भारताचा गोल्ड मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बप्पी...

भारताचा गोल्ड मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बप्पीदा यांना सोन्याचे वेड कां होते? (Why Bappi Lahiri Was Passionate About Gold?)

हिंदी चित्रपटांना ८० आणि ९० च्या दशकामध्ये पॉप संगीताची ओळख करुन देणारे प्रसिद्ध गायक बप्पी लाहिरी यांचं आज (१६ फेब्रुवारी २०२२ रोजी) निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते. बप्पी लाहिरी यांच्या निधनासंदर्भात अनेकांनी सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केलाय. भारतीयांना डिस्को गाण्यांची ओळख करुन देणारा आणि त्याबद्दल प्रेम निर्माण करणारा संगीतकार आपल्यातून निघून गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीय.

बप्पी लाहिरी हे त्यांच्या गाण्यांबरोबरच सोनं, कपडे आणि खास शैलीसाठीही प्रसिद्ध होते. सोशल मीडियावरुनही अनेकदा त्यांनी आपलं सोन्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. अनेकदा ते त्यांच्या दागिन्यांचे फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना या प्रेमाबद्दल सांगायचे. निधनाच्या तीन दिवस आधी पोस्ट केलेल्या त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्येही सोन्याचा उल्लेख होता. मात्र हा उल्लेख दागिन्यांसंदर्भात नव्हता.

बप्पीदांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन १३ फेब्रुवारी रोजी एक जुना फोटो पोस्ट करण्यात आला होता. अन्‌ या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी ‘जुनं ते सोनं’ असं म्हटलं होतं. सोन्याची आवड असणाऱ्या या संगीतकाराच्या शेवटच्या पोस्टमध्येही सोन्याचा उल्लेख असावा हा विचित्र योगायोग असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. चाहते त्यांच्या या पोस्टवरून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

आपल्याला सोन्याचे दागिने घालण्याचा एवढा सोस कां आहे, याबाबत बप्पीदा यांनी स्वतःच एका मुलाखतीत खुलासा केला होता. अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्ली त्यांना आवडत होता. एल्विस नेहमी गळ्यात सोन्याची साखळी आणि अंगात सोन्याचा पोशाख घालत असे. त्याच्या या अनोख्या स्टाइलचा बप्पीदांवर जबरदस्त प्रभाव होता. शिवाय ते सोन्याला जास्त लकी समजत होते. त्यामुळेच त्यांनी एक नवीन शैली आत्मसात करत आपली एक स्वतंत्र प्रतिमा बनवली होती. त्यानंतर ते भारताचा गोल्ड मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले होते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या संपत्तीचा, सोने-चांदीचा तपशील समोर आला होता. तेव्हा आपली संपत्ती जाहीर करताना आपल्याकडे ७५४ ग्रॅम सोने आणि ४.६२ किलो चांदी आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. आज या ऐवजाची किंमत २ कोटी रुपयांहून अधिक भरेल. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नीकडे ९६७ ग्रॅम सोनं आणि ८.९ किलो चांदी असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. याशिवाय तिच्याकडे ४ लाखांहून अधिक हिरे होते. बप्पी लाहिरी मुंबईत ज्या आलिशान घरात राहत होते, त्या घराची किंमत सुमारे ३.५ कोटी रुपये आहे.

बप्पीदांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ साली पश्चिम बंगालमध्ये झाला. त्यांचे पिताजी बंगाली गायक होते आणि आई देखील संगीतकार होती. अशा रीतीने त्यांच्याकडे संगीत वंश परंपरेने चालत आले आहे. वयाच्या २१ व्या वर्षापासून ते बॉलिवूडमधील चित्रपटांना संगीत देऊ लागले. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगीत देत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. ‘चलते-चलते’ चित्रपटानंतर बप्पीदांची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढू लागली. बप्पीदांनी ‘नमक हलाल’, ‘शराबी’, ‘हिम्मतवाला’, ‘साहेब’, ‘गुरू’, ‘घायल’, ‘रंगबाज’ या चित्रपटांनाही संगीत दिलं.

बप्पी लाहिरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेता अजय देवगण, रविना टंडन, सुभाष घई अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बप्पी लाहिरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

(फोटो सौजन्य : बप्पी लहरी / इन्स्टाग्राम आणि ट्वीटर)