रंग माझा वेगळा मध्ये आपल्याच नवऱ्याशी, त्याच्या...

रंग माझा वेगळा मध्ये आपल्याच नवऱ्याशी, त्याच्या प्रेयसीला लग्न लावून देण्याचे वचन बायकोने दिले..(Wife Promises Her Husband’s Lover To Commence Marriage With Him: A New Twist ‘Rang Maza vegla ‘ Serial)

यंदाची स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट मालिका हा पुरस्कार पटकावणारी ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेतही पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेत सतत येणारी धक्कादायक वळणे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरत आहेत. अनोख्या प्रेमकहाणीपासून सुरु झालेली ही कथा सध्या वेगळ्याच वळणावर येऊन पोहचलेली दिसते. कार्तिकीला कार्तिकच तिचे वडील असल्याचे सत्य नुकतेच समजले आहे. त्यामुळे वटपौर्णिमेला ती दिपाच्या मागे लागलेली असते की तू बाबांसाठी वडाची पूजा कर. कार्तिकच्या आयुष्यासाठी दिपा पूजा करते खरी पण ती स्वत: च आता कार्तिकला दूर करणार असल्याचा प्रोमो रिलीज झाला आहे.

नुकताच 19 जूनच्या महाएपिसोडचा प्रोमो समोर आला असून दिपा त्यात आयेशाला तिचे लग्न स्वत: कार्तिकशी लावून देईन असे वचन देते. प्रोमोमध्ये दीपा वटपौर्णिमेची पूजा करत असताना तिला रस्त्यात आयेशा दिसते. कार्तिकपासून दुरावलेली आयेशा वेड्यासारखी रस्त्यावर भटकत असते. रस्त्यात येणाऱ्या गाड्यांसमोर जाऊन जीव देण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी दीपा तिचा जीव वाचवते. ‘कार्तिक माझ्या आयुष्यात नसेल तर माझ्या आयुष्याला काही अर्थ नाहीये’, असं म्हणत आयेशा जीव देण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा दीपा तिला ‘मी स्वत: तुझं कार्तिकशी लग्न लावून देईन’, असं वचन तिला देते. पण त्याचवेळी आयेशा हे नाटक करत असल्याचेसुद्धा दाखवले आहे. आयेशाच्या या नव्या खेळीमुळे कार्तिक दिपाच्या नात्यात कायमचा दुरावा निर्माण होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हा प्रकार समजल्यावर सौंदर्या यावर काय बोलणार?, कार्तिक स्वत: या लग्नाला तयार होईल का?, दिपिका कार्तिकला आयेशासोबत लग्न करण्याची परवानगी देईल का? कार्तिकीला तिच्या आईने घेतलेला निर्णय पटेल का ? असे  हे प्रश्न मालिकेच्या चाहत्यांना पडले आहेत. आता या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या पुढील भागांतच पाहायला मिळणार आहेत.

सध्या या मालिकेचा प्रोमो तुफान व्हायरल होत आहे. काहींच्या मनात प्रोमो पाहून उत्सुकता निर्माण झाली आहे तर काहींनी प्रोमो पाहून मालिकेला ट्रोल करत अजून मालिका किती वाढवणार असे प्रश्न विचारले आहेत. तर काहींनी ‘टीआरपीच्या नावाखाली प्रेक्षकांना काहीही दाखवणं बंद करा’. तर दुसऱ्या युझरनी म्हटलंय, ‘आयेशाचं भांड फोडायचं सोडून किती फालतू गोष्टी मालिकेत दाखवल्या जात आहेत’.