हर हर शंभू गाऊन लोकप्रिय झालेली फरमानी नाझ कोण ...

हर हर शंभू गाऊन लोकप्रिय झालेली फरमानी नाझ कोण आहे? (Who is `Har Har Shambhu’ singer Farmani Naaz? Know her struggle story)

श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी हर हर शंभो हे भजन गाणारी गायिका फरमानी नाझ घरोघरी लोकप्रिय झाली आहे. महादेवांचं हे भजन फरमानीने इतकं मनापासून गायलं आहे की श्रोते तिच्या भजनात तल्लीन होत आहेत. प्रत्येकाच्या तोंडी हे भजन ऐकू येऊ लागलं आहे. त्यामुळे साहजिकच फरमानी नाझ आहे तरी कोण हे जाणून घेण्याचीही उत्सुकता वाढली आहे. जाणून घेऊया तिच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी.

आई-वडिलांनी कर्ज घेऊन करून दिले लग्न

मुझफ्फरपूरच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या फरमानीच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तरीही मुलीच्या सुखासाठी त्यांनी लाखोंचे कर्ज काढून थाटामाटात तिचे लग्न केले. सुरुवातीला नवऱ्यासोबत छान चाललं होतं. वर्षभरातच तिला मुलगा झाला. पण त्यानंतर नवऱ्याने तलाक न देताच तो तिला सोडून गेला. नवरा सोडून गेल्यावर सासरी तिचा छळ सुरू झाला. त्यात मुलगा आजारी पडला त्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा तिच्यामागे सुरू झाला. शेवटी एके दिवशी तिच्या संयमाचा बांध फुटला आणि ती आपल्या मुलासह माहेरी आली.

मुलाच्या आजारपणाने तिला गायिका बनवले

सुरुवातीला तिने मुलाच्या दुधासाठी आणि उपचारासाठी काही दागिने विकले, पण काही दिवसांतच पैसे संपले. फरमानीचा आवाज लहानपणापासूनच चांगला होता, म्हणून तिच्या मामाच्या मुलाने तिची राहुल नावाच्या YouTuberशी ओळख करून दिली. त्यांना फरमानीचा आवाज आवडला आणि २५ हजार पगार आणि मुलाच्या उपचाराचा खर्च देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी तिच्याकडून गाणी गाऊन घेण्यास सुरुवात केली. फरमानीने प्रथम हीर रांझा हे गाणे गायले. या गाण्याला तीन दिवसांत १० मिलियन व्ह्यूज मिळाले. यानंतर फरमानीने एकामागून एक अनेक गाणी रेकॉर्ड केली आणि ती लोकप्रिय झाली.

इंडियन आयडॉल मध्ये निवड, कुमार शानू सोबत गायली

फरमानीचे यश पाहून राहुलने आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव बदलून फरमानी नाझ सिंगर असे ठेवले आणि तिचा पगार ३५००० इतका वाढवला. २०२० मध्ये, फरमानीला कुमार सानूसोबत गाण्याची संधी मिळाली, ज्यासाठी तिला ४५००० रुपये मिळाले. त्याच वर्षी तिने इंडियन आयडॉलसाठी ऑडिशन देखील दिली आणि तिची निवड झाली, परंतु मुलाच्या उपचारांमुळे ती मुंबईला जाऊ शकली नाही. आता राहुलने नाझ भक्ती, नाझ नजम आणि नाझ म्युझिक नावाने आणखी तीन यूट्यूब चॅनेल सुरू केले आहेत. राहुल, फरमानी आणि फरमान हे तिन्ही वाहिन्यांचे भागीदार आहेत. एके काळी फरमानीकडे मुलाच्या दूधासाठी पैसे नव्हते, पण आता तिने तिच्या माहेरच्यांनी तिच्या लग्नासाठी घेतलेले ८ लाखाचे कर्ज फेडले असून घरही नव्याने बांधून घेतले आहे.

मुस्लिम असून तिनं हे भजन का गायलं

नुकत्याच तिने गायलेल्या हर हर शंभू या गाण्यावर देवबंदच्या उलेमांनी फरमानीच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना उत्तर देताना ती म्हणते, “माझे पती मला सोडून गेले तेव्हा हे उलेमा कुठे होते. मी एक कलाकार आहे आणि कलाकाराला कोणताही धर्म नसतो. मी कवाली गाते. मी भक्तीगीते देखील गाते. ते म्हणतात की, नृत्य गाणे इस्लाममध्ये हराम आहे, परंतु माझ्यासाठी माझ्या कलेपेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. ,

फरमानीने गायलेलं हे भजन कावड यात्रेत लोकप्रिय झालं. पण देवबंद उलेमाने फरमानीला हे धर्माच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. त्यावरून सोशल मीडियावर हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. पण कलाकार म्हणून मी हे गाणं गायलं असून, गाणं गाऊनच मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचं फरमानी सांगते.

फरमानीच्या हर हर शंभो गाण्याला तुफान लोकप्रियता मिळत आहे. ७ लाख लोकांनी तिचं हे गाणं पाहिलं, ऐकलं आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे.