जेव्हा मेहमूदने या सुपरस्टारचे थोबाड रंगविले हो...

जेव्हा मेहमूदने या सुपरस्टारचे थोबाड रंगविले होते…. (When Mehmood Slapped This Super Star?)

प्रसिद्ध विनोदी अभिनेता मेहमूद हे त्यांच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जात होते. त्यांची विनोदबुद्धी लोकांना इतकी आवडायची की, त्यांच्यासाठी चित्रपटांमध्ये खास भूमिका तयार केल्या गेल्या, ज्या लोकांना खूप आवडल्या. मेहमूदचे वडील मुमताज अली एक सुप्रसिद्ध कलाकार होते. ते थिएटर आर्टिस्ट होते आणि स्टेज शो करायचे. वडिलांच्या प्रभावामुळे मेहमूदची अभिनयाची आवड वाढली.

आज मेहमूद यांच्याशी संबंधित एक रोचक किस्सा जाणून घेऊयात, जेव्हा त्यांनी एका सुपरस्टारचे थोबाड रंगविले होते. तुमच्या माहितीसाठी, सांगायचंच तर, मेहमूद हे विनोदी कलाकार असण्याव्यतिरिक्त, एक चांगले दिग्दर्शक देखील राहिले आहेत. त्यांनी अनेक उत्तम चित्रपट केले. ते निर्मातेही होते. चित्रपटसृष्टीत त्यांनी खूप विश्वासार्हता मिळवली होती. थप्पड मारल्याची घटना अशी होती की, मेहमूद यांनी राजेश खन्ना आणि हेमा मालिनीला त्यांच्या ‘जनता हवालदार’ या चित्रपटात कास्ट केले होते.

 Mehmood Slapped This Super Star

या चित्रपटाचे शूटिंग ते त्यांच्या फार्म हाऊसवर करत होते. मेहमूद अतिशय वक्तशीर तसेच शिस्तप्रिय होते. त्यांची टीम आणि सर्व कलाकार देखील शूटिंगच्या वेळी वेळेवर यायचे.

एकदा मेहमूदच्या मुलाने राजेश खन्नाला शूटिंग करताना पाहिले आणि फक्त हाय-हॅलो म्हटले नि तो निघाला. राजेश खन्ना त्यावेळी सुपरस्टार होते. चित्रपटसृष्टीत त्यांचा खूप प्रभाव आणि दबदबा होता. मेहमूदच्या मुलाचं वागणं काही त्यांना पसंत पडलं नाही. आणि तेव्हापासून ते शूटसाठी उशिरा येऊ लागले. त्यामुळे इतरांनाही शूटिंगसाठी खोळंबून राहावे लागत असे. या चित्रपटामध्ये मेहमूद यांनी पैसे गुंतवले होते. त्यामुळे ते या चित्रपटाबाबत गंभीर होते. त्यांना राजेश खन्नाचा राग आला. त्यानंतर जेव्हा एके दिवशी राजेश खन्ना नेहमीप्रमाणे उशिरा सेटवर पोहचला तेव्हा रागाच्या भरात त्याने राजेश खन्नाला थप्पड देत त्याचे तोंड रंगविले. यामुळे राजेश खन्नासह सेटवरील प्रत्येकजण स्तब्धच झाले.

 Mehmood Slapped This Super Star

त्यावेळेस मेहमूद यांनी राजेश खन्नाला खड्या आवाजात सुनावले. ते म्हणाले, “तू सुपरस्टार असशील तर तुझ्या घरी. मी या सिनेमासाठी पैसे गुंतवले आहेत. त्यासाठीचे पूर्ण मानधन दिले आहे. येथे सर्वजण मेहनत करत आहेत. तासन्‌तास वाट पाहत आहेत. अन्‌ तू तूझ्या वागण्याने सगळ्यांना दुःखी केलं आहे.” त्यानंतर राजेश खन्ना यांना आपली चूक कळली आणि ते सेटवर वेळेवर येऊ लागले.

काल मेहमूद यांचा जन्मदिवस होता. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. बॉम्बे टॉकिजचा ‘किस्मत’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता, जो १९४३ साली प्रदर्शित झाला. ते त्यांचे संघर्षाचे दिवस होते. त्यावेळेस ते अभिनेत्री मीना कुमारी यांना टेनिस शिकवत होते. तेथे मीनाकुमारी यांची लहान बहिण मधुवर त्यांचे प्रेम जडले आणि जिवाची धमकी देत त्यांनी तिच्याशी लग्न केले. मेहमूदने ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच या इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करणाऱ्या अनेक कलाकारांना त्यांनी मदतही केली आहे. काही कलाकारांना त्यांनी आपल्या चित्रपटांतूनही संधी दिलेली आहे. अगदी अमिताभ बच्चन यांनाही करिअर बनवण्यामध्ये त्यांनी मदत केली आहे.