सैफ अली खानचे पिताजी, पतौडीचे नबाब, यांनी शर्मि...

सैफ अली खानचे पिताजी, पतौडीचे नबाब, यांनी शर्मिला टागोरसाठी सिम्मी गरेवालला प्रेमात धोका दिला… (When Mansoor Ali Khan Pataudi cheated on Simi Garewal to be with Sharmila Tagore)

काही प्रेमकथा खूप रंगतात आणि गुपचूप संपतात. इतक्या गुपचूप की कोणाला पत्ताही लागत नाही. अशीच एक प्रेमकथा रंगली होती अभिनेत्री सिम्मी गरेवाल आणि पतौडीचे नबाब मन्सूर अली खान यांची. त्यांच्या प्रेमकथेत शर्मिला टागोरने प्रवेश केला आणि त्या कहाणीचा अंत झाला. अगदी कुणालाही कळू न देता. हे नबाब म्हणजे क्रिकेटपटू पतौडी. उत्कृष्ट फलंदाज. त्यांनी काही काळ भारतीय क्रिकेट संघाचं कप्तानपद देखील भूषविलं होतं. सैफ अली खानचे ते पिताजी होत.

मन्सूर अली खान यांनी शर्मिला टागोरशी लग्न केलं. पण त्याआधी त्यांचं प्रेम देखणी व बोल्ड अभिनेत्री सिम्मी गरेवालवर जडलं होतं. दोघेही सिरियस रिलेशनशिपमध्ये होते. इतके की, ते लग्न करणार होते. पण शर्मिला त्यांना भेटली, अन्‌ हे प्रेम आणि लग्न मोडलं.

पतौडी यांची क्रिकेट कारकीर्द ऐन बहरात असताना, हे प्रेमप्रकरण बहरलं होतं. इंग्लंडमध्ये शिक्षण झालेल्या सिम्मी गरेवालचं व्यक्तीमत्त्व, तिची जीवनशैली, तिचा रूबाब या गोष्टींची पतौडींना भूरळ पडली आणि दोघांचे प्रेम रंगू लागले. सिम्मी, पतौडींचे क्रिकेट सामने बघायला जायची, तर पतौडी तिच्या मागे सिनेमाच्या आऊटडोअर शुटिंगला जायचे. बराच वेळ ते एकमेकांच्या सहवासात घालवत. हळूहळू  या दोघांच्या प्रेमाचे किस्से क्रिकेट जगतात व सिनेसृष्टीत पसरू लागले.

नबाबांच्या खानदानाची बहू बनायला जी प्रतिष्ठा, दर्जा, दिमाख लागते, ते सर्व गुण सिम्मीमध्ये होते. स्वतः पतौडी तिच्याशी लग्न करायला तयार होतेच. आपल्या फॅमिलीशी तिची गाठ घालून देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. दरम्यान त्यांना शर्मिला टागोर भेटली आणि तिच्यात नबाबांचा जीव गुरफटला.

शर्मिला आणि पतौडी यांची ओळख त्यांच्या कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. पहिल्याच नजरभेटीत पतौडी तिच्या प्रेमात पडले. पण शर्मिलाने होकार द्यायला ४ वर्षे घेतली. तिनं लग्नाची इच्छा प्रदर्शित करताच पतौडींनी सिम्मीला सोडण्याचा निर्णय घेतला.

सिम्मीशी संबंध तोडण्याकरीता पतौडी तिच्या घरी गेले. आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय्‌ याची कल्पना नसलेल्या सिम्मीने त्यांना लिंबू सरबत दिलं. पण ते न घेताच, ते घाईघाईने बोलले की, आय ॲम सॉरी. पण आपले संबंध आता संपलेत. मला अन्य कोणी भेटलं आहे. सिम्मी हडबडली. तरीपण स्वतःला सावरून लिफ्टपर्यंत सोडायला निघाली. पतौडींनी नको म्हटलं, तरीपण सिम्मी लिफ्टपर्यंत गेली. पाहते तर काय? तिथे शर्मिला पतौडींची वाट बघत होती. सिम्मी जे काय समजायचं ते समजली. पण तिने चकार शब्द काढला नाही.

पुढे पतौडी आणि शर्मिलाच्या लग्नात विघ्नं आलीच. दोघांचा धर्म वेगळा असल्याने, दोघांच्याही घरून या लग्नाला विरोध झाला. अखेरीस शर्मिलाने इस्लाम धर्म स्वीकारला, तेव्हा हे लग्न झालं. शर्मिला टागोरची आयेशा सुलतान झाली.

सिम्मीने हा प्रेमभंग धीराने पचवला. पतौडीच्या नात्यात कटुता आणली नाही. पतौडी व शर्मिला यांना तिने आपल्या टॉक शो मध्ये बोलावले. तेव्हा तिघांनीही जुन्या संबंधांची वाच्यता केली नाही.