ही अभिनेत्री साकारणार “तारक मेहता…” मधील दयाबेन...

ही अभिनेत्री साकारणार “तारक मेहता…” मधील दयाबेनची भूमिका (Who is new Dayaben? Rakhi Vijan to replace Disha Vakani on ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’?)

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) यामधील लोकप्रिय पात्र असलेली दयाबेन (दिशा वकानी) ही गेली चार वर्षे शोमध्ये दिसली नव्हती. काही कारणात्सव दिशा वकानी यांनी शो सोडला होता. तेव्हापासून प्रेक्षक ‘दयाबेन’ला शोमध्ये मिस करत होते. पण, अखेर आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. कारण शो च्या निर्मात्यांना नवीन ‘दयाबेन’ मिळाली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री राखी विजन-टंडन (Rakhi Vijan) या शोमध्ये आता ‘दयाबेन’चं पात्र निभावणार आहे. यामुळे प्रेक्षकांना नवी दयाबेन आणि जेठालाल याला नव्या स्वरुपातली दया मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी तर घराघरात हिट आहे. परंतु, या मालिकेत दया बेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७ पासून मालिकेपासून लांब आहे. यामुळे दयाबेन कधी परतणार? असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे. मागील काही दिवसांपासून तिच्या जागी दुसरी अभिनेत्री येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

आता मात्र चाहत्यांना या शोमध्ये दयाबेनची भूमिका परत पाहायला मिळणार आहे. मात्र दिशा ही भूमिका साकारणार नाही तर हम पांच फेम स्वीटी उर्फ अभिनेत्री राखी विजन-टंडन दयाबेनची भूमिका साकारणार आहे. राखी बऱ्याच दिवसांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राखी या भूमिकेत स्वत:चे वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करणार आहे. या संदर्भात तिने टीमशी चर्चा केली आहे. कारण कोणतीही गाजलेली भूमिका करणे हे कलाकारासाठी आव्हानात्मक असते. त्यात आजही अनेक लोक राखीला फक्त स्वीटी नावानेच ओळखतात. त्यामुळे दयाबेनसारखी गाजलेली भूमिका करणे इतके सोपे नाहीये.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही सिटकॉमचे निर्माता असित कुमार मोदी यांनी अलीकडेच मीडियाला माहिती दिली होती की, दयाबेन हे प्रसिद्ध पात्र शोमध्ये परत येईल. परंतु दयाबेनची भूमिका करणारी दिशा वकानीच्या पुनरागमनाची पुष्टी करू शकत नाही. शोचे दर्शक त्यांच्या आवडत्या दिशा वकानीला मिस करत आहेत. अभिनेत्री दिशा वकानी नेहमीच सर्वांच्या आठवणींत राहणार आहे. जुनी दयाबेन दिशा वकानीचे ‘हे माँ माताजी’ पासून ते ‘टप्पू के पापा’ पर्यंत सिग्नेचर डायलॉग चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहेत.

नव्या दयाबेनच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आलेली राखी विजन-टंडन ही देखील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे कॉमेडी टायमिंग सेन्स चांगले आहे. राखीने याआधी ‘देख भाई देख’, ‘बनेगी अपनी बात’, ‘नागिन ४’ यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. तिने ‘गोलमाल रिटर्न्‍स’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. तसेच ‘बिग बॉस २’ मध्येही ती सहभागी झाली होती.