आमचे व्यवहार आमच्या हाती (Woman Seek Financial ...

आमचे व्यवहार आमच्या हाती (Woman Seek Financial Freedom)

आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याकरिता कर्ज घेण्यासाठी महिला सहजतेने पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःचं घर खरेदी करणं असो किंवा वाहन, स्वतःचं शिक्षण असो किंवा लग्न… या व्यवहारांमध्ये आर्थिक योगदान देण्यात त्या पुढे सरसावत आहेत.

केवळ चूल आणि मूल एवढंच विश्‍व असलेल्या महिला शिकू लागल्या. आपल्या शिक्षणाचा व्यवहारातही उपयोग व्हावा म्हणून घराबाहेर पडल्या, नोकरी-व्यवसाय करू लागल्या. पुरुषांच्या खांद्याला-खांदा लावून काम करू लागल्या, कमवू लागल्या. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या, मात्र तरीही आर्थिक व्यवहार करताना त्या दोन पावलं मागेच राहत होत्या. परंतु, आता हे चित्रही पालटताना दिसत आहे. आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत महिलांनी पुरुषांची बरोबरी केलेली नाही, तर पुरुषांना मागे टाकलं आहे. नुकताच प्रकाशित झालेला ‘बँकबझार मनीमूड 2019’ अहवाल हे दर्शवत आहे.

भारतातील आघाडीची ऑनलाइन आर्थिक बाजारपेठ असलेल्या ‘बँकबझार’ने देशातील वैयक्तिक आर्थिक व्यवहार क्षेत्रातील नवनवीन ट्रेंड्स दर्शवणारा ‘बँकबझार मनीमूड 2019’ हा अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, आता महिला आपले आर्थिक व्यवहार अगदी सहजपणे करू लागल्या आहेत आणि मुख्य म्हणजे, असे व्यवहार करणार्‍या महिलांची संख्या वाढत आहे.

स्वतःच्या मालकीचं घर-वाहन
आधुनिक भारतीय स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र तर होतीच, आता तिला स्वतःच्या मालकीचं घर, वाहन असावं असंही वाटू लागलं आहे. या अहवालानुसार, प्राथमिक अर्जदार म्हणून महिलेचं नाव असलेल्या गृहकर्जांची सरासरी 27.57 लाख रुपये आहे, तर पुरुषांच्या बाबतीत हेच प्रमाण 22.97 लाख रुपये आहे. तसंच स्वतःच्या मालकीचं चारचाकी वाहन घेऊ इच्छिणार्‍या महिलांची संख्याही वाढत आहे. कारण अहवालानुसार, महिलांची वाहन कर्जाची सरासरी रक्कम 12.93 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे या आकडेवारीनुसार महिला केवळ स्वस्त आणि लहान वाहनंच खरेदी करण्यावर भर देत नाहीत, तर महिलांमध्ये प्रीमियम वाहन खरेदी करण्याची महत्त्वाकांक्षाही बळावत आहे.
तसंच महिलांकडून क्रेडिट कार्डासाठी नोंदवण्यात आलेली मागणीही बरीच जास्त आहे. गेल्या वर्षी महिलांकडून दाखल केल्या गेलेल्या फ्युएल कार्ड अर्जांच्या संख्येतही 89 टक्के वाढ झाली आहे. या अहवालात असंही लक्षात आलं आहे की, जगप्रवासाची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या महिलांच्या संख्येतही पुरुषांच्या तुलनेत वाढ झाली आहे. ट्रॅव्हल कार्ड अर्ज दाखल करणार्‍या स्त्रियांच्या संख्येत 73 टक्के, तर पुरुषांच्या संख्येत 71.5 टक्के वाढ झाली आहे.

या अहवालातील नोंदींविषयी बोलताना ‘बँकबझार’चे अध्यक्ष अधील शेट्टी म्हणाले, “ही आकडेवारी पाहता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याकरिता कर्ज घेण्यासाठी महिला सहजतेने पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःचं घर खरेदी करणं असो किंवा वाहन, स्वतःचं शिक्षण असो किंवा लग्न… या व्यवहारांमध्ये आर्थिक योगदान देण्यात त्या पुढे सरसावत आहेत. तसंच स्वतःचे आर्थिक व्यवहार त्या अतिशय आत्मविश्‍वासाने करू लागल्या आहेत. हा सकारात्मक ट्रेंड असाच पुढे वाढत राहील, याची आम्हाला खात्री वाटते.”