टीव्हीची संध्या बिंदणी म्हणजेच दीपिका सिंहला बा...

टीव्हीची संध्या बिंदणी म्हणजेच दीपिका सिंहला बालपणी पैशांच्या कमतरतेमुळे ऐकावे लागले होते शाळेतल्या मुख्याध्यपकांचे टोमणे(When TV’s ‘Sandhya Bindani’ Deepika Singh Was Taunted by School Principal, Family had Faced from Financial Crisis due to Bankruptcy of Her Father)

स्टार प्लसवरील हिट शो ‘दिया और बाती हम’मध्ये ‘संध्या बिंदणी’ ही व्यक्तिरेखा साकारून अभिनेत्री दीपिका सिंह रातोरात प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. या डेली सोपनंतर दीपिका पडद्यावर कमी दिसली पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी जोडली गेली आहे.

संध्या बिंदणी या नावाने घरोघरी प्रसिद्ध असलेल्या दीपिका सिंहसाठी आता ती ज्या स्थानावर आहे ते मिळवणे इतके सोपे नव्हते कारण तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला आहे. तिच्या आयुष्यात एक असा टप्पा आला होता जेव्हा तिचे वडील कर्जबाजारी झाले आणि घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिला असे काही टोमणे मारले होते जे आठवल्यावर आजही तिचे डोळे पाणावतात.  नुकत्याच एका मुलाखतीत, अभिनेत्रीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना, आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी होती आणि तिला कोणत्या प्रकारचे टोमणे ऐकावे लागले हे सांगितले.

‘दिया और बाती हम’ या मालिकेतून नाव आणि प्रसिद्धी मिळविलेल्या दीपिका सिंहने मुलाखतीत सांगितले की, तिला चार भावंडे आहेत. त्यांच्यात ती सर्वात मोठी आहे. दीपिकाच्या बालपणी तिच्या कुटुंबाला अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागले होते. आपल्या शाळेतील दिवसांची आठवण करून देताना दीपिकाने सांगितले की, एकदा तिला आणि तिच्या भावाला शाळेतून दप्तर घेतल्याशिवाय घरी पाठवले होते, कारण त्यांची बसची फी दिली नव्हती.

 एअरफोर्स स्कूलमध्ये आठवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर दीपिकाला सरकारी शाळेत घातले. त्यावेळी तिने स्वतः मुख्याध्यापकांकडे जाऊन आपली मार्कशीट दाखवली, पण बसची फी वेळेवर जमा करू न शकल्यामुळे मुख्याध्यापकांनी टोमणा मारला की, जर तुमच्याकडे बससाठी पैसे नसतील तर तुम्ही अशा मोठ्या शाळेत शिकायला का येता ? मुख्याध्यापकांचे बोलणे त्यावेळी तिच्या मनाला खूप टोचले. त्यामुळेच आयुष्यात काहीतरी मोठे करावे, असे मनात ठरवल्याचे दीपिका म्हणाली.

मुलाखतीत दीपिकाने पुढे सांगितले की, आयुष्यात आलेल्या अडचणींमुळे मी हिंमत हरली नाही, त्या अडचणींमुळे मी अधिक मजबूत झाली. माझ्या वडिलांचा भरतकामाचा कारखाना होता, तो तोट्यात चालला होता. आम्ही लहान असताना मुंबईहून अमेरिकेत एक शिपमेंट गेली, पण दुर्दैवाने त्याचवेळी प्लेगचा रोग पसरला होता. आणि त्या शिपमेंटमुळे लागण होऊ शकते या विचाराने अमेरिकेत तिला आग लावण्यात आली.

त्यात माझ्या वडिलांचा खूप माल होता. जो आगीत सगळा जळाला. ते कर्जबाजारी झाले. तरी त्यांनी पुढील 2/3 वर्षे घर नीट सांभाळले. तेव्हा काहीच वाटले नाही. पण जेव्हा शाळेची आणि बसची फी न भरल्यामुळे टोमणे ऐकावे लागले तेव्हा मात्र खऱ्या परिस्थितीची जाणीव झाली. वडील कर्जबाजारी झाल्यामुळे लोक वेगवेगळ्या प्रकारचे टोमणे मारायचे. पण शाळेच्या मुख्याध्यापकांनी टोमणा मारल्यावर आम्हाला समजले की आमची परिस्थिती आता पहिल्यासारखी राहिलेली नाही.

बालपणी आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्या दीपिका सिंहने 2011 मध्ये ‘दिया और बाती हम’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर 2014 मध्ये तिने याच मालिकेचे दिग्दर्शक रोहित राज गोयलसोबत लग्न केले. या जोडप्याला एक मुलगा आहे आणि आता ही अभिनेत्री ‘टीटू अंबानी’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन तिचे पती रोहित राज गोयल यांनीच केले आहे.