मीनाक्षी शेषाद्रीच्या प्रेमात कुमार शानूने, गर्...

मीनाक्षी शेषाद्रीच्या प्रेमात कुमार शानूने, गर्भवती बायकोला वाऱ्यावर सोडले होते… (When Kumar Sanu Left His Six Months Pregnant Wife For Meenakshi Seshadri)

९० च्या दशकात आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी शेषाद्री बऱ्याच काळानंतर स्वतःच्याच निधनाच्या बातमीने लोकांसमोर आल्या. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र आता स्वत: मीनाक्षी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करत या सर्व अफवा असल्याचे सांगत या  चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या गार्डनमध्ये बसल्याचे दिसत आहे. दरम्यान त्यांनी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘डान्स पोज’ अशी कॅप्शन दिली आहे.

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर मीनाक्षी यांनी अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये यशोशिखर गाठले. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी ‘हिरो’, ‘मेरी जंग’, ‘घर हो तो ऐसा’, ‘घायल’, ‘दामिनी’ आणि ‘घातक’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र अचानक मिनाक्षी यांनी चित्रपटांतून संन्यास घेतला आणि लग्न करुन परदेशी स्थायिक झाल्या. त्या काळात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मीनाक्षींची गणना केली जात असे. त्यामुळे बॉलिवूड सोडल्यावर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

चित्रपटसृष्टीत असताना व्यावसायिक आयुष्याइतकेच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही नेहमी चर्चेत असायचं. जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासोबतही त्यांचं नाव जोडलं गेलं होतं. परंतु मीनाक्षी आणि गायक कुमार शानू यांच्या अफेअरची चर्चा त्या काळात फारच रंगली होती. मागे बिग बॉस १४ मध्ये स्पर्धक बनून आलेला कुमार शानूचा मुलगा, जान कुमार शानू याने या कार्यक्रमामध्ये आपल्या खाजगी आयुष्याबद्दल सांगताना, आपण ६ महिन्याचे आईच्या पोटात असताना, वडिलांनी आईला तलाक दिला. त्यानंतर आईनेच माझे पालनपोषण केले आहे, असे सांगितले.

जानच्या या गौप्यस्फोटानंतर कुमार शानूने आपल्या गरोदर पत्नीला वाऱ्यावर का सोडले, या चर्चेला पुन्हा उधाण आलं. कुमार शानूच्या घटस्फोटासाठी कारणीभूत ठरलेली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून त्या मीनाक्षी शेषाद्री होत्या. महेश भट्ट यांच्या ‘जुर्म’ चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिल्यांदा भेट झाली. या चित्रपटातील ‘जब कोई बात बिगड जाए’ हे मीनाक्षींवर चित्रित करण्यात आलेलं गाणं कुमार शानूने गायलं होतं. या चित्रपटाच्या प्रिमियर शोला झालेल्या भेटीत कुमार शानू त्यांच्या प्रेमात पडले. अनेक वर्षं लपूनछपून त्यांचं अफेअर चालू होतं. परंतु, कुमार शानूंची पत्नी रिटाला याबद्दल कळल्यानंतर दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले, ज्याचा शेवट घटस्फोटात झाला. त्यावेळेस रिटा सहा महिन्यांची गरोदर होती. अशा अवस्थेत नवऱ्याने वाऱ्यावर सोडले हा राग असल्यामुळे रिटाने या सगळ्याला मीनाक्षीला जबाबदार धरलं. त्यांची ही बातमी नंतर १९९४ च्या फिल्मफेअर मासिकात छापून आली. परंतु त्यावेळेस मीनाक्षी यांनी मौन धारण केलं. त्यानंतर दोघांत दुरावा निर्माण झाला. मीनाक्षी यांनी सिनेसृष्टीला रामराम ठोकला नि संसार थाटला. तर कुमारनेही बिकानेर येथील सलोनी भट्टाचार्यसोबत दुसरं लग्न केलं.

मीनाक्षी यांनी १९९५ साली इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूरसोबत लग्न केलं आणि अमेरिकेतील प्लानो (टेक्सास) मध्ये स्थायिक झाल्या. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.  त्या अभिनय क्षेत्रात नसल्या तरी त्यांनी आपली नृत्याची आवड जोपासली आहे. टेक्सासमध्ये त्यांनी Cherish Dance School नावाने डान्स अकॅडमी सुरु केली आहे. टेक्सासमधील भारतीयांमध्ये मीनाक्षी लोकप्रिय आहेत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम