एका पत्रकारामुळे जेव्हा शाहरुख खानला तुरुंगात ज...

एका पत्रकारामुळे जेव्हा शाहरुख खानला तुरुंगात जावं लागलं होतं….. त्यानं स्वतःच सांगितला हा किस्सा… (When Shahrukh Khan Had To Go To Jail Because Of A Journalist, The Actor Himself Narrated The Story)

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचे जगभरात फॅन फॉलोइंग आहे. तसं पाहिलं तर शाहरुख सहसा कोणाच्या वादात पडत नाही, परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की तुमचा लाडका किंग खान एकदा तुरुंगात जाऊन आला आहे. त्यासंदर्भातील एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

खरं तर, काही वर्षांपूर्वी शाहरुख खान ‘माय नेक्स्ट गेस्ट नीड्स नो इंट्रोडक्शन विथ डेव्हिड लेटरमॅन’ या शोमध्ये पाहुणा म्हणून गेला होता. त्या शोमध्ये किंग खानने त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक गुपिते उघड केली होती. त्याचवेळी डेव्हिड लेटरमॅनने त्यांना तुरुंगात जाण्याबाबत प्रश्न विचारला, तेव्हा शाहरुख खानने सांगितले की, मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामुळे नाराज झालेल्या त्याने रागाच्या भरात मॅगझिनच्या संपादकाला फोन केला. त्यावर संपादकाने त्याला ‘हा लेख गंमत म्हणून घ्या, हा एक विनोद होता,’ असे उत्तर दिले.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

त्या कार्यक्रमादरम्यान शाहरुख खानने त्या लेखामुळे आपण अतिशय रागावलो होतो हे मान्य केले. रागाच्या भरात शाहरूख मॅगझिनच्या ऑफिसमध्ये गेला आणि तेथे त्याने शिवीगाळ केली. या घटनेनंतर एकदा तो चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर असताना काही पोलीस तेथे गेले, शाहरुखला वाटले ते त्याचे चाहते असून त्याला भेटायला आले आहेत; तो आनंदाने त्याला भेटायला गेला, मात्र पोलिसांनी त्याला आपल्या गाडीत बसवले आणि घेऊन गेले.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

शाहरुख खानने सांगितले की, ‘मग मी त्यांच्यासोबत गेलो आणि मी पहिल्यांदा तुरुंग पाहिला, जो खूप लहान जागेत होता आणि खूप गलिच्छ होता. मला दिवसभर कोठडीत राहावे लागले आणि संध्याकाळी मला जामीन मिळाला. जेव्हा मी कोठडीतून बाहेर आलो तेव्हा मी त्या संपादकाच्या घराजवळून गेलो होतो. शाहरुखने असेही सांगितले होते की, त्या काळात तो इंडस्ट्रीत नवीन होता आणि छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायचा.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

खरं तर, १९९३ मध्ये आलेल्या माया मेमसाहेब या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. चित्रपटाच्या दिग्दर्शकाची पत्नीही त्या चित्रपटात काम करत होती. आणि शाहरुख खानला चित्रपटात दिग्दर्शकाच्या पत्नीसोबत एक लव्ह सीन करायचा होता. त्याच चित्रपटाबद्दल त्या मासिकाने एका लेखात लिहिले की, या चित्रपटाचे दिग्दर्शक केतन मेहता यांनी शाहरुख खानला पत्नीसोबत एक रात्र राहण्यास सांगितले, जेणेकरून ते एकमेकांना ओळखू शकतील आणि नंतर लव सीन शूट करू शकतील.” हा लेख शाहरुख खानने वाचल्यावर तो संतापला. त्यानंतर त्याने जे काही केले ते तुम्ही आधीच वाचले आहे. शाहरुखने त्या लेखकाला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.