घटस्फोट झाला, तरी या अभिनेत्रींनी दुसरं लग्न का...

घटस्फोट झाला, तरी या अभिनेत्रींनी दुसरं लग्न का केलं नाही? (Why These Bollywood Actresses Chose To Remain Single After Divorce?)

लोकांना चकित करणारं लग्न आणि घटस्फोट या घटना बॉलिवूडमध्ये पूर्वापार चालत आल्या आहेत. घटस्फोटित नटी दुसरं लग्नही करते. पण काही नट्या इथे अशा आहेत की, लग्नानंतर वेगवेगळ्या कारणांनी त्यांचा संसार सुखाचा झाला नाही. म्हणून त्यांनी घटस्फोट घेतला. मात्र पुन्हा लग्न न करता त्यांनी उर्वरित आयुष्य एकट्यानेच काढण्याचं ठरविलं.

करिश्मा कपूर

नव्वदीच्या दशकात करिश्मा कपूर अभिनय क्षेत्रात खूपच यशस्वी ठरली. पण वैवाहिक जीवनात अयशस्वी झाली. प्रेमातही ती कमनशिबी ठरली. अजय देवगणशी चाललेल्या तिच्या रोमांसची बरीच चर्चा होती. पण ते प्रेम टिकलं नाही. नंतर अभिषेक बच्चनशी तिचं प्रेम जुळलं. त्याच्याशी तर तिचा साखरपुडा देखील झाला. पण काही कारणांनी तो मोडीत निघाला. नंतर तिने दिल्लीचा बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं. बरीच वर्षे तिने संजयशी संसार केला. तिला दोन मुली झाल्या. पण पुढे त्यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या. संजय कपूरने तिचा खूपच छळ केला. तेव्हा करिश्माने त्याच्याशी घटस्फोट घेतला. गुलछबू संजय कपूरने घटस्फोट झाल्यावर दुसरं लग्न केलं. पण करिश्माने आदर्श आईची भूमिका स्वीकारून दुसरं लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आणि एकल आई म्हणून ती जीवनात खूप खूश आहे.

अमृता सिंह

अमृता सिंहने सैफ अली खानला २००३ साली घटस्फोट दिला. पण त्यानंतर तिने दुसरं लग्न करण्याचा विचारही केला नाही. अमृताशी घटस्फोट झाल्यावर सैफची बरीच प्रेमप्रकरणे झाली. पण अमृता मुलांच्या संगोपनासाठी एकल आई बनून राहिली. सैफने इटालियन मॉडेल बरोबर बराच काळ डेटिंग केलं. मग त्याच्या जीवनात करीना कपूर आली. तिच्याशी ५ वर्षे डेटिंग करून सैफने लग्न केलं. पण अमृताने मुलांच्या संगोपनास महत्त्व दिलं.

मनीषा कोईराला

नव्वदीच्या दशकातील रुपसुंदर अभिनेत्री मनीषा कोईरालाने बॉलिवूडच्या सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं. नंतर तिने २०१० साली नेपाळचा बडा बिझनेसमन सम्राट दहलशी फिल्मी स्टाईलमध्ये लग्न केलं. पुढे तिचं सम्राटशी बिनसलं. मग तिला कॅन्सरने घेरलं. तेव्हा तिने घटस्फोट घेऊन उपचारासाठी अमेरिकेला प्रयाण केलं. मनीषाने आता कॅन्सरवर विजय मिळवला आहे. पण मुंबईत येऊन एकटीनं राहण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या लग्नाचा विचार मनात आणला नाही. आता ती कुटुंबासह मजेत वेळ घालवते. अन्‌ एकटी राहून खूश आहे.

चित्रांगदा सिंह

चित्रांगदाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली, तेव्हा ती लग्न झालेली होती, अन्‌ एका मुलाची आई होती. पण बॉलिवूडमध्ये स्थिरावण्याचा तिने निर्णय घेतल्यावर तिचा गोल्फर पती ज्योती रंधावा याच्याशी तिचे मतभेद होऊ लागले. ते इतके वाढले की, दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. चित्रांगदा अभिनय क्षेत्रात खूप काही यशस्वी झाली नाही. पण एकटी राहून खूपच आनंदात आहे.

कोंकणा सेन शर्मा

कोंकणाने बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीशी २०१० मध्ये लग्न केलं. त्यांचे संबंध इतके दृढ होते की कोंकणाला लग्नाआधीच दिवस गेले होते. मात्र पुढे ते इतके बिघडले की तीन वर्षातच ते वेगळे झाले. घटस्फोटानंतर कोंकणाने आपलं लक्ष पूर्णपणे करिअरवर केंद्रित केलं. तिनं दुसरं लग्न केलं नाही. अन्‌ रणवीर शौरीने पण पुन्हा लग्नाचा विचार केला नाही.

महिमा चौधरी

‘परदेस’ चित्रपटातून नावारूपास आलेली महिमा पुढे आघाडीची अभिनेत्री झाली. टेनिसपटू लिएंडर पेस सोबत तिचे संबंध जुळले. पण पेसने रिहा पिल्लईशी लग्न केलं. तर महिमाने २००६ साली आर्किटेक्ट – बिझनेसमन बॉबी मुखर्जीशी लग्न केलं. दोघांना एक मुलगी झाली. पण ५ वर्षानंतर दोघांमध्ये मतभेद होऊ लागले. पुढे २ वर्षातच ते वेगळे झाले. महिमाने पुन्हा अभिनय क्षेत्रात येण्याचा प्रयत्न केला. पण दुसरे लग्न मात्र केले नाही.

संगीता बिजलानी

संगीता बिजलानीचे कोणे एके काळी सलमान खानशी सूर जुळले होते. पण १९९६ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महम्मद अझरूद्दीन याच्याशी लग्न करून संगीताने सगळ्यांना चकित केले होते. अझहरशी लग्न करून तिने फिल्मसृष्टी सोडली. अन्‌ संसारात रममाण झाली. दोघांचा संसार १४ वर्षे सुरळीत चालला पण अझहरचे बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाशी सख्य जुळले. या ज्वालाच्या झळा संगीताला लागल्या अन्‌ २०१० मध्ये संगीता – अझहरचा घटस्फोट झाला. तेव्हापासून ती एकटीच राहते.

पूजा भट्ट

पूजा भट्टने होस्ट मनीष मखीजाशी लग्न करण्याचा इरादा जाहीर केला, तेव्हा सगळ्यांना नवल वाटलं होतं. ‘पाप’ या चित्रपटात दोघे एकत्र काम करत होते. स्वभावाने गंमतीदार असलेला मनीष पूजाचा जोडीदार झाला. तिचा घट्ट मित्र झाला. ती निर्माण करत असलेल्या सिनेमात मनीष तिची मदत करू लागला. पण तिरसट स्वभावाच्या पूजाने अचानक त्याच्यापासून वेगळे होण्याची घोषणा केली. २०१४ साली त्यांचा घटस्फोट झाला. नंतर मात्र तिने दुसरं लग्न केलं नाही. का केलं नाहीस, असा प्रश्न पत्रकारांनी तिला केला. तेव्हा चांगला नवरा मिळत नाहीये, असं तिने हसत हसत उत्तर दिलं.