बच्चन कुटुंबातील सूनेची जागा राणीच्या जागी ऐश्व...

बच्चन कुटुंबातील सूनेची जागा राणीच्या जागी ऐश्वर्याने कशी घेतली? माशी कुठे शिंकली? (Why could Abhishek Bachchan and Rani Mukherjee not get married? What Went Wrong Between Their Relationship)

राणी मुखर्जी आज तिचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. आदित्य चोप्रासोबत गुपचूप लग्न करून सध्या इटलीत ती आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे. दोघांनाही एक लाडकी मुलगी आहे. परंतु, आदित्य हे राणीचे पहिले प्रेम नव्हते. सर्व काही आलबेल असते तर आज राणी मुखर्जी बच्चन कुटुंबाची सून झाली असती.

आदित्यच्या आधी राणी मुखर्जी अभिषेक बच्चनच्या प्रेमात पडली होती. जया बच्चन यांच्यामुळे अभिषेकची करिश्मा कपूरसोबतची अँगेजमेंट तुटली होती. अशा परिस्थितीत अभिषेकच्या आयुष्यात राणीची एन्ट्री झाली. दोघे ‘युवा’च्या सेटवर भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला. राणी मुखर्जी देखील बंगाली असल्याने जया बच्चन यांनीही या नात्याला होकार दिला होता, मात्र यावेळीही राणी-अभिषेकला दूर करण्यास आई जयाच कारण ठरली, असे म्हटले जाते.

त्याचं असं झालं की, २००७ मध्ये यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली प्रदर्शित झालेल्या ‘लागा चुनरी में दाग’ या चित्रपटात अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी आणि जया बच्चन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राणी मुखर्जी आणि जया बच्चन यांच्यात जोरात वादावादी झाली, त्यानंतर दोघांमधील संभाषण पूर्णपणे थांबले, असेही सांगितले जाते. सेटवर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यांच्यातील संबंध इतके बिघडले की राणीला अभिषेकपासून दूर राहावे लागले.

जया बच्चन यांच्या हट्टी आणि रागीट स्वभावाचा राणीला त्रास होत होता. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या संपूर्ण शूटिंगमध्ये दोघांनी एकमेकांशी संवाद साधलाच नाही. त्याचा वाईट परिणाम अभिषेक आणि राणीच्या नात्यावर झाला. या चित्रपटानंतर राणीच्या कुटुंबीयांनी बच्चन कुटुंबियांसोबत तिच्या लग्नाची चर्चा केली, तेव्हा जयाने राणीबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्याचं म्हटलं जातं की, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये अंतर निर्माण झालं.

एकीकडे असंही म्हटलं जातं की, ‘ब्लॅक’ चित्रपटातील राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांचा किसिंग सीनही राणीचं अभिषेकसोबतचं नातं संपवण्यास कारणीभूत ठरला. राणीला पडद्यावर वडिलांचे चुंबन घेताना पाहून केवळ अभिषेक बच्चनच नाही तर बिग बींची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांनाही राग आला आणि त्यानंतर अभिषेकने राणीपासून दुरावण्याचा निर्णय घेतला. राणीने अभिषेकला समजवण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही.

यानंतर अभिषेक बच्चनने २००७ मध्ये ऐश्वर्या रायसोबत लग्न केले, मात्र तो राणीवर इतका चिडला होता की त्याने त्याच्या लग्नाची पत्रिकाही तिला पाठवली नाही. त्यामुळे दोन्ही कुटुंबातील तणाव खूपच वाढल्याचे स्पष्ट झाले. नंतर जेव्हा राणीला एका मुलाखतीत विचारले गेले की, तिच्या अभिषेकसोबतच्या मैत्रीत काय बिनसलं, तेव्हा राणी म्हणाली होती – याबद्दल फक्त अभिषेकच सांगू शकतो. आता दोघेही विवाहित आहेत आणि दोघेही त्यांच्या जीवनात आनंदी आहेत.