बुद्धिबळाच्या पटावर आमिर खान आपलं नशीब आजमावणार...

बुद्धिबळाच्या पटावर आमिर खान आपलं नशीब आजमावणार का? (Will Amir Khan Try His Luck In The Game Of Chess?)

सुपरस्टार मिस्टर परफेक्शनिस्ट आता ग्रँडमास्टर बनणार! आपल्या अभिनय कौशल्याने चित्रसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या आमिर खानने विश्वनाथन आनंद यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आमिर आणि विश्वनाथन आनंद असे दोघे दिग्गज, एका ऑनलाइन कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोना पिडित बुद्धिबळ खेळाडूंसाठी निधी जमा करण्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. या अतिशय खास प्रसंगी आमिर आणि विश्वनाथन यांनी बुद्धिबळ पटावर छान खेळी खेळली. तेव्हापासून त्यांच्यामधील संवादास सुरुवात झाली.

या कार्यक्रमाच्या दरम्यानच, पाच वेळा विश्व चॅम्पियन ठरलेल्या खेळाडूचा जीवनप्रवास चित्रपटातून प्रदर्शित करावयाचा ठरल्यास या बायोपिकमध्ये सुपरस्टार आमिर खान मुख्य भूमिका करणार का? अशी त्यास विचारणा करण्यात आली. तसं पाहिलं तर आमिर चित्रपट स्वीकारण्याच्या बाबत अतिशय चुजी आहे, परंतु ग्रँडमास्टरचा बायोपिक असल्याने त्याने कोणतेही आढेवेढे न घेता लगेच होकार कळवला. आमिरने म्हटलं, ” विश्वनाथन यांची भूमिका साकारणं ही केवळ आनंदाची नव्हे तर माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. त्यांच्या विचारांत उतरणे हे देखील रोमांचक असणार आहे.”

आमिर खान पुढे म्हणाला, ”एखाद्या व्यक्तीची भूमिका साकारताना मी त्या व्यक्तीचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. विशी वास्तविक पात्र आहे, त्यामुळे त्याची बुद्धी आणि मन समजून घ्यायचं तर मला त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा लागेल. त्याचं डोकं कसं चालतं हे मला त्याच्या कुटुंबाकडून आणि पत्नीकडून समजून घ्यावं लागेल.”

चित्रसृष्टीमध्ये अनेक यशस्वी चित्रपट देणारा आमिर या बायोपिकबाबत अतिशय एक्सायटेड आहे. आमिरचा हा उत्साह पाहून चॅम्पियन आनंदनेही त्याला पूर्णतः मदत करण्याचं वचन दिलं आहे. आनंद म्हणाला, ”या भूमिकेसाठी आमिरला त्याचं वजन वाढवावं लागणार नाही, असं मी वचन देतो.”

सुपरिचीत दिग्दर्शक आनंद एल राय हा चित्रपट दिग्दर्शित करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्यातरी या बायोपिकच्या स्क्रिप्टचं वेगानं काम सुरू आहे. अजून चित्रपटातील इतर कलाकारांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु, आमिरने या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केलेली असल्याने, विश्वनाथन आनंद तोच असणार यात शंका नाही.

आमिरच्या आगामी कामाबाबत सांगायचं तर, तो त्याच्या लवकरच येऊ घातलेल्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. याशिवाय तो गुलशन कुमार यांच्या ‘मोगुल’ या बायोपिकमध्ये तसेच गुरुदत्त यांच्या बायोपिकमध्येही दिसणार असल्याची खबर आहे.