेक गावांमध्ये एसटी, आरोग्य सेवा, टपाल, दूध, वीज आदी सेवा 21व्या शतकातदेखील पोचलेल्या नाहीत. पण, दारू मात्र न चुकता घरोघरी पोहोचत आहे. दुधाच्या महापुराऐवजी गावागावातून दारूचा महापूर येत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
काही जण तर सकाळपासूनच तर्रर्र होऊन फिरताहेत. पेट्रोल पंपावरील वर्दळ सकाळी 9 च्या पुढे सुरु होते. परंतु, तळीराम मात्र, सूर्याची पहिली किरणे पडण्याअगोदर दारूच्या गुत्त्यावर हजर असतात आणि गुत्त्याच्या दाराला धडक देऊन मालकास उठवतात. तो मला त्यांना शिव्या देतो नंतर या म्हणतो. पण, हे तळीराम म्हणतात मालकाला मस्ती आलीया.. पैसे जास्त झालेत का..? दार उघड… दारू विक्रेता नाईलाजाने दार उघडतो आणि आपला व्यवसाय सुरु करतो. हे चित्र खडेगावात सर्रास दिसून येते.
म्हणजेच गावात लहान बाळ दुधासाठी रडत असेल, औषधोपचाराविना तळमळत असेल तरी आरोग्य सेवा मिळत नाही; पण दारू लगेच मिळते. खेड्यातून हातभट्टी, फॉर्मात असून हे हातभट्टी विक्रेते पिण्याचा परवाना काढून शहरातून इंग्रजी दारू आणून दाखवत वरचष्मा प्रतिष्ठित असणार्‍या घरगुती तळीरामांना घरपोच सेवा जादा 25-50 रुपये आकारून करत आहेत. त्यामुळे परवानाधारक तळीराम व प्रतिष्ठित तळीराम यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नुसते मिस कॉल देऊन देखील बाटली घरपोच येते. एवढे संगणकीय युगात तंत्रज्ञान पुढे गेले आहे.
या दारूमुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले असून खेड्यात महिलांना दुसर्‍यांकडे मोलमजुरीला पाठवून त्यांच्या मजुरीवर आलेल्या पैशांची दारू पिणारे तळीराम काही कमी नाहीत. त्यांनी पैसे दिले नाही तर त्यांना मारझोड, शिवीगाळ करून पैसे काढून घेतात आणि पोरंबाळं उपाशी ठेवून आलेल्या मजुरीची ते दारू पितात.
माझ्या नवर्‍यानं सोडलिया दारु देव मला पावला ग… हे गाणं पूर्वी गावागावातून घुमत असे. परंतु सध्या गल्लीबोळातून सर्वत्र दारूचा महापूर आणि बियरबारमधून हिडीस कर्णकर्कश गाणी आज सर्वत्र ऐकू येत आहेत. ही जुनी दारूबंदी गाणी आता हद्दपार होऊन पीने दे, मुझे पीने दे…! अशी गाणी सुरू झाली आहेत. तळीराम दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. दिवसभर काबाडकष्ट करून मिळवलेले पन्नास-शंभर रुपये दारूच्या गुत्त्यावर खर्च करून डुलत डुलत सगळ्यांना शिव्यांची लाखोली वाहत आहेत. घरात मारझोड करीत तळीराम दिवस साजरा करीत एखाद्या दिवशी कामधंदा न मिळाल्यास घरातील भांडी, मुलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने विकून आपली तल्लफ भागवीत आहेत. त्यानंतर बायकोने दारूला पैसे दिले नाहीत म्हणून तिच्या आईवडिलांना शिव्या देऊन त्यांचा उद्धार करीत, मारपीट करून तिला रस्त्यावर ओढायला देखील मागे पुढे करीत नाहीत.
सकाळी उठल्यावर चुकलो म्हणून पुन्हा दारू पिणार नाही अशा शेकडो शपथा घेत पुन्हा तिन्हीसांज झाली की त्यांचे पाय आपोआप दुकानाकडे वळतात. दारू पोटात गेली की मांजरांचा पुन्हा ढाण्या वाघ होतो आणि पुन्हा गृहलक्ष्मीला मारपीट करून शिव्यांची लाखोली वाहतो.
स्वातंत्र्य मिळून 60 ते 75 वर्षे झाली. पण, महिलांच्या समस्या तशाच राहिल्या. महिलांसाठी आरक्षण आले महिला शिकून सुशिक्षित झाल्या; परंतु अजूनही त्या पुरुषाच्या व्यसनाला बळी पडत आहेत. दारू तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करत आहे. सर्वांना समजत असूनही हातभट्टी, देशी-विदेशी यांचा महापूर कमी होत नाही. अनेकांचे संसार देशोधडीला लागत असून संपूर्ण राज्यात दारूबंदी होत नाही हे आपले दुर्दैव म्हणायला हवे.


शासन दारूबंदी करेल, अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. तेव्हा आपले संसार आपणास उभे करण्यासाठी महिलावर्गाला शासनाने एक नामी संधी दिली आहे. ग्रामसभेद्वारे किंवा गुप्त मतदानाद्वारे दारूबंदीचा ठराव महिलांना करता येतो. सध्या खेडेगावातून बस, टपाल, आरोग्यसेवा, पाणी, वीज या सेवा तोकड्या पडत आहेत. परंतु, दारोदारी दारू पोहोचत आहे व गावात सहजपणे दारू उपलब्ध होत असल्याने मजेने, चेष्टेन युवक वर्ग दारूकडे वळत आहे. यातून ते व्यसनाधीन होत आहेत. तेव्हा गावातील व्यसनाधीनता संसाराची धूळधाण थांबवायची असेल तर महिलांना ही एक नामी संधी आहे.
गावातील 25 टक्के महिलांनी दारूबंदीची मागणी केल्यास संपूर्ण दारूबंदी होऊ शकते. 25 टक्के महिलांनी मागणी केल्यानंतर राज्य शुल्क विभागामार्फत याची खात्री केली जाते. त्यानंतर त्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांना कळविली जाते. जिल्हाधिकारी माहिती तपासून तहसीलदारांकडून संबंधित गावात गुप्त मतदान करण्याच्या सूचना देतात. या मतदानात 50 टक्के मतदान झाले तर दारूची बाटली आडवी होऊ शकते.
पण, माझा नवरा कुठे दारू पितो..? मला काय करायचे, माझा कायसंबंध आहे दारुशी… मी गावाशी कशाला वाकडे होऊ..? या भूमिकेने हे कधीच साध्य होणार नाही. विविध संस्थांचे प्रतिनिधी म्हणून निवडून किंवा बिनविरोध गेलेल्या ज्या महिला असतील त्या महिलांनी अशा शपथा घेतल्या तर कधीच गाव व्यसनमुक्त होणार नाही. तेव्हा सक्षम ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट व सुशिक्षित स्त्रियांनी आपल्या गावातील बाटली आडवी करण्यासाठी योगदान दिले तर गाव व्यसनमुक्त होऊ शकते.