कामाच्या ताणामुळे या प्रसिद्ध कलाकारांची सेटवरच...

कामाच्या ताणामुळे या प्रसिद्ध कलाकारांची सेटवरच बिघडली तब्येत, हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची आली वेळ (When Health of These Famous Celebs Deteriorated on The Set Due to Work Pressure)

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि साउथकडील सुपरस्टार आभास यांचा आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट’चे शूटिंग सध्या हैदराबाद येथील रामोजी राव फिल्म सिटीमध्ये चालू आहे. पण शूटिंग दरम्यान दीपिकाची तब्येत अचानक बिघडली आणि तिला तिथल्याच हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. शूटिंग दरम्यान दीपिकाला कसली तरी भीती वाटल्याने ती खूप घाबरली त्यामुऴे तिच्या ह्रदयाचे ठोके जलद गतीने धडकू लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आता ती पुन्हा एकदा सेटवर परतल्याचे म्हटले जात आहे. सेटवर आजारी पडणारी दीपिका ही एकमेव सेलिब्रेटी नाही. या आधीही अनेक कलाकार शूटिंग दरम्यानच आजारी पडले त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले होते. चला तर त्या सेलिब्रेटींबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

प्रियंका चोप्रा

बॉलिवूडची देसी गर्ल जेव्हा ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती. तेव्हा कामाच्या ताणामुळे ती सेटवरच चक्कर येऊन पडली. प्रियंकाची तब्येत बिघडल्यामुळे शूटिंग थांबवून ताबडतोब डॉक्टरांच्या टीमला सेटवर बोलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर 6 तासांनी पुन्हा शूटिंगला सुरुवात करण्यात आली.

आलिया भट्ट

कामाच्या ताणामुळे सेटवर आजारी पडणाऱ्या कलाकारांच्या यादीत अभिनेत्री आलिया भट्टचे पण नाव आहे. संजय लीला भन्साली यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलिया आजारी पडली होती. उलटी आणि हायपरअॅसिडिटीचा त्रासामुळे आलियाला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले होते.

श्वेता तिवारी

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या फिटनेसने सध्याच्या नव्या अभिनेत्रींना मागे टाकते. पण तिचीसुद्धा सेटवर तब्येत बिघडली होती. सेटवर शूटिंग करत असताना श्वेताचे ब्लड प्रेशर कमी झाले आणि तिला अशक्तपणा येऊ लागला. त्यामुळे तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. कामामध्ये सतत व्यस्त असल्यामुळे तिची तब्येत बिघडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शोएब इब्राहीम

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कडचा पती अभिनेता शोएब इब्राहिम सेटवर शूटिंग करताना अचानक खूप आजारी पडला त्यावेळी त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

कपिल शर्मा

छोट्या पडद्यावरील कॉमेडीचा बादशहा अशी ओळख असलेला कपिल शर्मा नेहमीच लोकांना खळखळून हसवतो. पण एकदा त्याच्या शोमध्ये जेव्हा शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा पाहुणे म्हणून येणार होते तेव्हा सेटवर कपिलची तब्येत अचानक बिघडली आणि तो चक्कर येऊन पडला. कामाचा ताण आणि सततचे व्यस्त वेळापत्रक यामुळे त्याची तब्येत बिघडल्याचे सांगितले जाते.

 अर्जुन बिजलानी

अभिनेता अर्जुन बिजलानी ‘किस देस में है मेरा दिल’ या मालिकेचे शूटिंग करत असताना तो सेटवरच बेशुद्ध पडला. तेव्हा त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. कामाचा ताण आणि थकव्यामुळे त्याची तब्येत बिघडली होती.

स्नेहा वाघ

मराठी बिग बॉस सीजन 3 फेम अभिनेत्री स्नेहा वाघची सुद्धा सेटवर असताना एकदा तब्येत बिघडली होती.‘शेर-ए-पंजाब महाराणा रणजीत सिंह’ या मालिकेच्या सेटवर ती बेशुद्ध झाली. असे म्हटले जाते की, त्या सेटवर खूपच उष्णता होती. त्यात स्नेहाने खूप जाड कपडे घातले होते. आणि त्याच वेळी तिला फू़ड पॉयजनिंगसुद्धा झालं होतं.