महिलांचं ऑनलाइन चॅटींग वाढतंय… (Why Women Are M...

महिलांचं ऑनलाइन चॅटींग वाढतंय… (Why Women Are More Passionate About Online Chatting?)


महिला डेटींग अ‍ॅप्स वा सोशल मीडियावर बिनधास्त अनोळखी पुरुषांशी मैत्री करतात आणि रिकाम्या वेळी तासन्तास त्यांच्यासोबत चॅटींग करतात.
अलिकडेच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतात दर दहा महिलांपैकी सात विवाहित महिला आपल्या पतीची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. या महिला डेटींग अ‍ॅप्स वा सोशल मीडियावर बिनधास्त अनोळखी पुरुषांशी मैत्री करतात आणि रिकाम्या वेळी तासन्तास त्यांच्यासोबत चॅटींग करतात. ही धक्कादायक बाब या अहवालातून समोर आली आहे. पाहूया यामागची कारणं काय आहेत ती…

महिला बिनधास्त होत आहेत
सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की, महिला शिक्षित झाल्याने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या आहेत. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला आहे, त्यामुळे माझं जीवन मला हवं त्या पद्धतीने मी जगणार, ही प्रवृत्ती प्रबळ होत आहे. या महिला पुरुषांप्रमाणे विचार करु इच्छितात. त्यांना जीवनात तसेच नात्यातही समानता हवी आहे. या समानतेच्या अधिकारामध्ये आड येणार्‍या बंधनांना त्या आपल्या जीवनातून झुगारून देऊ इच्छीत आहेत. ऑनलाइन पुरुष मित्रांचा शोध घेणे हा या इच्छेचाच एक भाग आहे.

पत्नीला सन्मान दिला जात नाही
आजही बहुतांशी वैवाहिक जीवनात असमानता दिसते. कुटुंबात पती-पत्नीला एकसारखा दर्जा मिळत नाही. पत्नी ऑफिसमध्ये जाणारी असो वा घर सांभाळणारी असो. घर सांभाळणे, चूल-मूल सांभाळणे, नाती टिकवणे इत्यादी कामं पत्नीचीच आहेत असे समजले जाते. घरच्या- बाहेरच्या अशा सर्वच जबाबदार्‍या तिच्यावर टाकल्या जातात. अशातच त्या स्त्रीला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. या सगळ्या परिस्थितीमुळे तिला नैराश्य येऊ लागते. आपलं नैराश्य दूर करण्यासाठी ती सोशल मीडियावर मित्रांचा शोध घेऊ लागते आणि मग येथूनच चॅटिंगचा सिलसिला सुरू होतो. कधी कधी या ऑनलाइन नात्यांतील आकर्षण इतकं जास्त असतं की ती स्त्री आपल्या मर्यादाही ओलांडते.

वैवाहिक जीवनात वाढतोय एकटेपणा
एका अहवालानुसार आज 20 टक्क्यांहून अधिक जोडपी त्यांच्या वैवाहिक जीवनात एकटेपणाच्या अनुभवातून जाताना दिसतात. हल्ली पती-पत्नीचं एकत्र बसून एकमेकांशी गप्पा मारणं, सुख-दुःख शेअर करणं कमी होत आहे. दोघांचं वेगवेगळं जग निर्माण झालं आहे आणि तसंच राहणं त्यांच्या अंगवळणी पडलंय. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर त्यांना नवे मित्र मिळतात. सुरुवातीला आकर्षण वाटतं आणि नंतर निरंतर गप्पांचा सिलसिला सुरू होतो.

गृहिणीला काही महत्त्व नाही
प्रणाली एक गृहिणी आहे. ती वेळ मिळताच डेटिंग अ‍ॅप्सवर स्वतःला बिझी ठेवते. तिचं म्हणणं आहे की, माझ्या पतीला चांगलं खायला मिळालं, धुतलेले, इस्त्री केलेले कपडे घालायला मिळाले, संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर चहा-नाश्ता मिळाला की… बस्स… एवढ्यासाठीच बायको हवी. यानंतर एकतर ते टेलिव्हिजनवरील कार्यक्रम पाहण्यात बिझी होतात नाहीतर मित्रांसोबत बाहेर निघून जातात. माझ्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. अशा प्रकारच्या नीरस जीवनाचा मला कंटाळा आला होता. म्हणून मी सोशल मीडियावर मित्र बनवण्यास सुरुवात केली. तेथे नात्यात कोणती जबाबदारी नाही की कोणाला जबाब देणेही नाही. मला त्यांच्यासोबत बोलायला आवडतं. त्यांच्याकडून माझी स्तुती ऐकायला मला आवडतं. याउलट माझ्या पतीला माझी स्तुती करणे गरजेचंच वाटत नाही.

वर्किंग वूमनची स्थितीही याहून वेगळी नाही
महिलांनी आर्थिक जबाबदारी वाटून घेतली असली तरी तिची घरातील जबाबदारी विभागून घेण्यासाठी कुटुंबातील कोणीही सदस्य धजावत नाही. अशा वेळी घर आणि ऑफिस दोन्हीकडील जबाबदार्‍या पेलवताना तिची दमछाक होते. ऑनलाइन मित्र जोडून वा त्यांच्याशी चॅटिंग करून तिला तिच्या या रुटीनपासून थोडा विरंगुळा मिळतो आणि हा काही काळाचा आनंद तिला संपूर्ण दिवसभर काम करण्यासाठीची उर्जा देतो.

