अनंत चतुर्दशीचे महत्त्व (Why Ganesh Visarjan Is...

अनंत चतुर्दशीचे महत्त्व (Why Ganesh Visarjan Is Done On Anant Chaturdashi)

भाद्रपद शुद्ध चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशी. दहा दिवस चालणाऱ्या श्री गणेश महोत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीच्या दिवशी होतो. आज अनंत चतुर्दशी आहे. हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. हिंदू श्रद्धेनुसार, विश्वाच्या निर्मितीपूर्वी भगवान विष्णूचे अनंत रूप अस्तित्वात होते. पूजेनंतर अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे. या धाग्यात १४ गाठी मारल्या जातात. रेशीम किंवा कापसाचा बनवलेला हा धागा श्री विष्णूंच्या १४ लोकांचं प्रतीक मानला जातो. स्त्रिया डाव्या हातात आणि पुरुष उजव्या हातात हा अनंत धागा बांधतात. अनंत धागा बांधल्याने सर्व दु:ख आणि संकटे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे.

अनंत चतुर्दशीची कथा  

अनंत चतुर्दशी साजरी करण्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पुराणानुसार पांडवांनी जुगारात आपले संपूर्ण राज्य गमावले होते. त्यानंतर त्यांना १२ वर्षांचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात घालवावे लागले. या काळात पांडवांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी जंगलात वास्तव्य केले होते. त्यावेळी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला आपले राज्य परत मिळवण्याचा आणि दुःख दूर करण्याचा मार्ग विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की जुगारामुळे माता लक्ष्मी तुझ्यावर नाराज आहे. तुम्हाला तुमचे राज्य परत मिळवायचे असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे व्रत ठेवा आणि भगवान विष्णूची पूजा करा. हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व काही परत मिळेल. यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला व्रताचे महत्त्व सांगणारी कथाही सांगितली. यानंतर युधिष्ठिराने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि पांडवांना त्यांचे राज्य परत मिळाले.

यामुळे अनंत चतुर्दशी दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते

गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते. यामागची पौराणिक कथा अशी आहे की, ज्या दिवशी वेद व्यासजींनी महाभारत लिहिण्यासाठी गणेशजींना महाभारताची कथा कथन करण्यास सुरुवात केली, ती भाद्र शुक्ल चतुर्थी तिथी होती. कथा सांगताना वेदव्यासजींनी डोळे मिटले आणि सलग १० दिवस ते गणेशजींना कथा सांगत राहिले आणि गणेशजी लिहित राहिले. १० व्या दिवशी जेव्हा वेदव्यासजींनी डोळे उघडले, तेव्हा त्यांनी पाहिले की गणेशजींच्या शरीराचे तापमान एका ठिकाणी बसून सतत लिहित असताना लक्षणीय वाढले आहे. अशा परिस्थितीत गणपतीला शीतलता देण्यासाठी वेद व्यासजींनी थंड पाण्यात डुबकी घेतली. जिथे गणपती वेदव्यासजींच्या सांगण्यावरून महाभारत लिहित होते, तिथे जवळच अलकनंदा आणि सरस्वती नद्यांचा संगम होता. ज्या दिवशी वेद व्यासजींनी सरस्वती आणि अलकनंदाच्या संगमात स्नान केले, तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. हेच कारण आहे की चतुर्थीला स्थापना झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते.