हुतात्मा अधिकाऱ्याची पत्नी ...

हुतात्मा अधिकाऱ्याची पत्नी लष्करात (Wife of Major Killed In Kashmir Joins Army)

पुलवामा येथे २०१९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले मेजर विभूती शंकर धौंडियाल यांच्या पत्नी निकिता कौल या लष्करात लेफ्टनंट पदावर दाखल झाल्या आहेत.

शनिवारी (29 मे) आयोजित भारतीय लष्कराच्या दीक्षांत सोहळ्यामध्ये निकिता यांनी पहिल्यांदाच लष्करी गणवेश आपल्या अंगावर चढवला. लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी निकीता कौल यांच्या खांद्यावर लष्कराचे स्टार लावून त्यांना लष्करी सेवेत दाखल करून घेतलं. ‘‘मेजर विभूती शंकर धौंडियाल यांचा पुलवामात २०१९ मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता. आज त्यांच्या पत्नी निकिता कौल या लष्करात दाखल झाल्या आहेत, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे,’’ असे उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी यांनी म्हटले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या उधमपूर येथील शाखेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबतची चित्रफीत ट्विटरवर जारी केली असून कौल यांच्या भारतीय लष्करातील प्रवेशाचे स्वागत करण्यात आले आहे.

पतीच्या निधनानंतर २९ वर्षीय निकिता कौल यांनी बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून लष्करी सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अवघड मानली जाणारी परीक्षा पास झाल्यानंतर एका वर्षाचं करून कठोर प्रशिक्षण पूर्ण करून निकिता यांनी हे यश मिळवलं आहे. वूमन स्कीमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षेतून त्या भारतीय लष्करात दाखल झाल्या आहेत. भारतीय लष्करात निकिता कौल यांची लेफ्टनंट पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

त्या मूळ काश्मीरच्या निवासी आहेत. त्यांचा विवाह मेजर विभूती शंकर धौंडियाल यांच्याशी झाला होता, त्यानंतर नऊ महिन्यांतच जैश-ए-महंमदने केलेल्या पुलवामा हल्ल्यात धौंडियाल यांना वीरमरण आले.

निकिता कौल यांच्या लष्कर प्रवेशाचे अनेकांनी स्वागत केले असून त्यांच्या पतीलाही श्रद्धांजली वाहिली आहे. दिवंगत पतीला हीच योग्य श्रद्धांजली ठरेल, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. मेजर धौंडियाल यांना मरणोत्तर ‘शौर्य चक्र’ देण्यात आले होते.

निकिता यांनी भारतीय लष्करात प्रवेश करताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावरही सध्या निकिता कौल यांचीच चर्चा आहे.

निकिता यांना लष्कराचे स्टार लावत असतानाचे फोटो आणि व्हीडिओ सर्वत्र व्हायरल होऊ लागले आहेत.

अनेक मान्यवर आणि सेलिब्रिटी निकिता यांच्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करत आहेत. सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहून लोक त्यांचा गौरव करताना दिसत आहेत.