नीरस असतं वैवाहिक जीवन
वैवाहिक जीवनात काही वर्षांत, काहींच्या बाबतीत तर काही महिन्यांत नीरसता येते. विशेषतः महिलांच्या बाबतीत घर – कुटुंब अशा जबाबदार्‍यांमध्ये तिचं जीवन कोमेजून जातं. स्वयंपाकापासून मुलांचा अभ्यास घेण्यापर्यंत, घर सांभाळण्यापासून नाती जोपासण्यापर्यंत तिचं स्वतःचं अस्तित्व हरवत जातं. अशा वेळी तिला अशा प्लॅटफॉर्मची गरज भासते जेथे तिला समजून घेणारं, तिचं कौतुक करणारं, तिच्याशी प्रेमानं बोलणारं कोणीतरी असतं. डेटिंग प तिची ही गरज तसेच तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतो.

सारी बंधनं स्त्रियांनाच
सर्व रितीभाती, सामाजिक मर्यादा इत्यादी जेवढं महिलांवर थोपवलं जातं तितकी पुरुषांवर त्याची सक्ती केली जात नाही. आजही पुरुष रात्री उशिरापर्यंत पार्टीत राहिला तर चालतं परंतु एखाद्या महिलेचे उशिरा घरी येणे म्हणजे बेजबाबदारपणाचे समजले जाते. पुरुषाचे विवाहबाह्य संबंध जुळले की पुरुषांचा स्वभावच तसा असतो असं म्हणून ती गोष्ट गौप्य ठेवली जाते. तेच महिलांनी एखाद्या पुरुषासोबत बोललं तरी तिच्याकडे वाईट नजरेने पाहिलं जातं. या सगळ्या गोष्टींचे ओझे वाहून आता महिला थकल्या आहेत. ती आता स्वतःसाठी जगू इच्छिते. अशी इच्छा असतानाच तिला जेव्हा ऑनलाइन जोडीदार सापडतो तेव्हा ती स्वतःला रोखू शकत नाही. शिवाय मनात कोणतीही शंकाही येऊ देत नाही.

या व्यतिरिक्त अन्य कारणं
सोशल मीडियावर लोकांशी मैत्री करणे, त्यांच्याशी नातं जोडणं सोपं आहे आणि हे नातं इतकं आकर्षक आणि नवीन वाटतं की लोक कोणताही विचार न करता मित्र बनवतात.
बरेचदा हे मित्र अनोळखी असतात, त्यामुळे लाज बाळगण्याचे तसेच घाबरण्याचे कारण नसते. आपल्या चांगल्या वाईट व्यक्तीत्त्वाची तमा न बाळगता येथे लोक तासन्तास बिनधास्त चॅटींग करतात. येथे कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. खरं बोलण्याची सक्ती नसते आणि सामाजिक दबावही नसतो. त्यामुळे सर्वकाही बिनधास्त शेअर करता येतं.

आधीही असायचे विवाहबाह्य संबंध
मानसोपचार तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की – सर्वेक्षणाच्या अहवालाने चकित होण्यासारखं काही नाही. कारण ही काही नवीन माहिती नाही. विवाहबाह्य संबंध आधीही असायचे. तेव्हा कुटुंबातच अशाप्रकारचे संबंध बनायचे ही गोष्ट निराळी. आता अशाप्रकारचे संबंध गावच्या ठिकाणी होताना दिसतात. एक महत्त्वाची बाब म्हणजे या ऑनलाइन नातेसंबंधाचा उद्देश पतीला फसवण्याचा नसतो. ही नाती केवळ टाइमपास, वा गंमत वा एक्साइटमेंट म्हणून बनवली जातात. या नात्यांत कोणतंही बंधन नसतं वा याचा कोणताही हेतू नसतो. हे नातं कुटुंबातील नात्यांसाठी त्रासदायक नसतं. परंतु भारतीय समाजामध्ये यास वाईट समजलं जातं. विशेषतः हे करणारी जेव्हा एखादी स्त्री असते.
पूर्वी शारीरिक संबंध बनायचे. परंतु ऑनलाइन नातेसंबंधामध्ये चॅटिंग किंवा सेक्सटिंग पर्यंतच मजल जाते. पूर्वी हे सगळं लपून-छपून केलं जायचं, परंतु आता मोकळेपणा आला आहे. महिला देखील आपल्या सेक्शुलिटीबद्दल मोकळेपणाने बोलू लागल्या आहेत. आता त्यांच्यातही बिनधास्तपणा आलाय. म्हणूनच डेटिंग अ‍ॅप्सवर बिनधास्तपणे ती लोकांशी संपर्कात येते आणि गप्पा मारते.
यावर उपाय काय?
तुमची पत्नी डेटिंग साइट्सवर खूप वेळ घालवू लागली आहे, हे लक्षात आल्यानंतर लगेचच रिक्ट करू नका. काहीही झाले तरी स्वतःच्या रागावर ताबा ठेवायचा शिवाय नाराजही व्हायचे नाही.
सर्वात आधी त्यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुम्हीच त्यासाठी कारण असाल. कदाचित तिच्या अपेक्षेप्रमाणे तुम्ही तुमच्या पत्नीस तेवढा वेळ, प्रेम आणि तमा देऊ शकत नसाल. कारण काहीही असो ते दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या जोडीदारास समजवा की काहीही झालं तरी तुम्ही तिच्या सोबत आहात. कोणत्याही परिस्थितीत आपला आवाज आणि शब्दांवर संयम ठेवा. तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा मग आपोआप तिचं ऑनलाइन चॅटिंग कमी होत जाईल.