हिंदी चित्रपटात या अभिनेत्रीने जेव्हा पहिले चुं...

हिंदी चित्रपटात या अभिनेत्रीने जेव्हा पहिले चुंबन दृश्य दिले, तेव्हा माजली होती खळबळ (When This Actress Gave The First Kissing Scene In A Hindi Film, There Was A Ruckus Everywhere)

एक काळ असा होता की ज्यावेळेस चित्रपटांत चुंबन दृश्य दाखवायचं झालं की दोन फुलं एकत्र आलेली वा इतर प्रतिकात्मक असं काहीतरी दर्शविलं जायचं. परंतु आत्ताच्या चित्रपटांमध्ये बेधडकपणे लांबच लांब चुंबन दृश्यं दाखविली जातात, अन्‌ पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही त्यात काही गैर वाटत नाही. आत्ताच्या पिढीने हा बिनधास्तपणा स्वीकारला आहे. फार पूर्वी जेव्हा स्त्रिया आपल्या पतीचे नावही घेत नसत, लाजणे हा स्त्रियांचा अलंकार समजला जात असे, त्यावेळेस कोणी चुंबन दृश्य प्रदर्शित केल्यानंतर समाजातून काय प्रतिक्रिया उमटल्या असणार? कल्पना करा. परंतु अशा एका अभिनेत्रीची इतिहासात नोंद आहे, जिने चित्रपटात पहिलं चुंबन दृश्य देण्याचं धाडस दाखवलं होतं.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

जवळपास ८९ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, ज्यावेळेस एका हिंदी चित्रपटामध्ये पहिल्यांदाच चुंबन दृश्य चित्रित करण्यात आलं होतं. १९३३ साली ‘कर्मा’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेता हिमांशु राय आणि अभिनेत्री देविका रानी हे यातील प्रमुख कलाकार होते. याच चित्रपटात या दोघांमध्ये हा चुंबनाचा सीन चित्रित केला गेला होता.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सांगायचं म्हणजे, या ‘कर्मा’ चित्रपटामध्ये देविका रानी आणि हिमांशु राय यांच्यामध्ये पूर्ण ४ मिनिटांचं चुंबन दृश्य चित्रित करण्यात आलं होतं. चित्रपटातील एका दृश्यात नायक बेशुद्ध असतो आणि त्याला शुद्धीवर आणण्यासाठी नायिका त्यास चुंबन देते असे दाखविण्यात आले आहे. पहिल्यांदा जेव्हा प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला त्यावेळेस खळबळ माजली होती. बऱ्याच दर्शकांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट होती. अर्थात्‌ ज्यावेळेस पती-पत्नी एकमेकांचा हात हातात घेऊनही चालत नसत, त्यावेळी ४ मिनिटांचं चुंबन दृश्य… म्हणजे फार मोठंच धाडस होतं.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

खरं म्हणजे चित्रपटातील नायिका देविका रानी आणि नायक हिमांशु राय हे खऱ्या जीवनातही एकमेकांचे जोडीदार होते. त्यामुळे त्यांना असं दृश्य चित्रित करताना फार अवघडल्यासारखं वाटलं नाही. परंतु प्रेक्षकांना हे दृश्य पचनी पडण्यास विचार करावा लागला होता.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अभिनेत्री देविका रानी ही हिंदी सिनेसृष्टीतील पहिली नायिका होती, जिने समाजाची कोणतीही भीड न बाळगता, हिमतीने व साहसाने हे दृश्य चित्रित करण्याचं मोठं आव्हान स्वीकारलं होतं. ज्यामुळे इतिहासात तिचं नाव नोंदवलं गेलं. देविका रानी भारतीय सिनेमातील पहिली नायिका म्हणूनही ओळखली जाते. वयाच्या २८व्या वर्षी देविकानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित होणारी ती पहिली अभिनेत्री होती. १९६९ साली देविका रानी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार अन्‌ १९५८ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले गेले होते.