मुलं आक्रमक का बनतात (Why Children Become Aggre...

मुलं आक्रमक का बनतात (Why Children Become Aggressive)

किशोरवयीन मुलं आक्रमक बनत आहेत. त्याची अनेक कारणं आहेत. मात्र हे टाळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.
मॉल, रस्ता, बाग अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी बरेचदा एक चित्र हमखास दिसतं, ते म्हणजे हट्ट करणारं मूल आणि बेजार झालेले पालक. पालकांच्या दृष्टीने ती वेळ, तो प्रसंग खरोखर बाका असतो. मुलं ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. अशा त्रस्त करणार्‍या अनुभवातून एक-दोनदा गेल्यावर, मया मुलाला पुन्हा कधी बाहेर नेणार नाही, असं पालक ठरवून टाकतात. तर दुसरीकडे आपल्या मनासारखं झालं नाही तर मुलं आक्रमक होतात आणि आपल्याला नकार देणार्‍या आई-वडिलांना, भावंडांना आपले शत्रू समजू लागतात. शाळेतही या मुलांना शिक्षकांनी ओरडलेलं, रागावलेलं रुचत नाही. तेथेही ती शिक्षकांसमोर त्यांनी सांगितलेलं ऐकलं न ऐकल्यासारखं करतात नि पुन्हा दुसर्‍या दिवशी मूळ पदावर येतात. असं काहोतं? याचा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की हल्लीच्या मुलामुलींच्या वाट्याला येणारे आजूबाजूचे सामाजिक वातावरण आणि त्यांची कौटुंबिक परिस्थिती यामुळे किशोरवयीन मुलंमुली हट्टी, आक्रमक आणि कधीकधी अचानक हिंसकही बनतात.
सद्य स्थितीत सर्वच क्षेत्रांतील धकाधकीच्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या वातावरणात टिकण्यासाठी प्रत्येक जण स्वार्थी, आप मतलबी आणि भौतिक सुखाच्या आहारी गेल्याचे दिसते. त्यांच्यामध्ये योग्य आचार विचार आणि सहनशीलतेचा अभाव असल्याचे दिसते. लहानसहान गोष्टींवरून माणसं चिडलेली, आक्रमक होताना आपण पाहतो हे आपण रोज वर्तमानपत्रात वाचतो. टी.व्ही., चित्रपट, इंटरनेटवर पाहतो. या परिस्थितीत जे दिसते, जे अनुभवास येते, तेच पाहून मुलं मोठ्यांच्या वागण्या बोलण्याचे अनुकरण करतात. ते जे बघतात, त्यातील चांगले-वाईट त्यांना कोण सांगणार, हा प्रश्‍न आहे.
कौटुंबिक परिस्थिती


हल्ली आई-वडील आणि मुल असं विभक्त कुटुंब असते. त्यातही आईवडील नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे मुलांच्या वाट्याला एकटेपण येते. तसेच पालकांच्या मुलां कडून असणार्‍या अपेक्षा यामुळे मुलांचं बालपण दबलं जाऊन मुलं लवकर मोठी होतात. मैदानी खेळांचा अभाव, त्यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीही होत नाही. मागील पिढीतील मुलामुलींना घरगुती खेळातून निखळ आनंद तर मिळायचाच शिवाय त्या खेळांतून त्यांचा बौद्धिक विकास, कल्पनाशक्तीला मिळणारी चालना, आत्मविश्‍वास या गोष्टी आपोआप मिळायच्या. तसेच वडीलधार्‍यांकडून ऐकलेल्या बोधपर गोष्टींमधून काही संस्कार होत असत. हल्लीच्या जीवन पद्धतीमुळे मुलंमुली या मूलभूत संस्कारांपासून वंचित राहतात.
अनेक घरांमध्ये बहुतेक करून एकुलती एक मुलं असतात. भावंडं नाहीत त्यामुळे घरगुती खेळांचे स्वरूपही बदलले आहे.आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याच्या भाबड्या भावनेने टॅब, स्मार्टफोन, इंटरनेट, व्हिडिओ गेम इत्यादी साधने न कळत्या वयात पुरविली जात आहेत. शाळेने दिलेला प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या निमित्ताने मुलंमुली कॅफेत जातात. तेथे ती काय बघतात, त्याबद्दल पालक अनभिज्ञ असतात.


व्हिडिओ गेममध्ये टास्क, मिशन, गोल या प्रकारातून कायम कुणाला तरी ढकलणे, नेस्तनाबूत करणे, कापणे, मारणे इत्यादी प्रकार करत पुढे जात राहणे, असे खेळ मुलं सतत खेळत असतात. त्याचेच पुढे व्यसन लागतेआणि मग अशी मुलंमुली वास्तविक जगात मनासारखे न झाल्यास आक्रमक प्रतिक्रिया देतात.
या सगळ्यांत दोष मुलांचा वा पालकांचा नाही, तर दोष परिस्थितीचा आहे. तर सर्व क्षेत्रात जसे अनुभवास येते, त्याचेच प्रतिबिंब लहान मुलामुलींमध्ये उमटते. तेव्हा बदल करायचाच झाला तर तो परिस्थितीत केला पाहिजे. तसेच मुलांना काय चांगले, काय वाईट हे शिकवण्याची प्रभावी व्यवस्था असावी. इंटरनेट, व्हिडिओ गेमवर बंधनं आणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांनी काय बघावं, काय बघूनये हे पालकांनीच ठरवावं, सरकारने नव्हे.