नीना गुप्ता असं का म्हणाली होती, ‘माझे वड...

नीना गुप्ता असं का म्हणाली होती, ‘माझे वडीलच माझे बॉयफ्रेंड होते’, (Why Neena Gupta Once Said That, Father was her ‘Boyfriend’, Know The Interesting Story Behind This On Father’s Day)

नीना गुप्ता (Neena Gupta) एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेच सोबतच ती एका मुलीची आई आहे. नीना गुप्ता नेहमीच आपल्या मर्जीने, आपल्याला हवं तसं जगली. प्रेमबिम ज्यावेळेस फालतू अन्‌ वेळेचा अपव्यय समजलं जायचं, त्यावेळेस नीनाने लग्नाशिवाय आई होण्याचं धाडस केलं. विव रिचर्ड्‌स या विवाहित क्रिकेटरच्या ती प्रेमात पडली, परंतु रिचर्डने तिच्याशी लग्नाला नकार दिल्यानंतर नीनाने एकले मातृत्त्व स्वीकारून आपली मुलगी मसाबाचे संगोपन केले. लग्न न करताच आई होण्याच्या तिच्या निर्णयामुळे तिला फार वाईट बोल ऐकून घ्यावे लागले. परंतु नीनाने कोणाचीही पर्वा न करता आपल्या मुलीचे पालन केले.

ज्यावेळेस कोणीही नीनाच्या बाजूने उभं राहिलं नाही, त्यावेळेस नीनाचे वडील तिच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. नीना आणि तिच्या वडिलांमध्ये चांगले बॉन्डिंग होते. तिच्या वडिलांनी मुलीच्या प्रत्येक निर्णयात तिची साथ दिली आणि मसाबाच्या पालनपोषणातही तिला सोबत केली. आज फादर्स डे (Father’s Day)च्या निमित्ताने नीना गुप्ताचे तिच्या वडिलांसोबतच्या नात्यातील बंध आपण जाणून घेऊया.

माझे वडील कुटुंबासाठी कर्ते पुरुष होते अन्‌ माझे बॉयफ्रेंड होते

एका मुलाखतीमध्ये नीनाने सांगितले होते की, तिने तिचे आयुष्य एकटेपणातच घालवले. बहुतेक त्यामुळेच तिने आपल्या वडिलांनाच बॉयफ्रेंड बनवले. तिला कोणीही बॉयफ्रेंड नव्हता अन्‌ पतीही तिच्यासोबत नव्हता. त्यामुळे माझे वडीलच माझे बॉयफ्रेंड होते. आमचे घर तेच चालवत होते, असे नीनाने सांगितले. कामाच्या ठिकाणी माझा अपमान केला गेला, तेव्हाची ही गोष्ट आहे. त्यावेळेस मी खूपच एकटी पडली होती, परंतु देवानेच मला पुढे जाण्यास शक्ती दिली.  

माझे वडील माझा कणा होते

नीनाने एकटीने मुलीचे पालन करण्याचा निर्णय घेतला होता, पण ते अजिबात सोपे नव्हते. वडिलांनी साथ दिली नसती, तर हे सगळं करण्यास अवघड गेले असते, असे नीनाने एका मुलाखतीत सांगितले होते. वडिलांनी तिच्यासाठी कसा त्याग केला आणि संकटसमयी कसे तिच्या पाठीशी उभे राहिले हे देखील तिने सांगितले. त्या दिवसांच्या आठवणींने नीनाला रडू आले.

‘मसाबाच्या संगोपनात माझ्या वडिलांचा मोठा वाटा होता. मला मदत करण्यासाठी ते मुंबईला शिफ्ट झाले होते. मी त्यांची किती आभारी आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. माझ्या आयुष्यातील सर्वात निर्णायक काळात माझा कणा बनून मला उभे राहण्यास त्यांनी मदत केली. माझा मोठा आधार बनले,’ असेही नीना म्हणाली.

माझ्यासोबत मसाबा आहे कारण मी विवियनवर खरं प्रेम केलं

नीना स्वतः तिच्या वडिलांच्या जवळ होती आणि आपली मुलगी मसाबाने सुद्धा पप्पा विवियन रिचर्ड्‌सचा मान राखावा, यासाठी ती सतत प्रयत्नशील असायची. ती म्हणते, ‘माझ्याकडे मसाबा आहे कारण माझं विवियनवर प्रेम होतं. अन्‌ तुम्ही एखाद्यावर प्रेम केल्यानंतर तुम्ही त्याचा द्वेष कसा करू शकता? आज प्रेम आहे, अन्‌ उद्या अचानक तुम्ही तिरस्कार करू लागाल असे होत नाही. मला ते नको आहे. मला तिच्या मनात वडिलांबद्दल तिरस्कार भरायचा नाही. मला त्याच्याबद्दल आदर आहे, तो मला आदर देतो, आणि आमची मुलगी आम्हा दोघांचा आदर करते.’