टीव्ही आणि बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी हुशारीने...

टीव्ही आणि बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी हुशारीने लपवली होती त्यांची प्रेग्नंसी (When These Actresses From TV to Bollywood Hide Their Pregnancy, Surprised Fans by Giving Good News After Birth of Child)

कलाकार छोट्या पडद्यावरील असोत वा मोठ्या पडद्यावरील त्यांच्या चाहत्यांना मात्र कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घेण्यात खूप रस असतो. चाहते नेहमीच आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल प्रत्येक छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आतुर असतात. शिवाय या ग्लॅमसर इंडस्ट्रीमध्ये कोणतीच गोष्ट लपूनही राहत नाही. पण अनेकदा सेलिब्रिटी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी मीडियापासून लपवण्याचा अतोनात प्रयत्न करत असतात. एकीकडे अनेक बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री आपल्या गरोदरपणाबद्दल सर्व गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असताना, अशाही अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी शेवटपर्यंत त्यांचे गरोदरपण लपवून ठेवले. आणि अचानक आपल्या बाळाच्या जन्माची गोड बातमी चाहत्यांना दिली. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी त्यांचे गरोदरपण सर्वांपासून लपवून ठेवले.

संगीता घोष

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संगीता घोष हिने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत खुलासा केला की, ती 7 महिन्यांच्या मुलीची आई आहे. तिच्या या विधानामुळे चाहत्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या वर्षी 25 डिसेंबरपूर्वी तिच्या मुलीचा जन्म झाला होता, परंतु अभिनेत्रीने आपल्या गरोदरपणाबद्दल कोणाला काहीच सांगितले नाही. संगीताच्या मते, ती आपल्या मुलीबद्दल सर्वांना सांगण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होती.

असीन

आमिर खानसोबत ‘गजनी’ चित्रपटात दिसलेली साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री असीनने 2016 मध्ये मायक्रोमॅक्सच्या संस्थापकाशी लग्न केले.लग्नाच्या पुढच्याच वर्षी या अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभिनेत्रीने चाहत्यांना आपल्या प्रेग्नंसीबद्दलही कळू दिले नाही आणि मुलीच्या जन्मानंतर तिने चाहत्यांना ही खुशखबर देऊन आश्चर्यचकित केले.

श्रिया सरन

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरन हिने 2018 साली रशियन टेनिसपटू आंद्रेई कोसचिवसोबत लग्न केले. लग्नानंतर अभिनेत्रीने आपली प्रेग्नंसी सर्वांपासून लपवली. नंतर ऑक्टोबर 2021 मध्ये श्रियाने ती एक वर्षाच्या मुलीची आई असल्याची माहिती दिली. केवळ गरोदरपणाच नाही तर तिने आपल्या मुलीबद्दलची माहिती सुद्धा एक वर्ष लपवून ठेवली.

परिधी शर्मा

जोधा अकबर या मालिकेत जोधाची भूमिका साकारणाऱ्या परिधी शर्माने २०११ मध्ये आपल्या प्रियकरासोबत लग्न केले. पण लग्नानंतर ती कॅमेऱ्यापासून दूर राहिली आणि आपल्या संसारात रमली. यादरम्यान तिने आपल्या गरोदरपणाची बातमी सुद्धा लपवली. जेव्हा तिने आपल्या मुलासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा सर्वांना परिधी आई झाल्याचे समजले.

गुल पनाग

आपल्या प्रेग्नंसीची बातमी लपवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गुल पनागच्या नावाचाही समावेश होतो. अभिनेत्रीने 2011 मध्ये पायलट ऋषी अटारीसोबत विवाह केला. लग्नाच्या काही वर्षांनंतर म्हणजेच २०१८ मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र तिने आपल्या मुलाबद्दल ६ महिने कोणालाच काही कळू दिले नाही.

प्रियंका चोप्रा

देसी गर्ल प्रियांका चोप्राने आपली मुलगी मालती मेरीला सरोगसीच्या माध्यमातून जन्म दिला. पण तिने ही बातमी सर्वांपासून लपवून ठेवली होती. प्रियांकाने 22 जानेवारी 2022 रोजी आपल्या मुलीच्या जन्माची घोषणा सोशल मीडियावर केली. ही बातमी ऐकून चाहते आश्चर्यचकित झाले.

मिहिका वर्मा

टीव्ही मालिका ‘ये है मोहब्बतें’ मधील मिहिका वर्माने सुद्धा हुशारीने तिच्या गरोदरपणाची बातमी सर्वांपासून लपवून ठेवली होती. मिहिकाने यूएस स्थित उद्योगपतीशी लग्न केले. त्यानंतर तिने आपल्या बाळाला जन्म देताना बेबी बंपसह स्वतःचा एक फोटो शेअर केला. त्यानंतर ३ महिन्यांनी आपल्याला मुलगा झाल्याची बातमी शेअर केली होती.