अली असगरने या कारणामुळे नाकारला होता द कपिल शर्...

अली असगरने या कारणामुळे नाकारला होता द कपिल शर्मा शो (Why Ali Asgar Quit ‘The Kapil Sharma Show’, Now Actor Revealed The Real Reason)

द कपिल शर्मा शोचे भारतासोबतच परदेशातही चाहते आहेत. या शोच्या सर्व पात्रांच्या मेहनतीमुळे आणि कौशल्यामुळे ‘द कपिल शर्मा शो’ जगभरात लोकप्रिय झाला आहे.’द कपिल शर्मा शो’च्या नवीन सीझनमध्ये अनेक जुने कलाकार यावेळी दिसत नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे कपिलच्या ऑनस्क्रीन आजीची भूमिका साकारणारा अभिनेता अली असगर.

यावेळच्या सीजनमध्येही अली दिसत नसला तरी प्रेक्षक त्याची खूप आठवण काढत आहेत. अली असगरने 2017 मध्ये ‘द कपिल शर्मा शो’चा निरोप घेतला होता. कपिलची ऑनस्क्रीन आजी अचानक शोमधून गायब झाल्यामुळे चाहते खूपच निराश झाले होते. त्यावेळी अलीने क्रिएटीव्ह मतभेदांमुळे शो सोडल्याचे सांगितले होते. आता याबाबत अलीने खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत अली असगरने सांगितले की, मला माझ्या व्यक्तिरेखेत कोणताही वाव दिसत नव्हता. त्यामुळे मी तो शो सोडला. मुलाखतीत, जेव्हा त्याला कपिल शर्मासोबतच्या त्याच्या बॉण्डिगबद्दल विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्याने उत्तर दिले की, अनेकदा माझ्याकडून कपिलचा कॉल मिस होतो किंवा त्याच्याकडून माझा कॉल मिस होतो. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, कपिल आणि त्याच्यामध्ये ना कोणते भांडण आहे ना कोणत्याही गोष्टीचा राग आहे.

अली असगरने पुढे सांगितले की, शो सोडल्यानंतर मी कपिल शर्माला कधीही भेटलो नाही. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमातही मी त्याला भेटलो नाही. मला पार्ट्या आवडत नाहीत, त्यामुळे अशा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचा भाग होणे मी टाळतो. अलीच्या म्हणण्यानुसार, त्याला शो सोडण्याचे खरे कारण सांगण्याची संधी कधीच मिळाली नाही, परंतु आता त्याने सांगितले आहे की त्याच्या पात्रात वाव नसल्यामुळे त्याने शो सोडला आहे.

मुलाखतीत अली असगरने दु:ख व्यक्त करत सांगितले की, जेव्हा लोक एक अष्टपैलू अभिनेता म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा मी साकारलेल्या भूमिका आठवताना मला खूप त्रास होतो. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दादीच्या भूमिकेसाठी अली असगर प्रसिद्ध होता.

मला आगामी प्रोजेक्टमध्ये पाहिल्यानंतर प्रेक्षकांचा माझ्याबद्दलचा समज बदलू शकेल, अशी आशा अभिनेत्याने व्यक्त केली आहे. अलीकडेच तो ‘झलक दिखला जा 10’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसला होता.