गायिका अनुराधा पौडवाल यांनी चित्रसृष्टीचा निरोप...

गायिका अनुराधा पौडवाल यांनी चित्रसृष्टीचा निरोप का घेतला? जाणून घेऊया त्यांच्या जीवनाची गूढ कहाणी… (Why Anuradha Paudwal Left The Mystery Of The Singer’s Life)

गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन मराठी भगिनींनी पार्श्वगायन क्षेत्रात अढळपद मिळवलं. लोकांच्या गळ्यातील त्या ताईत बनल्या. तसाच सुरीला आवाज घेऊन अनुराधा पौडवाल या तिसऱ्या मराठी गायिकेनं एका जमान्यात गायनक्षेत्र गाजवलं होतं. परंतु काही वर्षातच त्यांना या सिनेसृष्टीचा निरोप घ्यावा लागला होता.

असं काय घडलं होतं, त्यांच्या जीवनात, की त्यांना हा कठोर निर्णय घ्यावा लागला…

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

मराठी भावगीते आणि मराठी सिनेमात पार्श्वगायन करणाऱ्या अनुराधाजींना १९७३ साली आलेल्या ‘अभिमान’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीत प्रवेश मिळाला. त्यानंतर त्यांनी एकाहून एक सरस गाणी गायली, जी लोकप्रिय झाली. एस.डी.बर्मन, लक्ष्मीकांत – प्यारेलाल, कल्याणजी – आनंदजी, राजेश रोशन, जयदेव, नदीम-श्रवण अशा दिग्गज संगीतकारांची गाणी त्यांनी गायली.

फोटो सौजन्य इन्स्टागाम

त्यांच्या गोड आवाजातील गाणी इतकी लोकप्रिय होऊ लागली की, फिल्मी दुनियेत त्यांच्या नावाची मोठी चर्चा होऊ लागली. टी-सिरीज या म्युझिक कंपनीचे मालक गुलशन कुमार यांनी त्यांच्या गायनकलेला आभाळाएवढं मोठं केलं. त्यांनी टी-सिरिजसाठी अगिणत गाणी गायली. ऐश्वर्य आणि प्रसिद्धी मिळवली.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

टी-सिरीजशी करारबद्ध झाल्याने अनुराधाजींना आशिकी, तेजाब, बेटा, साजन, दिल है के मानता नही, एक दुजे के लिए अशा गाजलेल्या चित्रपटांतून संधी मिळाली. या गायिकेने लतादीदींची जागा घेतली, असं लोक बोलू लागले. स्पष्टवक्तेपणा असलेले व निर्भिड मत देणारे महान संगीतकार ओ. पी. नय्यर यांनी तर सरळ सांगितले की, आता लता मंगेशकरचा जमाना गेला. अनुराधा पौडवालने त्यांची जागा घेतली आहे.

करिअर उत्तुंग स्थानावर पोहचल्यावर अनुराधाजींनी आता आपण फक्त गुलशन कुमार आणि टी-सिरीज्‌ कंपनीसाठी गाणार, असा निर्णय घेतला. तेव्हा अनुराधा व गुलशन कुमार यांच्या प्रेमसंबंधांची दबक्या आवाजात चर्चा होऊ लागली. परंतु १९७७ साली गुलशन कुमार यांची निर्घृण हत्या झाली. तेव्हा अनुराधाजी उन्मळून पडल्या.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अनुराधा पौडवाल गायनक्षेत्रात आल्या तेव्हाच त्या चित्रसृष्टीतील नामवंत ॲरेंजर आणि संगीतकार अरुण पौडवाल यांच्या पत्नी होत्या. दुर्दैवाने अरुण पौडवाल यांचे हृदयविकाराने निधन झाले. तेव्हा अनुराधावर आकाश कोसळलं. पण त्याही परिस्थितीत डगमगून न जाता त्यांनी आपला मुलगा व मुलगी यांचं धीरानं संगोपन केलं. पण काळानं त्यांच्यावर पुन्हा एकदा आघात केला. अन्‌ गेल्याच वर्षी त्यांच्या तरुण मुलाचं निधन झालं.

चित्रसृष्टीपासून दूर राहत आता अनुराधा पौडवाल फक्त भक्तीगीते व भजन गातात. काही दिवसांपूर्वी त्या कपिल शर्मा शो मध्ये आल्या होत्या. तेव्हा त्यांनी आपल्या या दुराव्याबद्दल स्पष्ट केलं होतं की, “फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेहमीच निर्माता, दिग्दर्शक किंवा चित्रपटाच्या यशावर अथवा हिरो-हिरॉइनच्या मूडवर गाणी गावी लागतात. त्यामुळे माझ्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. भक्तीगीते, भजन मला नेहमीच आवडत होते. म्हणून मी बॉलिवूड सोडून भक्तीसंगीताची कास धरली.”

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अनुराधा पौडवाल यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचं राष्ट्रीय पारितोषिक, तसेच सूर सिंगर संसद व अन्य प्रथितयश संस्थेतर्फे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. आज वयोमानानुसार त्या प्रकृतीने स्थूल दिसत असल्या तरी त्यांची कारकीर्द ऐन बहरात असताना ‘सुरेल आवाजाची सुरेख गायिका’ असा नावलौकीक त्यांनी मिळवला होता.