राजीव कपूर यांचं वडील राज कपूर यांच्यासोबत कधीच...

राजीव कपूर यांचं वडील राज कपूर यांच्यासोबत कधीच पटलं नाही? काय झालं असेल दोघांमध्ये? (Why Rajeev Kapoor was against his father throughout his life?)

राज कपूर यांचे सर्वात लहान सुपुत्र आणि रणधीर-ऋषि कपूर यांचे छोटे भाऊ राजीव कपूर यांचे काल मुंबईत हृदयविकाराने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. रात्री उशिरा त्यांच्या कुटुंबियांनी साश्रू नयनांनी त्यांस निरोप दिला. राजीव कपूर यांच्या अंत्यसंस्कारासाठी चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज मंडळी उपस्थित होती.

राजीव कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या खाजगी आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत. राजीव कपूर यांचे त्यांच्या वडिलांशी म्हणजेच राज कपूर यांच्याशी कधी पटले नाही. राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यात कायमचा दुरावा निर्माण झाला होता, असं म्हटलं जात आहे.

राजीव कपूर यांचा जन्म २५ ऑगस्ट १९६२ साली झाला. ते राज कपूर आणि कृष्णा कपूर यांचे सगळ्यात धाकटे पुत्र होते. सर्वात धाकटं मूल हे लाडाचं असतं परंतु राजीव कपूर हे धाकटे असूनही त्यांचं वडिलांशी कधीही पटलं नाही, त्या दोघांमध्ये सतत कुरबुर असायची. राजीव कपूर हे आपल्या वडिलांशी बोलत नव्हते. त्यांचा आपल्या वडिलांबद्दलचा द्वेष इतक्या पराकोटीचा होता की ते आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठीही गेले नाही. इतकं टोकाचं वागण्याइतकं नेमकं काय घडलं होतं या बाप-लेकांमध्ये?

वडिलांसोबतचं नातं बिघडलं

खरं तर एका सिनेमापासून राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यातील कुरबुरींना सुरुवात झाली होती. राज कपूर यांनी राजीव यांना बॉलिवूडमध्ये लाँच केलं होतं, परंतु त्यानंतर असं काही घडलं की त्यांच्यातील नातं बिघडत गेलं. राजीव कपूर यांनी आपल्या करिअरमधील अपयशासाठी कायम राज कपूर अर्थात आपल्या वडिलांनाच दोषी ठरवलं.

का बिघडलं वडील व मुलाचं नातं?

राज कपूर यांनी आपल्या मुलाच्या बॉलिवूडमधील पदार्पणासाठी १९८३ साली ‘एक जान है हम’ हा सिनेमा बनवला होता. या सिनेमामध्ये राजीव मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत होते. परंतु हा सिनेमा अपयशी ठरला. त्यानंतर राज कपूर यांनी राजीवसाठी ‘राम तेरी गंगा मैली’ हा सिनेमा बनवला, जो सुपरहिट झाला. पण या सिनेमानंतरच त्यांचे त्यांच्या वडिलांशी असलेले नाते आणखीनच बिघडले.

करिअरमधील अपयशासाठी राज कपूर यांना जबाबदार मानत होते

‘राम तेरी गंगा मैली’ हा सिनेमा यशस्वी झाला. परंतु या सिनेमाच्या यशाचे संपूर्ण श्रेय मंदाकिनीला मिळालं. या सिनेमामध्ये मंदाकिनी मुख्य नायिकेच्या भूमिकेत होती आणि तिची भूमिका इतकी स्ट्राँग होती की संपूर्ण चित्रपटच तिनं गिळंकृत केला. राजीव कपूरकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही. या सिनेमाने मंदाकिनीला एका रात्रीत स्टार बनवलं तर राजीव कपूर तिथल्या तिथेच राहिले. संपूर्ण कपूर खानदानामध्ये कलह निर्माण होण्यास हा सिनेमा कारणीभूत झाला.

राजीव कपूर यांना स्पॉटबॉय म्हणूनही काम करावं लागलं होतं

सिनेमातील कमजोर भूमिकेसाठी राजीव यांनी राज कपूर यांनाच दोष लावला. ते आपल्या वडिलांवर रागावले होते. राज कपूर यांनी आपल्यासाठी अजून एक सिनेमा बनवावा आणि त्यात आपल्याला स्ट्राँग भूमिका द्यावी, असे त्यांना वाटत होते. आपलं करिअर पुढे सरकण्यासाठी त्यांना एका यशस्वी चित्रपटाची प्रतिक्षा होती.

राज कपूर यांनी राजीवजींची मुख्य भूमिका असलेला सिनेमा काढण्याचं कबूलही केलं. परंतु त्यांनी नवीन सिनेमाही बनवला नाही आणि त्यामुळे राजीव यांचे मुख्य नायकाच्या भूमिकेचं स्वप्न पुरं झालं नाही. याउलट राज कपूर यांनी राजीव यांना आपल्या टीमच्या असिस्टंटचं काम दिलं. त्यामुळे राजीव कपूर यांना स्पॉट बॉयपर्यंतचं सर्व काम करावं लागलं होतं

आपल्या वडिलांच्या अशा वागणूकीमुळे राजीव यांना खूपच वाईट वाटलं होतं. राज कपूर यांचा मुलगा आणि ऋषि कपूर व रणधीर कपूर यांचा भाऊ असूनही मला माझ्या हक्काची संधी मिळू नये, ही सल त्यांच्या मनाला टोचत होती. राम तेरी गंगा मैली नंतर राजीव कपूर यांनी हम तो चले परदेस, अंगारे, लव्हर बॉय यांसारख्या १४ चित्रपटांमध्ये काम केले. परंतु त्यांना यश मिळालं नाही. त्यांचा कोणताच सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही. आणि आपल्या या साऱ्या अपयशाला त्यांनी राज कपूर यांना दोषी ठरविले.

वडिलांवरील रागामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासही नाही गेले

राजीव यांनी आयुष्यभर आपल्या वडिलांना माफ केले नाही. सतत त्यांना आपल्या अपयशासाठी दोषी ठरविले. वडिलांवरच्या रागामुळेच राजीव आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठीही गेले नाहीत. राज कपूर यांच्या निधनानंतर तीन दिवस ते दारूच्या नशेत राहिले पण शेवटपर्यंत त्यांनी आपल्या वडिलांचे तोंडही पाहिले नाही.