कोण होणार मुख्यमंत्री? दिवटे की मुरकुटे? आज प्र...

कोण होणार मुख्यमंत्री? दिवटे की मुरकुटे? आज प्रदर्शित होणाऱ्या ‘मी पुन्हा येईन’ वेब सिरीजमध्ये दिसणार (Who Will Be The Next C M? Result Expected In New Episodes Of Web Series ‘Mi Punha Yein’)

प्लॅनेट मराठी निर्मित ‘मी पुन्हा येईन’ वेबसीरिजचा गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आणि त्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. आता ‘मी पुन्हा येईन’चे अखेरचे दोन भाग आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत.

पळून गेलेले ४ अपक्ष आमदार परत रिसॉर्टवर कसे येतात?, अपक्ष आमदारांनी सत्तेचा पाठिंबा काढल्यावर तपास यंत्रणेचा बेमालूमपणे वापर?, पोलिसांवरील दबावतंत्र, राजकारणी नेहमी कसे सर्वश्रेष्ठ असतात? हे सांगण्याचा आमदारांचा प्रयत्न, राजकारण्यांच्या सोयीप्रमाणे अधिकाऱ्यांचा वापर कसा केला जातो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज प्रेक्षकांना मिळणार आहेत. मुख्य बाब म्हणजे वेबसीरिजच्या शेवटच्या दोन भागात कोण सत्ता स्थापन करणार? नक्की दिवटे की मुरकुटे? याचे उत्तरही मिळणार आहे.

‘प्लॅनेट मराठी’ चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता लवकरच शेवटचे दोन महाएपिसोड्स प्रदर्शित करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.  राजकारणावर भाष्य करणारी ही एक व्यंगात्मक वेबसीरिज आहे. राजकारणातील सध्याची घडामोड पाहता प्रेक्षकांना वेबसीरिज एक वेगळा विचार करायला भाग पाडणार हे नक्कीच. शेवटच्या दोन महाएपिसोड्समध्ये नक्की कोण मुख्यमंत्री होणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.”

अरविंद जगताप दिग्दर्शित ‘मी पुन्हा येईन’मध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका असून याची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी व जेम क्रिएशन्सने केली आहे.