‘श्री कृष्ण’ समजून स्वप्निल जोशीची पूजा करू लाग...

‘श्री कृष्ण’ समजून स्वप्निल जोशीची पूजा करू लागले होते लोक, ३० वर्षांनंतरही ही भूमिका वाटते जिवंत (When People Started Worshiping Swapnil Joshi as ‘Shri Krishna’ in Real Life, He Got Popularity by Playing Lord Krishna’s Role)

मराठी सिनेसृष्टीतील आजचा आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी याची चॉकलेट बॉय ही प्रतिमा लोकांनी इतकी उचलून धरली आहे की रोमँटिक हिरो म्हणून स्वप्निल हा प्रेक्षकांचा आणि दिग्दर्शकांचाही आवडता आहे. गेली अनेक वर्षे आपण त्याला वेगवेगळ्या भूमिका करताना पाहत आहोत. पण त्याची एक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कायमची कोरली गेली ती म्हणजे श्रीकृष्णाची भूमिका. प्रसिद्ध दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या ‘श्री कृष्ण’ मालिकेतील श्रीकृष्णाची भूमिका करून स्वप्निलने आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. आज जवळजवळ तीस वर्षांनंतरही ही भूमिका तितकीच जिवंत वाटते.

ज्यावेळेस दूरदर्शनची जिकडे तिकडे चलती होती, त्या वेळेस रामायण आणि महाभारत यांसारख्या पौराणिक मालिका लोक आपल्या संपूर्ण कुटुंबासह एकत्र बसून श्रद्धेने पाहत असत. या मालिकांनी लोकांना अक्षरशः वेड लावले असतानाच १९९३ साली रामानंद सागर यांची ‘श्री कृष्ण’ ही मालिका आली. लवकरच या मालिकेनेही प्रेक्षकांना जिंकून घेतलं. या मालिकेमध्ये स्वप्निल जोशीने श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्याला इतकी लोकप्रियता दिली की खऱ्या आयुष्यातही लोक त्याला श्रीकृष्ण मानून त्याची पूजा करू लागले होते.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

‘श्री कृष्ण’ या मालिकेमध्ये स्वप्निल जोशीने कान्हाच्या किशोरावस्थेतील पात्र साकारले होते. या भूमिकेने त्याला घराघरांत पोहचवलेच शिवाय लोक त्याला खरा श्री कृष्ण समजून त्याच्या पाया पडू लागले होते. एका मुलाखतीमध्ये स्वप्निलने स्वतःच या गोष्टीचा खुलासा केला होता. दरम्यान त्याने कॉलेजमधील एक मजेदार किस्साही सांगितला होता.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

स्वप्नीलने सांगितले होते की, जेव्हा तो कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होता, तेव्हा त्याचा एक चाहता त्याच्यासमोर आला आणि गुडघे टेकून खाली बसला. तो त्याच्या पायाला हात लावून रडायला लागला आणि सांगू लागला की तो चेन स्मोकर होता, पण श्री कृष्णाच्या भीतीने त्याने सिगारेट पिणे सोडून दिले आहे. त्या चाहत्याने सांगितले की, जेव्हा तो सिगारेट ओढायचा तेव्हा स्वप्नील जोशीची भगवान श्री कृष्णाची प्रतिमा त्याच्यासमोर यायची. स्वप्नीलने सांगितले की, तो क्षण त्याच्यासाठी अजब होता, पण नंतर क्षणार्धात तो क्षण त्याच्यासाठी अभिमानास्पद बनला.

यासोबतच स्वप्नीलने सांगितले की, तो एकदा एका सार्वजनिक कार्यक्रमाला गेला होता, जिथे त्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते, पण स्टेजवर पोहोचण्यासाठी त्याला दोन तास लागले. यामागचे कारण सांगताना अभिनेत्याने सांगितले की, तो स्टेजकडे जाऊ लागताच तेथे उपस्थित असलेल्या जमावाने त्याला घरी नेले. गर्दीत उपस्थित लोकांनी त्याला घेरले आणि त्याच्या पायाला हात लावायला सुरुवात केली, त्यामुळे त्याला स्टेजवर पोहोचायला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागला.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

सांगायचं म्हणजे वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी स्वप्नीलने टीव्हीवर पदार्पण केले. तो रामानंद सागर यांच्या ‘उत्तर रामायण’ मालिकेत भगवान राम आणि माता सीता यांचा मुलगा कुशच्या भूमिकेत दिसला होता. ‘रामायण’मध्ये कुशची भूमिका साकारल्यानंतर, १९९३ मध्ये ‘श्री कृष्ण’मध्ये भगवान कृष्णाची मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि हे पात्र साकारून त्याने रातोरात खूप लोकप्रियता मिळवली.

स्वप्नील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. काल श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त साधत स्वप्नीलने त्याच्या या श्री कृष्णाच्या भूमिकेची आठवण चाहत्यांसोबत शेअर केली. त्याने एक व्हिडीओ शेअर करत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. त्या व्हिडिओची खूपच चर्चा होत आहे. हा व्हिडीओ आहे स्वप्निलच्या कृष्ण रुपातला. त्याने हा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय कि,”३० वर्षांहून अधिक काळ लोटला पण तरीही, ही भूमिका आजही तेवढीच प्रेरणा देते!’

स्वप्निलच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘तू आतापर्यंतचा सर्वात उत्तम श्रीकृष्ण साकारला आहेस’, ‘My फेवरेट कृष्णा’, ‘तू आमचं बालपण आनंददायी बनवलं होतंस’ अशा शब्दात स्वप्निलच्या चाहत्यांनी पोस्टवर कमेंट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

सध्या टीव्ही वरील चला हवा येऊ द्या आणि तू तेव्हा तशी या दोन मालिकांमध्ये स्वप्नील महत्त्वाच्या भूमिकांत दिसत आहे. त्याने ‘लव कुश’, ‘श्री कृष्ण’, ‘अमानत’, ‘कहता है दिल’, ‘देश में निकला होगा चांद’, ‘हरे कांच की चूड़ियां’, ‘सजन रे झूठ मत बोलो’, ‘पापड़ पोल’, ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’ अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. मालिकांव्यतिरिक्त तो ‘समांतर’ आणि ‘समांतर 2’ सारख्या वेब सीरिजमध्येही दिसला आहे. स्वप्निलच्या मराठी चित्रपटांची यादीही मोठी आहे.

स्वप्निल जोशीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने दोन लग्नं केली. २००५ मध्ये त्याने अपर्णा नावाच्या डेंटिस्टशी पहिले लग्न केले, परंतु काही कारणास्तव, २००९ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी त्याने लीना आराध्ये नावाच्या मुलीशी लग्न केले. ती देखील व्यवसायाने डेंटिस्ट आहे. लग्नानंतर २०१६ मध्ये दोघेही मुलगी मायरा जोशीचे पालक झाले आणि त्यानंतर २०१८ मध्ये या जोडप्याला राघव जोशी हा मुलगा झाला.

सर्व फोटो सौजन्य: इंस्टाग्राम