थंडीमध्ये घर सजविण्याचे २० सोपे उपाय (Winter Ho...

थंडीमध्ये घर सजविण्याचे २० सोपे उपाय (Winter Home Decor : 20 Easy And Stylish DIY Home Decor Ideas To Transform Your House)

१ घर नव्यानं सजवायचं म्हणजे सर्वप्रथम थंडीच्या दिवसांत शोभून दिसतील अशा स्पेशल रंगांचा वापर करावा लागणार. हिवाळ्यात घर सजवताना उबदार रंग वापरावे. म्हणजे गडद लाल, तपकिरी, सोनेरी, चॉकलेटी यासारखे रंग मस्त दिसतात.
२. हिवाळ्यात गडद रंग चांगले दिसतात, परंतु जास्त गडद रंग वा खूप रंगांचा एकत्र वापर केल्याने घराचं सौंदर्य बिघडेल.
३. या मोसमात सिल्क, सॅटिन, वेलवेट इत्यादी फॅब्रिकचे पडदे घराला श्रीमंत, राजेशाही आणि उबदार लूक देतात. तेव्हा थंडीत असा प्रयोग अवश्य करा.

४. बेडशीट, पिलो कव्हर, कुशन कव्हर यासाठी देखील सिल्क, वेलवेट इत्यादी उबदार फॅब्रिकचा वापर करता येईल.
५. घरामध्ये कार्पेट आणि रग्सचा वापर केल्यास आपल्या पायांचा थेट जमिनीशी संपर्क येत नाही. वायब्रेंट रंगाचे कार्पेट आणि रग्स वापरून काही मिनिटांत आपण घराचा लूक बदलू शकतो.
६. थंडीमध्ये कार्पेट अतिशय उपयुक्त ठरते. कार्पेटमुळे थंडीपासून संरक्षण तर होतेच शिवाय त्यामुळे घराची शोभाही वाढते. मात्र हे कार्पेट नियमितपणे वा एक दिवसाआड व्हॅक्यूम क्लीनरने साफ करणे गरजेचे आहे. कार्पेटवर पडलेले डाग लगेच साफ करावेत, एकदा डाग सुकले की ते सहजासहजी जात नाहीत.
७. थंडीच्या दिवसात आणखी एका सोप्या पद्धतीने घर सजवता येते, ती म्हणजे बाजारात उपलब्ध असलेली गडद रंगाची शोभेची फुलं आणि पानं आणून फुलदाणीत सजवा. असं करून तुम्ही तुमच्या घराला अगदी सहजपणे विंटर लूक देऊ शकता.
८. तुमच्या घरी फायरप्लेस नाही म्हणून निराश होण्याचं काहीच कारण नाही. त्याऐवजी घरी भरपूर कँडल्स लावून तुम्ही फायरप्लेसची इच्छा पूर्ण करू शकता. घराला रोमँटिक लूक द्यायचा असेल तर मग तुम्ही फ्लोटिंग कँडल्सचा वापरही करू शकता.

९. थंडीत घराला उबदार आणि रोमँटिक लूक द्यायचा तर कमी व्हॉल्ट असलेले दिवे व बल्ब लावून पाहा.
१०. थंडीमध्ये मंद दिवे वा मेणबत्तीचा प्रकाश आपल्याला आवडतो. पण खोलीमध्ये त्याचा पुरेसा प्रकाश पडेल, याकडे लक्ष असू द्या.
११. थंडीच्या मोसमास घरात व्हॅनिला, दालचिनी यासारख्या सुंगधाच्या कँडल्स किंवा तुमच्या आवडीच्या सुगंधी अगरबत्त्या लावू शकता. असा सुगंध या मोसमात खूपच मोहून टाकणारा असतो.
 १२. थंडी सुरू होताच आपल्या कपाटामधील वापरात नसलेले कपडे काढून बांधून ठेवा. तसेच कपाटात जे कपडे ठेवलेले असतात, त्यांना अधूनमधून ऊन दाखवा. म्हणजे त्यात दमटपणा राहणार नाही आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही.
१३. थंडीमध्ये वापरण्यात येणारे रजई, ब्लँकेट इत्यादींच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष असू द्या. तसेच ते दमट पडू नयेत म्हणून त्यांना ऊन दाखवा. असे केल्याने अलर्जी, अस्थमा आदी आजार होण्याची भीती राहणार नाही.
१४. कार्पेट, रग्स, उशा इत्यादींना वेळोवेळी ऊन दाखवत राहा. तसेच त्यांच्या स्वच्छतेसाठी व्हॅक्यूम क्लीनर वापरा. ते धूळ आणि कचरा साफ करून घरास स्वच्छ आणि कुटुंबास निरोगी ठेवण्यास मदत करतं.
१५. थंडीमध्ये ड्रेप्स आणि पडदे यांची स्वच्छता ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. हे स्वच्छ केले नाही तर त्यातून दुर्गंधी येते. तेव्हा वेळोवेळी ते धुऊन सुकवून वापरा.

१६. घर अस्ताव्यस्त दिसू नये यासाठी वेगवेगळ्या आकाराचे रंगीत केन बास्केट घेऊन या. घरात इकडेतिकडे पडलेली मॅगजीन्स, न्यूजपेपर्स, मुलांची खेळणी इत्यादी या बास्केटमध्ये ठेवून तुम्ही कमी वेळात पसारा आवरू शकता. त्यामुळे घर सुंदर तर दिसेलच शिवाय टापटीप ठेवण्यासही मदत होईल.
१७. घर लहान असेल तर घरामध्ये खूप जड वा भरमसाठ डेकोरेटिव्ह फर्निचर ठेवू नये.
१८. थंडीमध्ये जोराच्या वाऱ्यामुळे खिडक्यांच्या काचा आणि दरवाजे लवकर खराब होतात. तेव्हा नियमितपणे पेपरने त्या पुसून स्वच्छ कराव्यात.
१९. फर्निचरवरील कव्हर्सना वेळोवेळी ऊन दाखवा, म्हणजे त्यांना फंगस पकडणार नाही.
२०. थंडीमध्ये घरातील वॉशबेसीनमध्ये लावलेल्या ड्रेसिंग टेबलवरील आरशावरही धुकं येतं. त्यामुळे त्यात पाहिल्यास धुरकट दिसते. असं झाल्यास आधी ओल्या आणि नंतर सुक्या वर्तमानपत्राने काचा पुसून साफ करा. तुम्ही टाल्कम पावडर शिंपडून देखील काच साफ करू शकता. असं केल्याने आरसा स्वच्छ आणि सुका होतो.