करीना कपूर संजय लीला भन्साळींना म्हणाली होती कन...

करीना कपूर संजय लीला भन्साळींना म्हणाली होती कन्फ्यूज डायरेक्टर, हे होते कारण (When Kareena Kapoor called Sanjay Leela Bhansali a ‘Confuse Director’, Actress was Furious Because of This)

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानची पत्नी करीना कपूर खानचे नाव इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. करीनाच्या फिल्मी करीअरची सुरुवात फ्लॉप चित्रपटाने झाली होती, मात्र  त्यानंतर अभिनेत्रीने एकामागून एक सुपरहिट चित्रपट देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. करीनाने इंडस्ट्रीतील अनेक बड्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे, पण एकदा तर तिने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना कन्फ्युज डायरेक्टर म्हटले होते.

संजय लीला भन्साळी यांनी ‘देवदास’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात सर्वात आधी करीना कपूरला कास्ट केले होते, पण नंतर त्यांनी करीनाच्या जागी ऐश्वर्या रायला घेतले आणि करीनाला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला. या चित्रपटात ऐश्वर्याने पारोची भूमिका साकारली होती, पारो या पात्राला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात ऐश्वर्याशिवाय माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसले होते.

‘देवदास’ चित्रपटातून संजय लीला भन्साळी यांनी काढून टाकल्यामुळे करीना खूप नाराज झाली होती. करीनाला तिचा राग अनावर झाला आणि तिने भन्साळी यांना कन्फ्यूज डायरेक्टर म्हटले. मात्र, एका मुलाखतीत संजय लीला भन्साळी यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले की ती नीला लुल्लासोबत माझ्या घरी आली होती आणि तिने माझ्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली…

करीनाची ही इच्छा ऐकून मी तिला म्हटले की, मी अजून तुझे काम पाहिलेले नाही आणि तुला कास्ट करण्यापूर्वी तू काय करू शकतेस ते पाहणे आवश्यक आहे. त्यानंतर आम्ही एक फोटोशूट ठेवले, तेव्हा बबिता जी आणि करिश्मा कपूर देखील उपस्थित होत्या. यादरम्यान मी स्पष्टपणे सांगितले होते की, या फोटोशूटवरुन मी करीनाला कास्ट करीन असे समजू नका.

त्यांनी असेही सांगितले की, करीनाचे फोटो पाहिल्यानंतर मी तिला सांगितले, ऐश्वर्या राय या चित्रपटातील पारोच्या भूमिकेसाठी योग्य आहे, परंतु त्यानंतर करीना काहीच बोलली नाही आणि काही दिवसांनी तिने मीडियामध्ये माझ्यावर टीका केली. तिने माझ्यावर सायनिंग अमाउंट  आणि करार करुन माघार घेतल्याचा आरोप केला पण तो पूर्णपणे चुकीचा होता.ती मला कन्फ्यूज डायरेक्टर तर म्हणालीच शिवाय मला चित्रपट कसे बनवतात हे माहित नाही असेही तिने सगळ्यांना सांगितले.  

एका मुलाखतीत जेव्हा करीनाला तू कधी भन्साळीसोबत काम केले आहे का अस प्रश्न विचारण्यात आला होता, या प्रश्नाचे उत्तर देताना करीनाने सांगितले होते की, मी त्यांच्यासोबत कधीही काम करणार नाही, त्यांनी माझ्यासोबत जे केले ते चुकीचे आहे. ‘देवदास’ चित्रपटासाठी माझी स्क्रीन टेस्ट घेण्यात आली आणि मला न सांगता चित्रपटातून बदलण्यात आले. ज्या दिवशी त्यांनी माझ्या जागी ऐश्वर्याला साइन केले, त्याच दिवशी मी ‘यादें’ साइन केला होता.

या मुलाखतीत करीनाने असेही सांगितले होते की, माझे करीअर कितीही बुडत असले तरी मी संजय लीला भन्साळी यांच्यासोबत कधीही काम करणार नाही. यानंतर आपला राग काढत तिने संजय लीला भन्साळी यांना कन्फ्युज डायरेक्टर म्हटले  पण गमतीची गोष्ट म्हणजे काही वर्षांनी किरण खेरने करीना आणि संजयचे पॅचअप केले. आता दोघांचे नाते सामान्य आहे.