कोण आहे संदीप नाहर? इंजिनिअरिंग सोडून अभिनयक्षे...

कोण आहे संदीप नाहर? इंजिनिअरिंग सोडून अभिनयक्षेत्रात कसा आला? (Who is Sandeep Nahar? Know How He Left Engineering And Stepped into The World of Acting)

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमामध्ये ‘परम भैया’ची भूमिका साकारणारा अभिनेता संदीप नाहर याच्या आत्महत्येच्या बातमीने दर्शकांना फारच हेलावून सोडले आहे. १५ फेब्रुवारीला संदीपने गोरेगाव येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली असून आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर एक लांबलचक सुसाइड नोट आणि व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्याने आपल्या आत्महत्येचे कारण सांगितले आहे. संदीपच्या अशा प्रकारे जाण्याने मनोरंजन जगताला एक मोठा धक्का बसला आहे. चला, तर मग हा संदीप नाहर कोण होता आणि आपलं इंजिनिअरिंगचं क्षेत्र सोडून अभिनयात तो कसा आला? याबाबत जाणून घेऊया.

Photo Credit: Instagram

संदीपला त्याच्या कुटुंबातील लोक आणि मित्र प्रेमाने ‘रजनीश सँडी’ म्हणून हाक मारायचे. एका मध्यम वर्गीय कुटुंबात राहणाऱ्या संदीपचे वडिल हे फॉरेस्ट ऑफिसर होते आणि आपल्या मुलानेही सरकारी नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. संदीपनेही इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एमसीएसईचे ट्रेनिंग घेतलं होतं आणि तो नोकरीही करत होता. त्यानंतर २००९ साली आवड म्हणून त्याने मॉडेलिंग केलं. त्याचा अभिनय वा सिनेमा याच्याशी सुतराम संबंध नव्हता. शिवाय सिनेमात काम करण्याचा इरादाही नव्हता. परंतु त्याचं नशीबच त्याला या क्षेत्रात घेऊन आलं असं म्हणावं लागेल.

Photo Credit: Instagram

२००९ सालापासून संदीप नाहरने अभिनयक्षेत्रात आपलं करिअर करण्यासाठी हातपाय मारायला सुरुवात केली खरी पण त्या स्ट्रगल दरम्यान त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. अभिनयाशी त्याचा दूरपर्यंत काहीही संबंध नव्हता, तरीही त्याने इंजिनिअरिंग सोडून अभिनयाच्या चमचमत्या क्षेत्रात उडी घेतली होती. त्याने अगदी मोजक्याच चित्रपटांतून काम केले, परंतु या मोजक्या अभिनयानेच त्यांने आपल्या दर्शकांच्या मनात घर बनवले.

Photo Credit: Instagram

मॉडेलिंग करत असतानाच त्याचे एक-दोन व्हिडिओ खूपच प्रसिद्ध झाले. त्यानंतर अनेक लोकांनी त्याला मुंबईला येण्याचा सल्ला दिला. आपल्या गावाचं नाव उंचावण्यासाठी संदीप हरियाणातील कालका येथून सरळ मायानगरी मुंबईमध्ये आला. परंतु आरोग्याच्या कुरबुरीमुळे २००९ मध्येच त्याला गावी परत जावे लागले. २०१० मध्ये गावाहून परत आल्यानंतरही काही काम मिळाले नाही. परंतु त्याने हार न मानता २०१२ला आपल्या करिअरसाठी पुन्हा एकदा स्ट्रगल करण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit: Instagram

स्ट्रगल करत असतानाही आपल्या वडिलांवर अवलंबून न राहता त्याने जिम ट्रेनर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याशिवाय त्याने बाउंसरचंही काम केलं. त्यानंतर २०१४ मध्ये त्यास ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ या मालिकांच्या काही भागांमध्ये काम करण्यास मिळालं. येथूनच त्याच्या अभिनयास सुरुवात झाली. २०१५ सालामध्ये स्टार प्लसवरील ‘दीया और बाती हम’ या मालिकेत काम करण्याची त्यास संधी मिळाली. यामधील संदीप बब्बनच्या भूमिकेसाठी त्याला आपली मिशी ठेवावी लागली होती.

Photo Credit: Instagram

दरम्यान त्याला एका शीख व्यक्तीच्या ऑडिशनसाठी कॉल आला आणि ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडेय यांना त्याचं ऑडिशन खूप आवडलं व या चित्रपटात त्याला ‘परम भैयाची’ भूमिका मिळाली. या चित्रपटानंतर जवळपास ११ महिन्यांनी संदीपला ऑल्ट बालाजी यांच्या ‘कहने को हम सफर है’ या वेब सिरीजमध्ये काम करण्याची संधी मिळाली, मग ‘केसरी’ सिनेमाच्या ऑडिशनसाठी कॉल आला आणि या सिनेमानंतर अभिनयाचे दरवाजे संदीपसाठी खुले झाले. एकीकडे करिअरमध्ये यश मिळत असतानाच त्याच्या खाजगी आयुष्यात मात्र समस्या सुरू झाल्या.

Photo Credit: Instagram

Photo Credit: Instagram

शेवटी स्वतःच्या खाजगी आयुष्यातील समस्यांपुढे त्याने हार मानली. त्या समस्यांतून मार्ग काढण्याऐवजी त्याने स्वतःचं आयुष्य संपवून टाकण्याचा मार्ग स्वीकारला. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या त्याच्या सुसाइड नोटवरून असं वाटतं की त्याची जगण्याची इच्छा मरुन गेली होती. त्याला अतिशय नैराश्य आलं होतं. आपल्या बायकोमुळे मी आत्महत्या करत असल्याचे त्याने नोटमध्ये लिहिल्यामुळे कंचन शर्माची चाहत्यांकडून फारच निंदा केली जात आहे आणि संदीपच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.