पुरुषी वर्चस्व असलेल्या व्यवसायात तरुणीचे धाडस...

पुरुषी वर्चस्व असलेल्या व्यवसायात तरुणीचे धाडस (Woman Achiever: Young Girl’s Venture In Male Oriented Industry)

फॅशन म्हणजे काय? आजच्या काळात सांगायचं तर काहीही! अमुक एक हिरॉइन सिनेमात अमुक एक कपडे घालते, ज्वेलरी घालते; तीच मी फॉलो करणार ही संकल्पनाच आजच्या तरुणीने खरंतर मोडीत काढलीय. ज्या कपड्यात, ज्या दागिन्यात मी सुंदर दिसते, मला वावरताना सहजता वाटते आणि मुख्य म्हणजे माझा आत्मविश्वास वाढतो; ती माझी फॅशन असा एक पर्सनलाइज्ड पॉझिटिव फॅशन ट्रेंड आजच्या काळात आपल्याला दिसून येतो. आजच्या बदलत्या काळातील स्त्रियांच्या या बदलत्या ट्रेंडचा आणि बदलत्या मानसिकतेचा विचार करून लॉन्जरी म्हणजेच अंतर्वस्त्रांच्या ग्लोबल मार्केटमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारं आघाडीचं नाव म्हणजे ग्रीष्मा पाटील!

लॉन्जरी मार्केटवर पुरुषांचं वर्चस्व
ग्रीष्मा पाटील या मुंबईनजीकच्या विरार येथील अमेय क्लासिक क्लबच्या डायरेक्टर आहेत. तसेच मार्बल मायनिंग या बिझनेस क्षेत्रातही त्या कार्यरत आहेत. पण आज ग्रीष्मा पाटील यांची ओळख अधिक ठळक होत आहे ती त्यांच्या लॉन्जरीच्या ‘कॅन्डौर लंडन’ या ब्रॅण्डमुळे! ग्रीष्मा पाटील यांनी मुंबई विद्यापीठातून बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. पण त्यांच्या व्यवसायाची बीजे रोवली गेली ती लंडनमध्ये! लंडनमध्ये शिक्षण पूर्ण करून भारतात आल्यानंतर आपण नेमकं कोणत्या क्षेत्रात काम करावं याचा विचार करत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, लंडनमधील लॉन्जरी मार्केट आणि भारतातील लॉन्जरी मार्केट यात असलेली तफावत. लंडनमध्ये लॉन्जरीत अनेकविध ब्रँड उपलब्ध होते. शिवाय रंग, डिझाईन्स, गुणवत्ता यात सुद्धा भारताच्या तुलनेत बरेच वैविध्य होते. त्याचबरोबर भारतातील लॉन्जरी मार्केटवर पुरुषांचे वर्चस्व होते. हा सगळा मार्केट अभ्यासल्यानंतर ग्रीष्माजींनी निश्चय केला की आपण आपला ब्रँड आणायचा.

यंग फॅशन आँत्रप्रीनर
त्यानुसार मे 2016 मध्ये वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी ग्रीष्मा पाटील यांनी ‘कॅन्डौर लंडन’हा ब्रॅण्ड मार्केटमध्ये आणला आणि अवघ्या पाच वर्षात हा ब्रॅण्ड महिलांच्या पसंतीस उतरून लोकप्रियही झाला. याची प्रचिती म्हणजे 2019 मध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवभारत टाइम्सने ग्रीष्मा पाटील यांचा ‘यंग आँत्रप्रीनर’ म्हणून केलेला सन्मान आणि नुकताच टाइम्स ऑफ इंडियाचा 2020 चा ग्रीष्मा पाटील यांना मिळालेला ‘फॅशन आँत्रप्रीनर’ हा पुरस्कार.
आज भारतातील पश्चिम व उत्तर झोनमधील जवळपास सर्व मेट्रो सिटीज मधील 250 स्टोअर्समध्ये कॅन्डौर लंडन हा ब्रॅण्ड उपलब्ध आहे. अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीने स्वतःची वेबसाइटही सुरू केली आहे. ग्रीष्मा पाटील यांच्या नेतृत्वाखाली 22 जणांची टीम कॅन्डौर लंडन ब्रॅण्डसाठी काम करत आहे. आपल्या कंपनीबद्दल बोलताना ग्रीष्माजी म्हणाल्या की, “प्रत्येक महिलेला मनानं आपण अगदी तरुण आहोत असं वाटावं हे आमच्या कंपनीचं उद्दिष्ट आहे. महिलांना वावरताना सहजता राहावी, रंगांचं व डिझाईनचं वैविध्य असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपड्याची गुणवत्ता उत्तम असावी या बाबींचा विचार करून कॅन्डौर लंडन लॉन्जरी मार्केटमध्ये आणते.”

यशाचं गमक
आज जागतिक बाजारपेठेत प्रचंड स्पर्धा आहे. लॉन्जरीजमध्ये आर्थिक पाठबळ असलेले अनेक मल्टिनॅशनल ब्रॅण्ड्सही आहेत. तसेच सतत बदलत जाणारे फॅशन ट्रेंडस्ही आहेत. या सगळ्या आव्हानांना तोंड देऊन ग्रीष्मा पाटील यांच्या कॅन्डौर लंडन या ब्रॅण्डने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. एवढ्या लहान वयात एवढे मोठे यश कसे साध्य केले याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, “एखादी गोष्ट करायची असं ठरवल्यावर ती पूर्ण होईपर्यंत मी त्या गोष्टीचा पिच्छा सोडत नाही, हेच बहुदा माझ्या यशाचे गमक असावं.” ग्रीष्माजींच्या अंगी असलेली चिकाटी, विचारांमध्ये असलेली स्पष्टता, नावीन्याचा वेध आणि आत्मविश्‍वास पाहिल्यावर मला आवर्जून आठवतात ते विठ्ठल कामत यांचे ‘इडली, ऑर्किड आणि मी’ या पुस्तकातील शब्द. या पुस्तकात ते म्हणतात, “मी स्वतःला बिझनेसमन म्हणत नाही. मी आहे आँत्रप्रीनर! ज्याचा शब्दकोशातला अर्थ आहे, जोखीम उचलून व्यवसाय करणारा!… आँत्रप्रीनरला केवळ पैशाच्या छनछनाटात रस नसतो. त्याला महत्त्व वाटतं, ते अफलातून चमकदार कल्पनेचं. ही कल्पना व्यवहारात उतरविण्यासाठी, तो आकाशपाताळ एक करतो. शेवटी त्याची कल्पना, त्याच्या मनासारखी व्यवहारात उतरते. ह्यावेळी किती पैसे कमावले, किती गमावले ह्यापेक्षा आपलं स्वप्न पूर्ण झालं ह्याचाच आँत्रप्रीनरला आनंद असतो.”
विठ्ठल कामत यांनी म्हटल्याप्रमाणे चमकदार कल्पनेचा शोध घेऊन, चिकाटीने ती कल्पना प्रत्यक्षात उतरवणारी एक आँत्रप्रीनर मला ग्रीष्मा पाटील यांच्यात दिसते. कॅन्डौर लंडन हा स्वतःचा ब्रॅण्ड आणून जागतिक बाजारपेठेला टक्कर देणार्‍या या मनस्वी आँत्रप्रीनरला हार्दिक शुभेच्छा!

– अश्विनी शिंदे -भोईर