या ॲक्शन दिग्दर्शकाने कपिल शर्माला जोरदार कानाख...

या ॲक्शन दिग्दर्शकाने कपिल शर्माला जोरदार कानाखाली लगावली होती (When This Action Director Slapped Kapil Sharma and Sent Him Out From Set, Know This Interesting Story)

‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिल शर्मा स्वत:बद्दल नेहमीच वेगवेगळे रंजक किस्से सांगत असतो. अनेकदा तो त्याच्या कॉलेजमधले तसेच त्याच्या संघर्षाच्या दिवसांतले किस्सेही चाहत्यांशी शेअर करत असतो. या शोच्या एका एपिसोडमध्ये त्याने सनी देओलला गदर चित्रपटासंबंधी एक आठवण सांगितली. गदर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये कपिल गर्दीतल्या एका दृष्याचा भाग बनला होता. तेव्हा त्याला चित्रपटाचे ॲक्शन दिग्दर्शक टीनू वर्माचा ओरडा खावा लागला होता. अलीकडेच टीनू वर्मांनी सुद्धा या चित्रपटाशी संबंधीत एक रंजक किस्सा सांगितला.

ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या एका मुलाखतीत ‘गदर’ चित्रपटाचे ॲक्शन डायरेक्टर टीनू वर्मा यांनी शूटिंगदरम्यान कपिल शर्माला कशी जोरदार कानाखाली मारली आणि सेटवरून हाकलून लावले तो किस्सा सांगितला.

टीनू यांनी सांगितले की गदर चित्रपटाच्या एका सीनचे शूटिंग चालू होते. त्यात जमलेल्या गर्दीतल्या लोकांना ट्रेनच्या दिशेने पळायचे होते. लोकांना सर्व समजावून सांगितल्यावर जेव्हा मी ॲक्शन बोललो तेव्हा सगळे ट्रेनच्या दिशेने पळाले पण एक मुलगा मात्र ट्रेनच्या विरुद्ध दिशेला पळत होतो. आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून कपिल शर्मा होता. कपिल गर्दीच्या विरुद्ध दिशेला धावल्यामुळे त्यांना तो सीन पुन्हा शूट करावा लागला होता.

कपिलला ओरडल्यानंतर जेव्हा पुन्हा ॲक्शन बोललो तेव्हा मी पुर्ण लक्ष कपिलवरच ठेवले होते. पण कपिलने पुन्हा तिच चूक केली. तो पुन्हा गर्दीच्या विरुद्ध दिशेलाच धावला. तेव्हा मला खूप राग आला आणि मी कपिलजवळ जाऊन त्याच्या जोरात कानाखाली लगावली आणि त्याला सेटच्या बाहेर काढले.

कपिलनेदेखील त्याच्या शोमध्ये हा किस्सा सांगितला होता. कपिल शर्मा शो काही दिवसांपूर्वीच ऑफएअर गेला होता पण आता पुन्हा एकदा हा शो नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.