करण जोहरला या कारणामुळे म्हणतात बॉलिवूडची सीमा ...

करण जोहरला या कारणामुळे म्हणतात बॉलिवूडची सीमा आंटी, करणने स्वत: केला खुलासा (Why Karan Johar Is Called Seema Aunty Of Bollywood, Director Himself Reveals The Reason Behind This)

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलरच्या निशाण्यावर असतो. नेपोटिझमपासून ते लिंगभेदापर्यंत अनेक प्रकारचे आरोप त्याच्यावर लावले जातात. पण करण या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतो. काहीजण करण जोहरला बॉलिवूडची ‘सीमा आंटी’ म्हणतात. सीमा आंटी या नावामागचा मजेशीर खुलासा करणनेच केला आहे.

करण अलीकडेच ट्विंकल खन्नाच्या ‘द आयकॉन’ टॉक शोमध्ये गेला होता, तिथे त्याने अभिनेत्रीशी अनेक मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. या शोमध्ये जेव्हा ट्विंकल खन्ना करणला म्हणाली की तू इंडस्ट्रीची सीमा आंटी आहेस आणि नेटफ्लिक्स मॅचमेकिंग स्टार सीमा तपारिया सारख्या लोकांच्या जोड्या जुळवतोस. ट्विंकलचे हे विधान करणने मान्य केले आणि आपण बॉलिवूडचा मॅचमेकर असल्याचे कबुल केले.

या विषयावर करण म्हणाला, “मला लोकांच्या जोड्या जुळवण्यात आनंद मिळतो. त्यामुळे लोक एकत्र येतात. मॅचमेकिंग हा माझ्या आयुष्यातील एक अजेंडा आहे. आणि तो माझ्यामध्ये अनुवांशिकरित्या आला आहे. माझ्या वडिलांनी शशी कपूर, रेखा आणि वहिदा रहमान यांच्यासाठी मॅचमेकरची भूमिका पार पाडली होती. शशी अंकल आणि वहिदा आंटी यांचा साखरपुडा माझ्या आई आणि वडिलांच्या उपस्थितीत पार पडला होता. त्यामुळे तुम्ही म्हणू शकता की मॅचमेकिंग माझ्या रक्तात आहे आणि मला जोड्या बनवून आनंद मिळतो.

विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांची जोडी बनवण्यातही आपला हात असल्याचे गुपित पहिल्यांदाच करण जोहरने सांगितले. दोघांना एकत्र आणण्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागले होते. त्या दोघांसाठी रात्रीच्या जेवणाचीही व्यवस्था करावी लागली होती. करणने सांगितले की, बॉलिवूडमध्ये कोण कोणाला डेट करत आहे, कोणाचे लग्न कधी होणार आहे, कोण कोणाच्या प्रेमात पडणार आहे हे सर्व मला माहित आहे. एखाद्याचे ब्रेकअप होत असले तरी त्या जोडीला पुन्हा एकत्र आणण्याची जबाबदारी मी घेतो. त्यामुळेच मला बॉलिवूडची सीमा आंटी म्हटले जाते.

सीमा तपारिया यांना इंडियन मॅचमेकिंग क्वीन म्हटले जाते. त्या स्वतःला ‘मॅरेज कन्सल्टंट’ म्हणवतात. सीमा तपारियाने नेटफ्लिक्स शो ‘इंडियन मॅचमेकिंग’ चे दोन सीझन केले आहेत. हा शो लोकप्रिय झाल्यामुळे सीमा तपारिया यांना देखील प्रसिद्धी मिळाली.

करण जोहरच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाले तर, 2023 मध्ये त्याचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्टची जोडी पाहायला मिळणार आहे.